जिंकलंस मित्रा! आधी प्राण वाचवला अन् आता...; देवदूत मयूरच्या निर्णयाचं तुम्हीही कराल कौतुक
By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2021 02:48 PM2021-04-22T14:48:57+5:302021-04-22T14:49:27+5:30
mayur shelke: धाडसानंतर मयूर शेळकेंनी घडवलं माणुसकीचं दर्शन; पुन्हा जिंकली सगळ्यांची मनं
अंबरनाथ: वांगणी रेल्वे स्थानकात आईसोबत फलाटावरून जात असताना रुळांवर पडलेल्या मुलाचा जीव वाचवणाऱ्या मयूर शेळके (Mayur Shelke) यांनी पुन्हा एकदा माणसुकीचा प्रत्यय दिला आहे. स्वत:च्या प्राणांची बाजी लावून मयूर यांनी चिमुकल्याचे प्राण वाचवले होते. मयूर यांनी दाखवलेल्या धाडसाचं रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनीदेखील कौतुक केलं. रेल्वेकडून मयूर यांना ५० हजारांचं बक्षीस देण्यात आलं. यातील निम्मी रक्कम मयूर त्यांनी वाचवलेल्या मुलाच्या आईला देणार आहेत.
जिगरबाज मयूर शेळकेंना रेल्वेकडून 50 हजार तर जावाकडून बाईक, आनंद महिंद्रांनीही केलंय ट्विट
१७ एप्रिलला संगीता शिरसाट वांगणी रेल्वे स्थानकाच्या फलाटावरून चालल्या होत्या. संगीता आणि त्यांचा मुलगा अंध आहेत. त्यामुळेच फलाटाचा अंदाज न आल्यानं संगीता यांचा मुलगा रुळांवर पडला. तितक्यात समोरून भरधाव रेल्वे येत होती. त्यावेळी कर्तव्यावर असलेले पॉईंटमन मयूर शेळके यांनी स्वत:च्या जीवाचा विचार न करता मुलाच्या दिशेनं धाव घेतली आणि मुलासह फलाटावर उडी घेतली. हा संपूर्ण थरार सीसीटीव्हीत कैद झाला.
I'll give half of the amount, given to me as token of appreciation, for that child's welfare & education. I came to know that his family isn't financially strong. So I decided this: Mayur Shelkhe, pointsman who saved a child who fell on tracks at Vangani railway station on 17.04 pic.twitter.com/IWdacY0DFf
— ANI (@ANI) April 22, 2021
मयूर यांनी दाखवलेल्या धाडसाचं सर्वत्र कौतुक झालं. रेल्वेकडून त्यांना ५० हजारांचं बक्षीस मिळालं. यातील २५ हजार रुपये मयूर शेळके संगीता शिरसाट यांना देणार आहेत. 'मला बक्षीस म्हणून मिळालेल्या रकमेतील निम्मी रक्कम संगीता शिरसाट यांना देण्याचा निर्णय मी घेतला आहे. शिरसाट यांच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती बेताची असल्याचं मला समजलं. त्यामुळे मी हा निर्णय घेतला. ही रक्कम संगीता यांच्या मुलाच्या शिक्षणासाठी उपयोगी ठरेल,' असं शेळके यांनी सांगितलं. मयूर यांच्या धाडसाचं दर्शन पाच दिवसांपूर्वी घडलं. आता त्यांनी त्यांच्यातल्या दातृत्त्वाचं दर्शन घडवत पुन्हा एकदा सर्वांची मनं जिंकली आहेत.
एक जीव वाचवण्यासाठी तुम्ही करा प्लाझ्मा अन् रक्तदान, मयूर शेळकेंचं आवाहन
त्यांना बक्षीस द्या; अंध मातेनं बोलून दाखवली होती भावना
संगीता शिरसाट या वांगणीच्या एका चाळीत भाड्याच्या खोलीत मुलासह वास्तव्यास आहेत. रेल्वेत छोट्यामोठ्या वस्तू विकून त्या चरितार्थ चालवतात. 'मुलगा साहिल हाच माझा एकमेव आधार आहे. त्याला वाचवून मयूर यांनी माझ्यावर खूप उपकार केले आहेत. त्यामुळे त्यांना बक्षीस द्यावं. त्यांचा सन्मान करावा,' अशी भावना संगीता यांनी बोलून दाखवली. संगीता यांचे शब्द खरे ठरले. मयूर यांचा सन्मान झाला. संगीता यांच्या मुलाला वाचवणाऱ्या मयूर यांनी बक्षीसातील निम्मी रक्कम त्यांनाच देऊन आपल्यातील माणुसकीचा प्रत्यय दिला.