मीरा भाईंदरकरांनो, केंद्राच्या राहण्या योग्य शहर सर्वेक्षणात सहभागी व्हा - आयुक्तांचे आवाहन
By धीरज परब | Published: December 17, 2022 03:57 PM2022-12-17T15:57:13+5:302022-12-17T15:57:39+5:30
केंद्र शासनाच्या 'ईज ऑफ लिव्हिंग इंडेक्स या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत मीरा भाईंदरच्या नागरिकांनी सहभागी व्हावे.
मीरारोड - केंद्र शासनाच्या 'ईज ऑफ लिव्हिंग इंडेक्स या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत मीरा भाईंदरच्या नागरिकांनी सहभागी व्हावे. आपले शहर राहण्या योग्य शहर असल्या बद्दलचा अभिप्राय नोंदवावा असे आवाहन महापालिकेचे प्रशासक तथा आयुक्त दिलीप ढोले यांनी केले आहे.
केंद्र शासनाने शहर राहण्यायोग्य असल्या बाबतचे अभिप्राय शहरातील नागरिकांकडून मागवण्यासाठी सदर सर्वेक्षण सुरु केले आहे . सर्वेक्षणात सहभागी होण्यासाठीची माहिती पालिकेच्या संकेत स्थळावर दिली गेली आहे . या शिवाय शहरात त्याचे जाहीर फलक लावले जाणार आहेत . समाज माध्यमातून लोकां पर्यंत याची माहिती पोहचवली जात आहे . केंद्र शासनाने दिलेला क्यूआर कोड, तसेच सिटी कोड देण्यात आला आहे. शहरातील नागरिकांना हा क्यूआर कोड स्कॅन करून आपला अभिप्राय सहज नोंदवता येणार आहे .
महानगरपालिका सर्वांगीण विकास करण्यासाठी प्रयत्न करत आहे. आतापर्यंत विविध प्रकल्प शहरात राबविले आहे. चांगले रस्ते व आरोग्य सुविधा, चांगली उद्याने, चांगले शिक्षण अशा विविध सेवा देण्यासाठी महापलिका प्रयत्नशील आहे . येत्या काळात अत्याधुनिक रुग्णालये, खेळाची मैदाने, क्रिकेट अकॅडमी असे महत्वपूर्ण प्रकल्प व गुणवत्तापूर्ण सुविधा देण्यासाठी महापालिकेचा प्रयत्न आहे असे आयुक्त ढोले यांनी म्हटले आहे .