मीरा भाईंदर : पालिकेच्या 8 समित्या भाजपाच्याच हाती
By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2017 09:10 PM2017-11-18T21:10:32+5:302017-11-18T21:11:07+5:30
मीरा-भार्इंदर महापालिकेच्या स्थायीसह महिला व बालकल्याण समिती आणि सहा प्रभाग समित्या भाजपाने बहुमताच्या जोरावर हाती राखल्याने त्यातील सर्व सभापती पदे व महिला, बाल कल्याण समितीचे उपसभापती पदावर पक्षाच्याच सदस्यांची वर्णी लावण्यात यश मिळविले.
राजू काळे/भार्इंदर - मीरा-भार्इंदर महापालिकेच्या स्थायीसह महिला व बालकल्याण समिती आणि सहा प्रभाग समित्या भाजपाने बहुमताच्या जोरावर हाती राखल्याने त्यातील सर्व सभापती पदे व महिला, बाल कल्याण समितीचे उपसभापती पदावर पक्षाच्याच सदस्यांची वर्णी लावण्यात यश मिळविले. पालिकेत एकूण ९५ सदस्यांपैकी भाजपाचे ६१, सेनेचे २२ तर काँग्रेस लोकशाही आघाडीचे १२ सदस्य निवडुन आले आहेत. त्यातील भाजपाकडे बहुमत असल्याने एकहाती सत्तेमुळे सेना, काँग्रेसचा विरोध मावळून भाजपाची सभागृहात सरशी होत आहे. बहुमतामुळे भाजपाचे प्रत्येक समितीतील सदस्यसंख्या विरोधकांच्या दुपटीने असल्याने त्यावरही भाजपाचेच वर्चस्व सिद्ध झाले आहे.
त्यानुसार शनिवारी या आठ समित्यांच्या सभापती पद व महिला, बाल कल्याण समिती उपसभापती पदाची निवडणुक घेण्यात आली. हि निवडणुक पीठासीन अधिकारी म्हणुन पालघर जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या नियंत्रणाखाली पार पाडण्यात आली. सकाळी ११ वाजता सुरु झालेली निवडणुक सायंकाळी ४ वाजता संपुष्टात आली. त्यात प्रभाग समिती १ मध्ये भाजपाचे जयेश भोईर यांना एकूण ११ मतांपैकी ७ तर सेनेच्या बांड्या एलायस यांना ४ मते मिळाल्याने भोईर यांची सभापती निवड झाली.
प्रभाग समिती २ मध्ये सर्वच्या सर्व जागा भाजपाच्याच असल्याने भाजपाचे डॉ. राजेंद्र जैन यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाला होता. त्यामुळे त्यांची सभापती पदी बिनविरोध निवड झाल्याचे जाहिर करण्यात आले. प्रभाग समिती ३ मध्ये भाजपाचे गणेश शेट्टी यांना एकुण २० पैकी ११ व सेनेच्या अर्चना कदम यांना ९ मते मिळाल्याने शेट्टी यांची सभापती निवड झाल्याचे जाहिर करण्यात आले. प्रभाग समिती ४ मध्ये भाजपाच्या संजय थेराडे यांना एकूण २० पैकी १२ तर सेनेच्या स्रेहा पांडे यांना ८ मते मिळाल्याने थेराडे यांची सभापती पदी निवड झाली.
प्रभाग समिती ५ मध्ये भाजपाच्या अश्विन कासोदरिया यांना एकुण १२ पैकी ७ तर काँग्रेसच्या उमा सपार यांना ५ मते मिळाल्याने अश्विन हे सभापती पदी विजयी ठरल्याचे जाहीर करण्यात आले. प्रभाग समिती ६ मध्ये भाजपाचे आनंद मांजरेकर यांना एकूण २० पैकी १२ तर सेनेच्या कमलेश भोईर यांना ८ मते मिळाल्याने मांजरेकर यांची सभापती पदी निवड झाली. स्थायी समिती सभापती पदाच्या निवडणुकीत भाजपाचे ध्रुवकिशोर पाटील यांना एकुण १६ पैकी १० तर सेनेच्या तारा घरत यांना ६ मते मिळाल्याने पाटील यांची सभापती पदी निवड झाल्याचे जाहिर करण्यात आले.
महिला व बाल कल्याण समितीच्या सभापती पदाच्या निवडणुकीत भाजपाच्या शानू गोहिल यांना १० तर काँग्रेसच्या रुबीना शेख यांना ५ मते तसेच उपसभापती पदाच्या निवडणुकीत भाजपाच्या सीमा शाह यांनाही १० व सेनेच्या कुसूम गुप्ता यांना ५ मते मिळाली. सर्व निवडणुकांत सेना व काँग्रेस सदस्यांनी अर्ज मागे न घेता एकमेकांच्या उमेदवारांना मते दिली. तर प्रभाग समिती २ मधील निवडणुकीवेळी भाजपाचे मोरस रॉड्रिक्स हे अनुपस्थित राहिले होते.