Crime News : मुंब्र्यात MD ड्रग्ज हस्तगत, नायजेरीयन व्यक्तीसह चौघांना बेड्या
By रणजीत इंगळे | Published: September 7, 2022 05:31 PM2022-09-07T17:31:48+5:302022-09-07T17:33:52+5:30
मिळालेल्या मुद्देमालानंतर पोलिसांनी या तिघांच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करून अटक केली आहे
ठाणे - जिल्ह्यातील मुंब्रा पोलिसांनीअमली पदार्थ विक्री करणाऱ्या एका नायजेरियन व्यक्तीसह चार जणांना बेड्या ठोकल्या आहेत. अटक आरोपींकडून पोलिसांनी ८१ ग्रॅम वजनाचे मोफेड्रीन (एमडी) ड्रग्ज हस्तगत केले. हे मोफेड्रीन ड्रग्ज आरोपींनी कुठून आणले याची पुढे विक्री कोणाला करण्यात येणार होती याची चौकशी सध्या मुंब्रा पोलीस करत आहेत.
अंमली पदार्थाच्या सेवनामुळे तरुण पिढी व्यसनाच्या आहारी जाऊ लागली आहे. ठाण्यातील मुंब्रा परिसरात अंमली पदार्थ सेवनाच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. याच्यावर आळा बसावा यासाठी मुंब्रा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कडलग अमली पदार्थाचे सेवन करणे आणि विक्री करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. यावेळी वरिष्ठांच्या सूचनेनुसार मुंब्रा पोलिसांनी गुप्त बातमीदारांच्या मदतीने मुंब्रा येथील दत्तूवाडी पेट्रोल पंप येथे सापळा रचून तीन जणांना ताब्यात घेतले, त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडून २६ ग्रॅम वजनाचे मोफेड्रीन (एमडी) ड्रग्ज जप्त केले.
मिळालेल्या मुद्देमालानंतर पोलिसांनी या तिघांच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करून अटक केली आहे. अकदस सलीम शेख २३ वर्षे, सैय्यद नेहाला मोहम्मद हाफरोज २० वर्षे आणि मुदस्सीर मोईनोद्दीन खान २२ अशी या अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या आरोपींची कसून चौकशी केली असता या तिघांनी एका नायजेरियन व्यक्तीकडून हे मोफेड्रीन खरेदी करून विक्री करण्यासाठी आणल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. त्यानंतर, पोलिसांनी सापळा रचून मुंब्रा येथील रेतीबंदर २ गणेश घाट येथून ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता मुंब्रा पोलिसांना त्याच्याकडून ५५ ग्राम वजनाचे मोफेड्रीन ड्रग्ज आढळून आले. त्यानंतर पोलिसांनी त्या नायजेरियन व्यक्तीला देखील अटक करून पुढील कारवाई सुरु केली आहे.
केलीचिकू एझे फ्रान्सिस असे या अटक केलेल्या ३० वर्षीय नायजेरियन व्यक्तीचे नाव असून तो पालघर जिल्ह्यातील नालासोपारा परिसरात वास्तव्य करत होता. या प्रकरणी पोलिसांनी एकूण ८१ ग्रॅम वजनाचे मोफेड्रीन ड्रग्ज जप्त केले असून त्यांना न्यायालयात हजार केले असता न्यायालयाने या आरोपींना ७ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. आता हे अमली पदार्थ या आरोपींनी कोणाकडून घेतले याचा तपास मुंब्रा पोलीस करत आहेत.