मीरा - भार्इंदर पालिकेचा खोटारडेपणा
By admin | Published: June 23, 2017 05:42 AM2017-06-23T05:42:49+5:302017-06-23T05:42:49+5:30
नालेसफाईच्या नावाखाली मुर्धा खाडी किनाऱ्यावरील तब्बल सव्वाशेपेक्षा अधिक कांदळवनाच्या झाडांची बेकायदा कत्तल मीरा- भार्इंदर महापालिकेने केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
मीरा रोड : नालेसफाईच्या नावाखाली मुर्धा खाडी किनाऱ्यावरील तब्बल सव्वाशेपेक्षा अधिक कांदळवनाच्या झाडांची बेकायदा कत्तल मीरा- भार्इंदर महापालिकेने केली. पालिका व सरकारच्या कांदळवन विभागाच्या अधिकाऱ्यांनी खोटा पंचनामा
तयार करून उच्च न्यायालयास केवळ आठ झाडेच तोडल्याची माहिती दिल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे.
शहरातील सांडपाणी सर्रास खाडी व खोचीमध्ये सोडलेले आहे. या सांडपाण्यासोबत शहरातील प्लास्टिक पिशव्या, बाटल्या, कचरा आदी वाहून खाडी वा कंदळवनात जातो. पालिकेने या खाड्या व खोची चक्क नाले असल्याची बतावणी करुन सरकार व न्याययंत्रणेची दिशाभूल केली आहे.
पालिकेने कांदळवन व पाणथळ क्षेत्राचा सातत्याने ऱ्हास चालवला असून अधिकारी, कंत्राटदारावर गुन्हे दाखल झाले आहेत. त्यातच पालिकेने बंदिस्त व पक्के नाले बांधण्याची टूम काढली आहे. पहिल्या टप्प्यात अंतर्गत नाले व काही कांदळवनातील नाले बंदिस्त केले.
शिवाय काही नाल्यांच्या काँक्रीटीकरणाचा कामाचा घाट घातला आहे. शहरातील खाड्या वा खोची हे नाले असल्याचे सांगून १२ नाल्यांमधील कांदळवनांमुळे साफ सफाई होत नसल्याचा दावा करत ८४ हजार चौरमीटर क्षेत्रातील कांदळवनाची झाडे काढण्याची परवानगी मागणारा अर्ज उच्च न्यायालयात सादर केला.
न्यायालयाच्या आदेशानंतर ९ जूनला कांदळवन विभागाचे अधिकारी, पालिकेच्या आरोग्य विभागाचे उपायुक्त व अधिकारी तसेच दि बॉम्बे एन्वायरमेंट एक्शन ग्रूपच्या प्रतिनिधी यांनी मुर्धा खाडी, जाफरी खाडी, कनकिया परिसर, नवघर खाडी, घोडबंदर खाडी व भार्इंदर पश्चिम खाडीची पाहणी केली होती.
त्यावेळी पाण्याचा प्रवाह सुरळीत असल्याचे तसेच खाडी व परिसरात बेकायदा भराव व बांधकामे झाल्याचे, पाण्याचे मार्ग बंद केल्याचे आढळले. सुनावणीच्यावेळी न्यायालयाने पालिकेला फैलावर घेतले. न्यायायालयाने डेब्रिज, कचरा काढण्याचे आदेश देतानाच गरज पडल्यास झाडांची छाटणी करण्यास परवानगी दिली होती.
महापालिकेने मुर्धा व जाफरी खाडीच्या स्वच्छतेच्यावेळी कांदळवनांची झाडे तोडली. मुर्धा खाडी किनाऱ्यावर कांदळवनाची कापलेली झाडे व फांद्यांचा खचच पडलेला आहे. असे असताना कांदळवन सेलचे विभागीय वन अधिकारी एम.एम.पंडितराव यांच्या सूचनेप्रमाणे वनपाल एस. एस. साळवे यांनी महापालिकेत उपायुक्त डॉ. संभाजी पानपट्टे यांची भेट घेतली. पानपट्टे यांच्या सूचनेनंतर सहायक सार्वजनिक आरोग्य अधिकारी राजकुमार कांबळे व मुख्य आरोग्य निरीक्षक संदीप शिंदे यांनी खाडी भागाची पाहणी केली.
मुर्धा खाडीत कांदळवनाचे ७ ते ८ बुंधे आढळले. झाडे तोडल्याबद्दल स्वच्छता निरीक्षक अरविंद चाळके व पोकलेनचा चालक आझाद अन्सारी यांचे जबाब नोंदवले आहेत. बाज व पोकलेन फिरवण्याची जागा नसल्याने झाडे तोडल्याचे कारण सांगितले. पंचनाम्याच्यावेळी पंच म्हणून कंत्राटदार महेंद्रसिंह राठोड व सुपरवायझर दिनेशकुमार चौधरी यांना घेतले.
दरम्यान, बॉम्बे एन्वायरमेंट अॅक्शन ग्रूपच्या डॉ. श्वेता भट यांनी पंडितराव यांना मुर्धा खाडीत कांदळवनाची झाडे तोडल्याचे फोटो पाठवले होते. तरी देखील पंडितराव यांनी त्याकडे कानाडोळा करत ७ ते ८ झाडेच तोडण्यात आल्याच्या अहवालानुसार उच्च न्यायालयात स्वत:चा अहवाल सादर करत पालिकेला पाठीशी घालण्याचा प्रकार केला.
उपायुक्त पानपट्टे यांनी तर आपल्या अहवालात मुर्धा खाडीत एकही झाड कापले नाही , केवळ झाडांची छाटणी केली अशी खोटी माहिती दिली. पंडितराव व पानपट्टे यांनी न्यायालयाला खोटी माहिती दिली असतानाच सोमवारच्या ‘लोकमत’ मध्ये मुर्धा खाडीत पालिकेने शेकडो कांदळवनाची झाडे तोडल्याची बातमी छायाचित्रासह प्रसिद्ध केली. त्याची दखल उच्च न्यायालयाने घेतली.
मंगळवारी महसूल विभागाचे मंडळ अधिकारी लक्ष्मण पवार, तलाठी गणेश भुताळे यांनी मुर्धा खाडीची पाहणी केली असता सुमारे १२२ कांदळवनाची झाडे कापल्याचे आढळले. पालिका अधिकारी व कांदळवन विभागाच्या अधिकाऱ्यांनी कंत्राटदारास हाताशी धरून बोगस पंचनामा करत खोटा अहवाल न्यायालयास सादर केल्याचे स्पष्ट झाले.