मीरा - भाईंदर पालिका मुख्यालयातील नामफलक जैसे थे
By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2019 04:16 AM2019-03-19T04:16:25+5:302019-03-19T04:16:37+5:30
कसभा निवडणुकीच्या आचारसंहितेचा भंग होऊ नये, यासाठी मीरा-भाईंदर महापालिकेकडून काळजी घेतली जात असली, तरी सत्ताधाऱ्यांसह अनेक पदसिद्ध अधिकाऱ्यांचे नामफलक अद्यापही झाकण्यात आले नसल्याने आचारसंहितेचा भंग होत असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे.
- राजू काळे
भाईंदर - लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेचा भंग होऊ नये, यासाठी मीरा-भाईंदर महापालिकेकडून काळजी घेतली जात असली, तरी सत्ताधाऱ्यांसह अनेक पदसिद्ध अधिकाऱ्यांचे नामफलक अद्यापही झाकण्यात आले नसल्याने आचारसंहितेचा भंग होत असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे.
आचारसंहितेचा भंग ठरू नये, यासाठी निवडणूक आयोग सोशल मीडियावरील राजकीय प्रचारासह राजकीय बॅनर्सवरही नियंत्रण ठेवून आहे. सोशल मीडियावरील राजकीय प्रचारावर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हास्तरीय विशेष समिती स्थापन केल्याचेही सांगण्यात येत
आहे. आचारसंहिता लागू होताच महानगरपालिकेने शहरातील बॅनर्स हटवण्यापासून ते राजकीय फलक, नामफलक, कोनशिला झाकण्यास सुरुवात केली आहे; मात्र या कारवाईत दुजाभाव केला जात असून पालिकेची कारवाई केवळ दिखाव्यासाठी असल्याचा आरोप केला जात आहे. पालिकेने मुख्यालयातील मुख्य प्रवेशद्वारावर लावलेल्या कोनशिला नुकत्याच झाकल्या; मात्र काही कोनशिला अद्याप झाकल्या नाहीत.
पालिकेने किमान आदर्श आचारसंहितेचे तरी पालन करावे. सत्ताधाऱ्यांच्या भीतीपोटी ती बासनात गुंडाळू नये. राजकीय नामफलक व कोनशिला सरसकट त्वरित झाकल्या जाव्यात. अन्यथा, पालिकेविरुद्धच आचारसंहिता भंगाची तक्रार दाखल करू. - अनिल सावंत, काँग्रेस नगरसेवक
आचारसंहिता १० मार्च रोजी लागू झाली. त्यामुळे पालिकेने कोनशिला आणि नामफलकांवर त्वरित कारवाई करणे अपेक्षित होते; मात्र आचारसंहिता लागू होऊन आठ दिवस उलटल्यानंतरही पालिकेच्याच प्रशासकीय इमारतीतील राजकीय नामफलकांवर कारवाई झालेली नाही. हा नियम सत्ताधाºयांना लागू नाही की काय, असे वाटू लागले आहे.
- नीलम ढवण, शिवसेना नगरसेविका
आचारसंहितेचे पालन करणे राजकीय पक्षांपासून ते कार्यकर्त्यांपर्यंत सर्वांनाच बंधनकारक आहे. पालिका मुख्यालयातील राजकीय नामफलक झाकण्याचे राहून गेले असल्यास, ते आम्ही स्वत: झाकून टाकू. प्रशासनाकडून कारवाईसुद्धा सुरूच आहे. त्यांच्याकडून अनवधनाने राहून गेले असल्यास, ते लक्षात आणून देण्याऐवजी उगाच गाजावाजा केला जात आहे.
- हसमुख गेहलोत, भाजपा गटनेते
पालिकेकडून शहरातील सर्व राजकीय कोनशिला व नामफलक झाकण्याची कारवाई सुरू आहे. ती येत्या एकदोन दिवसांत पूर्ण केली जाईल.
- दीपक पुजारी, उपायुक्त (मुख्यालय)
प्रवेशद्वाराजवळील कोनशिला झाकून पालिकेने कार्यतत्परता दाखवली असली, तरी याच मुख्यालयातील महापौरांपासून ते विविध समिती सभापतींच्या दालनाबाहेर लावण्यात आलेले नामफलक उघडेच ठेवले आहेत. पालिकेत भाजपाची सत्ता असल्याने प्रशासनाने त्यांचे नामफलक झाकण्याचे धाडस केले नसल्याची टीका विरोधक करू लागले आहेत.