मीरा-भार्इंदरचा कौल : आयारामच ठरले निर्णायक, भाजपापाठोपाठ शिवसेनेवर ‘बाहेरच्यांचे’ वर्चस्व
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2017 03:41 AM2017-08-23T03:41:59+5:302017-08-23T03:42:21+5:30
मीरा-भार्इंदर महापालिकेच्या अनपेक्षित निकालात भाजपाने घेतलेली झेप ही २९ आयारामांच्या जिवावर असल्याचे प्रत्यक्ष यादीवरून स्पष्ट झाले आहे. यातील बहुतांश राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेनेतून आयात केलेले आहेत.
मीरा रोड : मीरा-भार्इंदर महापालिकेच्या अनपेक्षित निकालात भाजपाने घेतलेली झेप ही २९ आयारामांच्या जिवावर असल्याचे प्रत्यक्ष यादीवरून स्पष्ट झाले आहे. यातील बहुतांश राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेनेतून आयात केलेले आहेत.
शिवसेनेचे सदस्य २२ असले तरी त्यातील १२ नगरसेवक हे बाहेरून आलेले; तर काँग्रेसच्या १२ पैकी चार नगरसेवक हेही अन्य पक्षांमधील आहेत. त्यामुळे भाजपा, शिवसेना, काँग्रेस या प्रमुख पक्षांचा विजय हा पक्षापेक्षा निवडून येण्याच्या क्षमतेचा विजय असल्याचे दिसून आले.
भाजपाच्या २९ आयात विजयी नगरसेवकांपैकीसर्वाधिक राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत. त्यातील अशोक तिवारी, ध्रुवकिशोर पाटील, सुरेश खंडेलवाल, वंदना मंगेश पाटील, परशुराम म्हात्रे नगरसेवक होते. शिवाय राष्ट्रवादीतून आलेले चंद्रकांत वैती, ज्योत्स्रा हसनाळे, डॉ. प्रिती पाटील, अरविंद शेट्टी, दरोगा उर्फ पंकज पांडेय, अनिता मुखर्जी, नयना म्हात्रे, वीणा सूर्यकांत भोईर, सुजाता पारधी, दीपाली मोकाशी, हेमा बेलानी असे ११ जण आता नगरसेवक झाले आहेत.
वीणा यांचे पती सूर्यकांत हे भुजबळ समर्थक म्हणून ओळखले जातात. उमेदवारीसाठी ते शिवसेनेत गेले, पण त्यांच्या पत्नीला भाजपाने तिकीट दिले. सुजाता पारधी यांचा भाऊ राष्ट्रवादीचा कार्यकर्ता होता. हेमा बेलानी यांचे पती राजेश राष्ट्रवादीत होते. अरविंद शेट्टी हे पूर्वी गिल्बर्ट मेन्डोन्सा समर्थक होते. प्रभात पाटील, शानू गोहिल, सुनिता भोईर यांनी कॉँग्रेसमधून येऊन भाजपाच्या तिकिटावर निवडणूक जिंकली. यातील पाटील पाच वेळा काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आल्या होत्या; तर गोहिल व भोईर या काँग्रेसच्या माजी नगरसेविका होत्या. अनिल विराणी, हेतल परमार, सचिन केसरीनाथ म्हात्रेदेखील काँग्रेसमधून आले आणि भाजपाचे नगरसेवक झाले. विराणी यांच्या पत्नी रेखा मागच्या वेळी काँग्रेसच्या नगरसेविका होत्या. गेल्या निवडणुकीत भाजपाच्या गीता जैन यांच्यासमोर अपक्ष उमेदवार म्हणून लढलेल्या रीटा शहा यंदा भाजपातून निवडून आल्या. अपक्ष म्हणून मागील निवडणूक हरलेले गणेश शेट्टी, विनोद म्हात्रेदेखील भाजपाच्या कमळावर निवडून आले. मागील अपक्ष मुन्ना सिंग या वेळी भाजपाच्या तिकिटावर जिंकले; तर मनसेच्या तिकिटावर पराभूत झालेले जयेश भोईर यंदा भाजपाच्या पॅनलमधून निवडून आले. अॅड. रवी व्यास मागील निवडणुकीत राष्ट्रवादीतून जिंकले. दोन वर्षात ते भाजपात गेले. पोटनिवडणुकीत विजयी झाले होते. दरोगा पांडेय हे व्यास यांचेच समर्थक आहेत.
संबंधित वृत्त/४
काँग्रेसमध्ये चौघे
काँग्रेसमधूनही चौघे आयाराम निवडून आले असून गेल्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर नगरसेवक झालेले नरेश पाटील काँग्रेसमध्ये गेले आणि निवडून आले. शिवाय राष्ट्रवादीच्या पदाधिकारी रुबिना शेख, गेल्यावेळच्या राष्ट्रवादीच्या नगरसेविका शबनम लियाकत शेख यांचा दीर अमजद तसेच राष्ट्रवादीचे समर्थक केबल व्यावसायिक राजीव मेहरादेखील यंदा काँग्रेसमधून निवडणूक लढवून विजयी झाले.
मूळच्या शिवसेनेची संख्या घटली
शिवसेनेनेमध्येही मोठ्या संख्येने आयाराम निवडून आले आहेत. शिवसेनेची सदस्यसंख्या गेल्यावेळच्या १४ वरून यंदा २२ झाली आहे. त्यातील १२ जण अन्य पक्षांतून आले असल्याने त्या पक्षाची मूळ संख्या आयारामांशी तुलना करता अवघी १० झाली आहे.
त्यामुळे पक्षाच्या नगरसेवकांच्या गटावर आयारामांचे वर्चस्व निर्माण झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेनेत आलेल्या नगरसेवकांपैकी कॅटलीन परेरा, वंदना विकास पाटील, अनिता पाटील, हेलन जॉर्जी गोविंद, कमलेश भोईर हे निवडून आले आहेत.
काँग्रेसमधून आलेले नगरसेवक दिनेश नलावडे व शर्मिला बगाजी, भाजपामधून आलेल्या नगरसेविका दिप्ती भट; तर माजी भाजपा नगरसेविका स्रेहा पांडे, बहुजन विकास आघाडीमधून आलेले नगरसेवक दाम्पत्य राजू आणि भावना भोईर; तसेच मनसेतून आलेल्या अर्चना अरुण कदमही शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आल्या आहेत.