मीरा भाईंदरकरांनो नियमित मास्क घाला, महापालिकेचे आवाहन
By धीरज परब | Published: December 25, 2022 05:20 PM2022-12-25T17:20:36+5:302022-12-25T17:21:10+5:30
बैठकीत परदेशातून येणाऱ्या नागरिकांनी कोरोना चाचणी त्वरित करून घ्यावी. शहरातील सर्व सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांना पत्र देऊन त्यांच्या सोसायटीमध्ये जनजागृती करण्याचे ठरले.
मीरारोड - मीरा भाईंदर महापालिकेने शहरातील नागरिकांना नियमित मास्क घालण्याचे आवाहन केले आहे. पालिकेने कोरोना बाबत आढावा बैठक घेऊन विविध उपाययोजना करण्याचा निर्णय घेतला आहे. आयुक्त दिलीप ढोले यांच्या निर्देशानंतर अतिरिक्त आयुक्त डॉ. संभाजी पानपट्टे, उपायुक्त संजय शिंदे, मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नंदकिशोर लहाने यांच्यासह वैद्यकीय अधिकारी आदींच्या उपस्थितीत आढावा बैठक घेण्यात आली.
बैठकीत परदेशातून येणाऱ्या नागरिकांनी कोरोना चाचणी त्वरित करून घ्यावी. शहरातील सर्व सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांना पत्र देऊन त्यांच्या सोसायटीमध्ये जनजागृती करण्याचे ठरले. बंद करण्यात आलेले कोव्हिड सेंटर हे पुन्हा सुसज्ज ठेवण्याच्या सूचना देण्यात संबंधितांना दिल्या गेल्या.
कोरोना पसरू नये म्हणून खबरदारीसाठी गर्दीच्या ठिकाणी नागरिकांनी मास्क घालण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कोव्हिड बूस्टर डोस तसेच १८ वर्षांवरील नागरीकांकरिता लसीचे दोन्ही डोस पुन्हा सुरू करण्यात आले आहेत.
कोव्हिडबाबत कोणत्याही प्रकारची अफवा पसरवून भीतीचे वातावरण निर्माण करू नये अन्यथा कारवाई केली जाईल पालिकेने दिला आहे.
कोविशील्ड नसल्याने बूस्टर पासून नागरिक वंचित
मीरा भाईंदर महापालिकेने कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम सुरु केली आहे. शिवाय बूस्टर डोस सुद्धा दिला जात आहे. परंतु पालिके कडे कोविशील्ड ची लस नसल्याने पालिकेच्या लसीकरण केंद्रांवर नागरिक बूस्टर डोस पासून वंचित आहेत. कोविशील्ड चा दुसरा डोस वा बूस्टर डोस घेण्यासाठी नागरिकांना खाजगी रुग्णालयात पैसे मोजून लस घेण्याची पाळी आले आहे. शासना कडूनच कोविशील्ड लस आलेली नसल्याने ती आल्या नंतर पालिका केंद्रावर ती मोफत दिली जाईल असे पालिका सूत्रांनी सांगितले.