जिल्ह्यात आता यांत्रिक भातशेती
By admin | Published: July 16, 2016 01:45 AM2016-07-16T01:45:53+5:302016-07-16T01:45:53+5:30
जिल्ह्यातील भातपीक हे शेतीतील प्रमुुख उत्पादन आहे. उत्पन्नाच्या ९० टक्के खर्च यासाठी काम करणाऱ्या मजुरांवर असे. पण, हा खर्च सध्या परवडणारा नाही
ठाणे : जिल्ह्यातील भातपीक हे शेतीतील प्रमुुख उत्पादन आहे. उत्पन्नाच्या ९० टक्के खर्च यासाठी काम करणाऱ्या मजुरांवर असे. पण, हा खर्च सध्या परवडणारा नाही. यामुळे जिल्ह्यात भातरोवणी, मळणी आणि कापणीसाठी आता खास यांत्रिक पद्धतीचा वापर केला जात असून जिल्हा परिषदेकडून महिला बचत गटांना यासाठी यंत्रे उपलब्ध करून दिली जात आहेत. अशाच एका यंत्रावर पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्यक्ष भातरोवणी करून या फायदेशीर भातशेती व बारमाही शेतीसाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे सूतोवाच केले.
कृषी विभागाद्वारे जिल्हा कृषी अधिकारी महावीर जंगटे यांच्या नेतृत्वाखाली भिवंडी तालुक्यातील तळवली येथे सिमेंटचा बंधारा बांधला आहे. त्यातील पाण्याचे शिंदे यांनी जलपूजन करून वडवली येथे भातरोवणी यंत्रावर बसून चिखलणीत प्रत्यक्ष भातरोवणी केली. जमीन तयार करणे, चिखलणी, लावणी, काढणी, मळणी या प्रत्येक कामासाठी मजूर लागतात. मात्र, या यंत्रामुळे लावणीच्या खर्चात ५० टक्के, तर मजुरीच्या ७५ टक्के खर्चात बचत होते. एका दिवसात तीन एकरमध्ये या यंत्राद्वारे लावणी केली असून अर्धा लीटर डिझेलमध्ये एक तास भातरोवणी केली जात असल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी या वेळी सांगितले.
भातलावणीपासून ते काढणीपर्यंत एकंदर ८७ मजूर प्रतिदिन लागतात. ३५० रुपये प्रतिदिन मजुरीप्रमाणे एका दिवसासाठी या मजुरांचा खर्च हेक्टरी ३० हजार ४५० रु पये येतो. संपूर्ण ठाणे जिल्ह्यात ६० हजार ७१७ हेक्टर जमिनीवर भाताची लागवड केली जाते. उत्पादन खर्चाच्या ९० टक्के खर्च हा मजुरीवर जातो. तो कायमस्वरूपी टाळण्यासाठी या यंत्राचा वापर करून महिला बचत गटांच्या ग्रामसंघांना रोजगार मिळवून दिल्याचे जिल्हा परिषद कृषी विकास अधिकारी प्रफुल्ल बनसोडे यांनी सांगितले.
जिल्हा परिषदेने आपल्या सेस निधीतून औजारे बँक ही नावीन्यपूर्ण योजना जिल्ह्यात आणली आहे. ग्रामीण भागातील नोंदणीकृत महिला बचत गटांचे ग्रामसंघ निवडून त्यांना जास्तीतजास्त सात लाख रु पयांपर्यंत अनुदान देऊन औजारे उपलब्ध करून दिली जातात. यंदाही दोन कोटी खर्चून या यंत्रांची खरेदी केली जाणार आहे.