मीरा भाईंदरमध्ये प्लॅस्टिकविरोधात पुन्हा कारवाई सुरु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2018 05:03 PM2018-09-27T17:03:45+5:302018-09-27T17:04:08+5:30
सुमारे 325 किलो प्लॅस्टिक जप्त करून लाखभर रुपयांचा दंड वसूल केल्याची माहिती उपायुक्त डॉ . संभाजी पानपट्टे यांनी दिली आहे .
मीरारोड - प्लॅस्टिक, थर्माकॉल बंदीची कारवाईच 3 जुलै पासून गुंडाळणाऱ्या मीरा भाईंदर महापालिकेने आज गुरुवार 27 सप्टेंबर पासून पुन्हा कारवाईला सुरवात केली. आजच्या दिवशी एका प्लॅस्टिक पिशव्या आदीच्या घाऊक विक्रेत्यासह विविध ठिकाणी केलेल्या कारवाईत सुमारे 325 किलो प्लॅस्टिक जप्त करून लाखभर रुपयांचा दंड वसूल केल्याची माहिती उपायुक्त डॉ . संभाजी पानपट्टे यांनी दिली आहे .
राज्य शासनाने प्लॅस्टिक पिशव्या, प्लॅस्टिक चमचे, प्लेट, थर्माकॉल आदींवर बंदी आणल्यानंतर मीरा भाईंदरमध्ये महापालिकेने 14 जून पासून कारवाईला सुरवात केली होती. त्या आधी पालिकेने प्लॅस्टिक विक्रेते, वापरकर्ते आदींची कार्यशाळा सुद्धा घेतली होती. कारवाई सुरु झाल्यावर त्यात सत्ताधाऱ्यांचाच हस्तक्षेप झाल्याने पालिकेच्या कार्यशाळेत थेट आयुक्तांच्या अंगावरच काही व्यापारी धावून गेले होते. प्लॅस्टिक बंदीचे समर्थन करण्याऐवजी मीरारोडच्या एका नगरसेविकेने तर दुकानदार यांची बाजू उचलून धरली होती. त्या कार्यशाळेत आयुक्तांनीच 8 दिवसांची मुदत देत 3 जुलै पासून कारवाई गुंडाळून टाकली. त्या आधी पालिकेने सुमारे सव्वातीन लाखांचा दंड प्लॅस्टिक - थर्माकॉल बाळगल्या प्रकरणी वसूल केला होता.
पालिकेने प्लॅस्टिक - थर्माकॉल विरोधातील कारवाई बंद केल्याने शहरात पुन्हा सर्रास प्लॅस्टिक - थर्माकॉलचा वापर सुरु झाला. इतकेच काय लोकप्रतिनिधी देखील प्लॅस्टिक लावलेले बुके वापरू लागले. सर्रास प्लॅस्टिक पिशव्या, चमचे, ग्लास, प्लेट आदींचा वापर सुरु झाल्याने नागरिकांना देखील पुन्हा प्लॅस्टिकची सवय लागली. गणेशोत्सव काळात तर सर्वत्र प्लॅस्टिकचा खच पहायला मिळाला.
पालिकेच्या प्लॅस्टिक कारवाई सोयीस्कर गुंडाळण्याविरोधात काही प्रमाणात टीकेची झोड सुद्धा उठली. अखेर गुरुवार 27 सप्टेंबर पासून आयुक्त बालाजी खतगावकर यांच्या निर्देशानंतर पुन्हा प्लॅस्टिक विरोधात कारवाई सुरु झाली. डॉ . पानपट्टे यांनी मीरारोडच्या शांती नगर मधील सेक्टर 2 च्या मीरा प्लॅस्टिक या घाऊक प्लॅस्टिक विक्रेत्याच्या दुकानावर धाड टाकली . येथे सुमारे अडीचशे किलो प्लॅस्टिक साठा सापडला . सदर साठा पालिकेने जप्त केला .
या शिवाय प्रभाग अधिकारी तसेच स्वच्छता निरीक्षक यांनी देखील आपापल्या भागात प्लॅस्टिक विरोधात कारवाई सुरु केली . फेरीवाल्यां पासून दुकानदार आदींवर कारवाई करण्यात आली . सदर कारवाई पुढे देखील सुरूच राहील असे डॉ . पानपट्टे म्हणाले .