कोरोनाच्या प्रादुर्भावात ४०० लोकांची जेवणाची व्यवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 04:42 AM2021-05-07T04:42:31+5:302021-05-07T04:42:31+5:30
ठाणे : सध्याच्या कोरोना काळात अनेकांना ऑक्सिजन, बेड, इंजेक्शन अशा प्राथमिक सुविधांसाठी झगडावे लागत आहे. त्यांची होणारी धावपळ, जीव ...
ठाणे : सध्याच्या कोरोना काळात अनेकांना ऑक्सिजन, बेड, इंजेक्शन अशा प्राथमिक सुविधांसाठी झगडावे लागत आहे. त्यांची होणारी धावपळ, जीव वाचविण्यासाठी होणारी घालमेल, दिवसभर करावी लागणारी वणवण यामुळे दोनवेळच्या जेवणाचीही अनेकांची भ्रांत होत आहे. तर वाढत्या रुग्णांमुळे आरोग्य कर्मचाऱ्यांनाही उसंत मिळत नसल्याची परिस्थिती आहे. अशांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी श्यामलाल नायर चॅरिटेबल ट्रस्ट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जनहित व विधीचे शहराध्यक्ष स्वप्नील महिंद्रकर यांच्या विद्यमाने ठाण्यातील करोना पॉझिटिव्ह रुग्ण, त्यांचे नातेवाईक, लसीकरण केंद्र तसेच अँटिजेन टेस्टिंग केंद्र, अंगणवाडी सेविका, स्मशानभूमीतील कर्मचारी अशा ४०० लोकांची जेवणाची मोफत सुविधा करून सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न केला आहे.
ठाण्यातील रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आल्यावर उपचारासाठी रुग्णालयात दाखल होतात, तर काही नातेवाईक विलगीकरण कक्षात उपचार घेत आहेत. अशा कुटुबियांना जेवणाची समस्या येऊ नये, यासाठी श्यामलाल नायर चॅरिटेबल ट्रस्ट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जनहित व विधीने मदतीचा हात पुढे केला आहे. याचबरोबर अंत्यसंस्कारासाठी असलेल्या जवाहर बाग स्मशानभूमी तसेच कळवातील मनीषानगर परिसरात असलेल्या स्मशानभूमीमधील कर्मचाऱ्यांना गेल्या दहा दिवसांपासून जेवणाची सोय करून देण्यात येत आहे. याशिवाय ठाण्यातील लसीकरण केंद्रावर येणाऱ्या लोकांनादेखील पाण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. आजघडीला कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिथे डॉक्टर्स, परिचारिका, स्मशानभूमीतील कर्मचारी तसेच इतर फ्रंटलाईन वर्कर्स स्वत:चा जीव धोक्यात घालून रुग्णांचा जीव वाचविण्यासाठी धडपडत आहेत, अशा पालिका कर्मचाऱ्यांनाचा विचार मात्र पालिकेने केलेला नाही. केवळ विलगीकरण कक्षामध्येच जेवणाची सुविधा असून, अहोरात्र इतर ठिकाणी काम करणाऱ्यांचा मात्र विचार करायला प्रशासन विसरली आहे. या सामाजिक कार्याच्या माध्यमातून अधिकाधिक गरजू लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत असून, जर कोणात्याही पॉझिटीव्ह किंवा विलगीकरण असलेल्या व्यक्तीला जेवणाची सुविधा आवश्यक असल्यास त्यांनी ९८९२०९०८४७ यावर संपर्क साधावा. आवश्यक त्या व्यक्तींना घरपोच मोफत जेवणाची सुविधा करून दिली जाईल, असे महिंद्रकर यांनी सांगितले.