मीरा-भार्इंदर महापालिका: स्थायी समिती सभापतीपदाची शनिवारी निवडणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2017 01:34 AM2017-11-16T01:34:47+5:302017-11-16T01:35:00+5:30
मीरा-भार्इंदर महापालिकेच्या स्थायीसह सहा प्रभाग व महिला, बालकल्याण समितीच्या सभापतीपदाची निवडणूक शनिवारी होणार आहे.
भार्इंदर : मीरा-भार्इंदर महापालिकेच्या स्थायीसह सहा प्रभाग व महिला, बालकल्याण समितीच्या सभापतीपदाची निवडणूक शनिवारी होणार आहे. या समित्यांच्या ८ सभापतीपदांसाठी एकूण २३, तर महिला व बालकल्याण समिती उपसभापतीपदासाठी दोन उमेदवारांचे अर्ज मंगळवारी नगरसचिव वासुदेव शिरवळकर यांच्याकडे दाखल करण्यात आले.
यंदाच्या निवडणुकीत सर्वच समित्यांवर भाजपाचेच वर्चस्व असल्याने त्यातील सभापतीपद भाजपालाच मिळणार असून महिला व बालकल्याण समितीचे उपसभापतीपदही भाजपाच्याच वाट्याला जाणार आहे. तत्पूर्वी एकूण सहा प्रभाग समित्यांतील प्रभागरचनेचा प्रस्ताव प्रशासनाकडून १६ आॅक्टोबरच्या महासभेत मान्यतेसाठी सादर करण्यात आला होता. त्यावेळी प्रभाग समिती ३ मध्ये प्रभाग समिती ४ अंतर्गत असलेला प्रभाग १० समाविष्ट करण्याची सूचना सेनेच्या सदस्यांकडून करण्यात आली होती.
यामुळे भाजपाची सदस्य संख्या कमी होऊन त्यात सेनेचे वर्चस्व वाढणार असल्याचे लक्षात येताच भाजपाने त्याला विरोध करून प्रशासनाचा प्रभाग समिती ३ व ४ चा प्रस्ताव बहुमताच्या जोरावर जैसे थे ठेवला. यामुळे प्रभाग ३ मधील सेनेच्या वर्चस्वाची खेळी धुळीला मिळून त्यावर भाजपाचेच वर्चस्व कायम राहिले. तसेच मीरा रोडमधील प्रभाग समिती ५ मध्ये काँग्रेसचे वर्चस्व असल्याचे स्पष्ट झाल्याने भाजपाने काँग्रेसचे बालेकिल्ले ठरलेले प्रभाग ९ व १९ प्रभाग ५ मधून थेट प्रभाग समिती ६ मध्ये समाविष्ट करण्याचा ठराव मांडला. त्याला भाजपाने बहुमताच्या जोरावर मंजूर केल्याने काँग्रेसचा प्रभाग ५ मधील सभापतीपदावरील दावा धुळीस मिळाला.
उर्वरित प्रभाग समिती १ व २ मध्ये भाजपाचेच वर्चस्व असल्याने त्यासह सर्वच प्रभागांत भाजपाचेच सभापती विराजमान होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
स्थायी समितीतही एकूण १६ सदस्यांपैकी भाजपाचे १० सदस्य असल्याने सर्व समित्यांवर भाजपाचेच वर्चस्व राहणार आहे. या समित्यांच्या सभापतीपदासह महिला व बालकल्याण समितीच्या उपसभापतीपदाची निवडणूक येत्या १८ नोव्हेंबरला पार पडणार असून त्यासाठी पालघरचे जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे हे पीठासीन अधिकारी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
मतदानाला सकाळी ११ पासून सुरुवात होणार आहे. स्थायीसाठी भाजपाचे ध्रुवकिशोर पाटील, तर सेनेच्या तारा घरत यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले.
प्रभाग समिती १ साठी भाजपाचे जयेश भोईर व सेनेचे बांड्या एलायस, प्रभाग २ साठी भाजपाचे डॉ. राजेंद्र जैन यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने या प्रभागातील निवडणूक बिनविरोध ठरली आहे.
प्रभाग ३ साठी भाजपाचे गणेश शेट्टी, तर सेनेच्या अर्चना कदम, ४ साठी भाजपाचे संजय थेराडे, तर सेनेच्या स्नेहा पांडे, ५ साठी भाजपाचे अश्विन कासोदरिया तर काँग्रेसच्या उमा सपार व ६ साठी भाजपाचे आनंद मांजरेकर तर सेनेचे कमलेश भोईर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले.