भिवंडीतील टावरे स्टेडियमवर भरणार मीना बाजार; जत्रेच्या परवानगीमुळे खेळाडू नाराज
By नितीन पंडित | Published: December 5, 2023 07:03 PM2023-12-05T19:03:10+5:302023-12-05T19:03:59+5:30
नागरिकांसह खेळाडूंमध्ये नाराजी तर स्टेडियमचे नाव जाणीवपूर्वक बदलण्याचा आयोजकांचा खोडसाळपणा
नितीन पंडित, लोकमत न्यूज नेटवर्क, भिवंडी: शहराच्या मध्यभागी असलेल्या स्व. परशुराम धोंडू टावरे स्टेडियमवर महापालिका प्रशासनाच्या वतीने मीना बाजार या जत्रेला परवानगी दिल्याने नागरिकांसह क्रीडाप्रेमी व खेळाडूंमध्ये मनपा प्रशासना विरोधात तीव्र नाराजी पसरली आहे. विशेष म्हणजे या स्टेडियमला स्वर्गीय परशुराम धोंडू टावरे असे नाव असताना आज मंगळवारी टावरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त मीना बाजाराच्या आयोजकांनी शहरभर या स्टेडियमचे नाव धोबी तलाव स्टेडियम असा स्टेडियमचा उल्लेख करणारे बॅनर सर्वत्र झळकवले असल्याने टावरे परिवारासह नागरिकांमध्ये प्रचंड चीड व संताप पसरला असून याप्रकरणी भिवंडी मनपाचे माजी नगरसेवक तथा माजी विरोधी पक्षनेता यशवंत जयराम टावरे यांनी महापालिका आयुक्तांना यासंदर्भात लेखी पत्र देऊन या मीना बाजार जत्रेस विरोध दर्शविला आहे.
महापालिका प्रशासनाच्या वतीने बांधण्यात आलेल्या या क्रिकेट मैदानाकडे मनपा प्रशासनाचे अक्षरशः दुर्लक्ष झाले असून खेळाडूंना खेळण्यासाठी कोणतीही सुविधा पुरविण्यात येत नसल्याने खेळाडूंमध्ये नेहमीच नाराजी असते. आता महापालिका प्रशासनाने ७ डिसेंबर ते ११ डिसेंबर असे पाच दिवस या ठिकाणी मीना बाजार या जत्रेला परवानगी दिली आहे. या जत्रेत परवानगी दिल्यामुळे या ठिकाणी खाद्यपदार्थांचे स्टॉल लागणार असून खेळण्याची दुकाने तसेच आकाश पाळणे या ठिकाणी लावण्यात आली आहे. बाली नावाच्या इसमाने महापालिकेची परवानगी घेऊन हि जत्रा भरवली असल्याचे पालिका वर्तुळातून सांगण्यात येत आहे. मात्र खेळाच्या मैदानावर अशा प्रकारे महापालिका प्रशासनाने जत्रेसाठी परवानगी कशी दिली असा सवाल शहर राहतील नागरिक विचारत आहेत.