मीरा भाईंदर-वसई विरार पोलीस आयुक्तालयात पोलीस अधिकाऱ्यांमध्ये पदावरून रस्सीखेच
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2025 14:02 IST2025-01-12T14:02:04+5:302025-01-12T14:02:13+5:30
मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्तालयात परत आलेल्या ७ पोलीस निरीक्षकांच्या नियुक्त्या अजून गुलदस्त्यात आहेत.

मीरा भाईंदर-वसई विरार पोलीस आयुक्तालयात पोलीस अधिकाऱ्यांमध्ये पदावरून रस्सीखेच
मीरारोड - मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्तालयात परत आलेल्या ७ पोलीस निरीक्षकांच्या नियुक्त्या अजून गुलदस्त्यात आहेत. तर निवडणूक काळात अन्य भागातून बदली होऊन आलेले आयुक्तालयातील १५ पोलीस ठाण्यांचे प्रभारी आणि काही सेकंड पीआय अश्या सुमारे १९ निरीक्षकांनी त्यांच्या कडील नुकताच दिलेला पोलीस ठाणे प्रभारीचा पदभार काढून घेण्याचा अन्याय होऊ नये म्हणून मॅट मध्ये धाव घेतली आहे. त्यामुळे पोलीस अधिकाऱ्यांमध्ये जुंपल्याचे चित्र आहे.
पोलीस आयुक्तालयात ३ वर्षां पेक्षा जास्त काळ कार्यरत अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याच्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानंतर विलंबाने परंतु आचार संहिता सुरु झाल्यानंतर ३० ऑक्टोबर रोजी पोलीस आयुक्तालयातील ३८ पोलिस निरीक्षक यांच्या बदल्या केल्या गेल्या होत्या. मुंबई आदी भागातून बदली होऊन आलेल्या ३६ पोलीस निरीक्षकांच्या ४ नोव्हेम्बर रोजी मीरा भाईंदर - वसई विरार आयुक्तालयातील विविध पोलीस ठाणे आदी ठिकाणी नियुक्त्या केल्या गेल्या.
मिभा - ववी आयुक्तालयातून बदली झाल्याने अनेक नाराज अधिकारी यांनी मॅट मध्ये धाव घेतली. त्यावर सुनावणीची १४ जानेवारी रोजीची तारीख आहे. दरम्यान पोलीस महासंचालक कार्यालयाने ३१ डिसेंबर रोजी पोलीस निरीक्षकांच्या बदली आदेशाने मिभा - ववी आयुक्तालयातून निवडणूक काळात बदली होऊन गेलेल्या संजय हजारे, जितेंद्र वनकोटी, राजेंद्र कांबळे, चंद्रकांत सरोदे, विलास सुपे, दिलीप राख व सुधीर गवळी ह्या ७ वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची पुन्हा घरवापसी केली.
घरवापसी केल्यानंतर ते अधिकारी ९ जानेवारी रोजी मिभा - ववी आयुक्तालयात हजर झाले आहेत . त्या पोलीस अधिकाऱ्यांना ते आधी कार्यरत असलेली पोलीस ठाणी मिळण्याची आशा आहे. कारण त्यांची झालेली बदली ही अन्यायकारक होती असा त्यांचा दावा आहे.
परंतु मुंबई आदी भागातून विधानसभा निवडणुकीत आलेले पोलीस निरीक्षक यांनी देखील त्यांना पोलीस ठाणे प्रभारी म्हणून असलेली जबाबदारी काढून घेऊन अन्याय करू नये म्हणून मॅट मध्ये दाद मागितली आहे. निवडणूक काळात शासनाचा आदेश मानून आम्ही कुठेही तक्रार न करता नेमणूक दिलेल्या जागी हजर झालो. आता नियुक्ती होऊन केवळ २ महिने होत नाहीत तोच पुन्हा प्रभारी पदावरून काढण्याची आणि परतलेल्या जुन्या अधिकाऱ्यांना नेमण्याची चर्चा त्यांच्यात आहे.
एकूणच पोलीस आयुक्तालयात परत आलेल्या ७ वरिष्ठ निरीक्षकांच्या नियुक्त्या अजून गुलदस्त्यात असतानाच २ महिन्यां पासून पोलीस ठाणे प्रभारी पदावर कार्यरत पोलीस निरीक्षकांनी देखील मॅट मध्ये धाव घेतल्याने पोलीस आयुक्तालयात पोलीस अधिकाऱ्यां मध्येच सामना रंगला आहे. पोलीस आयुक्त मधुकर पांडेय, अपर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे सह पोलीस आस्थापना मंडळ हे योग्य आणि नियमानुसार निर्णय घेऊन विभागातील पोलीस अधिकाऱ्यांना खरंच न्याय कसा देणार? कि कोणावर अन्याय करणार? असे प्रश्न उपस्थित होत आहेत.