मीरा रोडच्या शाळेने २ मुलांना काढले, शुल्कवाढीविरोधात पालकांचा आंदोलनात सहभाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2017 03:15 AM2017-11-22T03:15:53+5:302017-11-22T03:16:14+5:30
मीरा रोड : शाळेच्या मनमानी शुल्कवाढीविरोधातील आंदोलनात पालकांनी पुढाकार घेतला म्हणून निशाद शेख यांच्या पहिली तसेच तिसरीत शिकणा-या दोन्ही मुलांना शाळेतून काढून टाकण्याचा प्रताप मीरा रोडच्या वादग्रस्त कॉस्मोपोलिटीन शाळा व्यवस्थापनाने केला
मीरा रोड : शाळेच्या मनमानी शुल्कवाढीविरोधातील आंदोलनात पालकांनी पुढाकार घेतला म्हणून निशाद शेख यांच्या पहिली तसेच तिसरीत शिकणा-या दोन्ही मुलांना शाळेतून काढून टाकण्याचा प्रताप मीरा रोडच्या वादग्रस्त कॉस्मोपोलिटीन शाळा व्यवस्थापनाने केला आहे. शिक्षण उपसंचालकांनी दोन वेळा पत्र देऊनही दोन्ही मुलांना शाळेत पुन्हा प्रवेश दिलेला नाही. तर, प्रशासन अधिकाºयांनीदेखील उपसंचालकांच्या आदेशाला केराची टोपली दाखवत शाळेची पाठराखण चालवली आहे.
मीरा रोडच्या शीतलनगरमधील कॉस्मोपोलिटीन शाळा व्यवस्थापनाने नियमबाह्यरीत्या केलेली शुल्कवाढ तसेच अतिरिक्त शुल्क वसुलीविरोधात पालकांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला होता. याप्रकरणी पालकांनी तत्कालीन महापौर गीता जैन यांच्यासह शिक्षण विभागाकडे दाद मागितली होती. उपायुक्त दीपक पुजारी आणि प्रशासन अधिकारी सुरेश देशमुख यांनी सुनावण्या घेतल्या होत्या. परंतु, शाळा व्यवस्थापनाने आडमुठेपणा चालवला होता. पालकांच्या आंदोलनात फूट पडल्यावर पाच पालकांविरुद्ध शाळा व्यवस्थापनाने मीरा रोड पोलीस ठाण्यात विविध कारणांनी फिर्याद देऊन गुन्हा दाखल केला.
परंतु, शाळा व्यवस्थापनाच्या मनमानी आणि बेकायदा शुल्क वसुलीविरोधात लढण्यासाठी पुढाकार घेणाºया पालक निशाद शेख यांच्या पहिलीतील आसीफ शेख आणि तिसरीतील आयशा शेख या दोघा पाल्यांना मात्र त्रास देण्यास सुरुवात झाली. आधी त्यांना परीक्षा देण्यापासून रोखण्याचा प्रयत्न झाला. नंतर, शाळा व्यवस्थापनाने दोन्ही मुलांना शाळेतून काढूनच टाकले.
शाळेने मुलांना काढून टाकल्याने निशाद यांनी बचाव समितीच्या माध्यमातून शिक्षण विभागाचे उपसंचालक डॉ. बी.बी. चव्हाण यांच्याकडे दाद मागितली. चव्हाण यांनीही २६ आॅक्टोबर रोजी शाळा व्यवस्थापनास पत्र देऊन असे शाळे बाहेर काढणे योग्य नसल्याचे म्हटले.
>मुलांना पुन्हा शाळेत प्रवेश मिळवून देण्याची प्रक्रिया सुरू
तत्काळ या दोन्ही विद्यार्थ्यांचे शाळेत प्रवेश नियमित करून ७ नोव्हेंबरपर्यंत अहवाल सादर करावा, असे आदेश दिले. त्याचसोबत प्रशासन अधिकारी सुरेश देशमुख यांनादेखील दोन्ही विद्यार्थ्यांचे शाळेत प्रवेश करून घ्यावेत, असे सांगतानाच शाळेची मान्यता रद्द करण्याचा प्रस्ताव शिक्षणाधिकारी, प्राथमिक शिक्षण विभाग, ठाणे जिल्हा परिषद यांना सादर करण्याचे आदेशही दिले होते. परंतु, शाळा व्यवस्थापनासह देशमुख यांनीदेखील शिक्षण उपसंचालकांच्या आदेशांना केराची टोपली दाखवली.हवालदिल झालेल्या निशाद यांनी पुन्हा उपसंचालकांकडे दाद मागितली. त्यावर चव्हाण यांनी १३ नोव्हेंबर रोजी पुन्हा पत्र दिले. आरटीई कायद्याचा अवमान करत आहात, असे व्यवस्थापनाला ठणकावत दोन दिवसांत आदेशाचे पालन करा. अन्यथा, नियमभंगाची कार्यवाही करण्यात येईल, असे बजावले. तर, देशमुख यांनाही १० नोव्हें. पर्यंत अहवाल सादर करण्यास सांगूनही कार्यवाही न केल्याबद्दल नाराजी व्यक्त करत अहवाल सादर करण्यास बजावले.उपसंचालकांच्या या दुसºया आदेशालादेखील शाळा आणि देशमुख यांनी केराची टोपली दाखवली आहे. शाळेत जाता येत नसल्याने दोन्ही मुलं आजारी पडली असून आपणही प्रचंड तणावाखाली आहोत. उपोषणासाठी पत्र दिले असता त्याचीही परवानगी पोलिसांनी दिली नसल्याचे निशादने सांगितले. मुलांना पुन्हा शाळेत प्रवेश मिळवून देण्याची तसेच शाळेविरोधात कार्यवाहीची प्रक्रिया सुरू असल्याचे देशमुख यांनी सांगितले.