गोवर रुग्ण आटोक्यात, रुग्ण संख्या स्थिरावली
By अजित मांडके | Published: December 6, 2022 05:38 PM2022-12-06T17:38:57+5:302022-12-06T17:39:30+5:30
लागण झालेल्या एकूण रुग्णांपैकी आतापर्यंत २ जणांचा मृत्यू झाला असून ५८ रुग्णांवर उपचार करुन घरी सोडण्यात आले आहे. तर २१ रुग्णांवर सध्या उपचार सुरु असल्याची माहिती पालिकेने दिली आहे.
ठाणे : ठाणे महापालिका हद्दीत नोव्हेंबर महिन्यात गोवरच्या रुग्णांची संख्या वाढत होती. मात्र आता डिसेंबरमध्ये रुग्ण संख्या स्थिरावल्याचे चित्र आहे. त्यानुसार महापालिका हद्दीत आजच्या घडीला ८१ जणांना गोवरची लागण झाली असल्याचे दिसून आले. तर ५२४ रुग्ण हे संशयीत आढळले आहेत. लागण झालेल्या एकूण रुग्णांपैकी आतापर्यंत २ जणांचा मृत्यू झाला असून ५८ रुग्णांवर उपचार करुन घरी सोडण्यात आले आहे. तर २१ रुग्णांवर सध्या उपचार सुरु असल्याची माहिती पालिकेने दिली आहे. तसेच डिसेंबर महिन्यात ३ रुग्ण वाढल्याचे दिसून आले आहे.
ठाणे महापालिका हद्दीत मागील काही दिवसापासून गोवर बाधीत रुग्णांच्या संख्येत वाढ होतांना दिसत होती. नोव्हेंबरमध्ये सर्वाधिक ३० जणांना याची लागण झाल्याचे दिसून आले. ऑगस्ट -३, सप्टेंबर -९, ऑक्टोबर - १५ आणि आता डिसेंबरमध्ये २६ जणांची तपासणी केली असता, त्यातील ३ जणांना गोवरची लागण झाल्याचे दिसून आले. त्यातही एकूण ८१ पैकी १५ रुग्ण हे महापालिका हद्दीबाहेरील असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे.
या वयोगटाला बसला फटका -
वयोगट - रुग्णसंख्या
० ते १ - १६
१ ते २ - १३
२ ते ५ - १२
५ ते १४ - १७
१४ ते १८ - १
१८ वयोगटापुढील - १
आतार्पयत ४०४८८६ घरांचा झाला सर्व्हे -
ठाणे महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत १६० जणांची टिम तयार करण्यात आली आहे. त्यात ४१८ जणांचा समावेश आहे. या पथकांच्या माध्यमातून रोजच्या रोज १२५ घरांचा सव्र्हे केला जात असून आतार्पयत ४०४८८६ घरांचा सव्र्हे करण्यात आला आहे. यात ५२४ जण हे संशयीत आढळून आले आहेत.
२६२७ जणांचे झाले लसीकरण
ठाणे महापालिकेच्या माध्यमातून गोवरला आळा घालण्यासाठी घरोघरी सव्र्हे सुरु झाला आहे. मागील काही दिवसात रुग्णांची संख्या स्थिरावल्याचे दिसून आले आहे. तर लसीकरण मोहीमेवर भर दिला जात आहे. त्यानुसार आतार्पयत २६२७ जणांचे लसीकरण करण्यात आले आहे.
या भागात रुग्णांचे प्रमाण अधिक -
गोवरच्या रुग्णांची संख्या ही ठाण्यातील मुंब्रा, कौसा, शीळ, एमएम व्हॅली या भागात अधिक दिसून आले आहे. त्या खोलाखाल आतकोनेश्वर नगर, कळवा भागातही गोवर रुग्ण आढळून आले आहेत. परंतु मागील काही दिवसात गोवर रुग्णांची संख्या स्थिरावल्याचे दिसून आले आहे.