मीरा - भाईंदर पालिका करणार सॅनिटरी नॅपकिनचे उत्पादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2019 11:35 PM2019-02-25T23:35:31+5:302019-02-25T23:35:41+5:30
ठरणार देशातील पहिली पालिका : महिलादिनी सुरू होणार उपक्रम
- राजू काळे।
लोकमत न्यूज नेटवर्क
भार्इंदर : काशिगाव येथील आरक्षण क्र. ३१८ येथे बांधलेल्या तळ मजल्यावरील ओसाड बाजाराच्या जागेत पालिकेच्याच खर्चातून सॅनिटरी नॅपकिनचे उत्पादन सुरू करण्याचा निर्णय महिला आणि बालकल्याण समितीमार्फत घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे सॅनिटरी नॅपकिनचे उत्पादन करणारी मीरा-भार्इंदर महापालिका देशातील पहिली महापालिका ठरणार आहे.
मीरा-भार्इंदर महापालिकेने काशिगाव येथील सिल्व्हर सरिता परिसरातील आरक्षण क्र. ३१८ वर एक दुमजली इमारत बांधून तळ मजल्यावर परिसरातील फेरीवाल्यांसाठी बाजार सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, त्याला फेरीवाल्यांकडून प्रतिसाद न मिळाल्याने हा बाजार अनेक वर्षांपासून ओसाड पडला होता. या बाजाराच्या जागेत रात्री ओल्या पार्ट्या झोडल्या जात असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने ७ फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध केले होते.
त्याची दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता दीपक खांबित यांनी तेथील सुरक्षारक्षकांना जागाच रिकामी करण्याचे आदेश दिले. यानंतर, त्या ओसाड बाजाराची जागा महिला तसेच बालकल्याण समिती व आरोग्य विभागाला वापरण्याची सूचना करण्यात आली. यादृष्टीने महिला आणि बालकल्याण समितीमार्फत विचार सुरू झाला. त्यानुसार, फेब्रुवारीमध्येच झालेल्या समितीच्या बैठकीत त्या जागेत सॅनिटरी नॅपकिनचे उत्पादन सुरू करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. त्याचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सादर केल्यानंतर विभागाने तेथील सुमारे एक हजार चौरस फूट जागेत कारखाना उभारण्याची कार्यवाही सुरू केली. तर, समितीने या उत्पादनासाठी सुरुवातीला चार लाखांच्या निधीची तरतूद केली. अर्थसंकल्पात तशी तरतूद नसल्याने हा निधी रिक्षावाटपाच्या तरतुदीतून पूर्वनियोजित करण्यात आला. त्यातून नॅपकिन तयार करणाऱ्या यंत्रांसह सुमारे १२ महिलांचा प्रशिक्षणात समावेश करण्यात आला. हे उत्पादन जागतिक महिलादिनी सुरू करण्याचा प्रयत्न आहे. तत्पूर्वी त्याचे धोरण निश्चित करण्यात येणार असून भविष्यात महिला बचत गट अथवा महिलांच्याच सामाजिक संस्थेला हा कारखाना चालवण्यास देण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
नॅपकिनचे उत्पादन शुल्क व त्याचा ब्रॅण्ड समितीमार्फत निश्चित करण्यात आला असून त्याच्या मार्केटिंगसाठी विशेष विक्री पथक नियुक्त केले जाणार आहे. सुरुवातीला हे नॅपकिन सामान्य कुटुंबातील महिलांसाठी उपलब्ध करून दिले जाणार असून त्याच्या वापरासाठी वस्त्यांमधील महिलांमध्ये जनजागृती केली जाणार आहे.
स्वखर्चाने सॅनिटरी नॅपकिननिर्मिती करणारी मीरा-भार्इंदर महापालिका देशात पहिली ठरणार असली, तरी त्याचे उत्पादन नियमितपणे सुरू ठेवण्याच्या दिशेने पाऊल टाकण्यात येत आहे. हे नॅपकिन माफक दरात विक्री केले जाणार असून त्याचा दर्जादेखील खाजगी कंपन्यांच्या तुलनेत चांगलाच राखण्यात येणार आहे. त्याला चांगला प्रतिसाद मिळाल्यास असे प्रकल्प इतर ठिकाणीसुद्धा सुरू केले जाणार आहेत. - दीपिका अरोरा, सभापती
(महिला व बालकल्याण समिती)