सोशल मीडियामुळे आजोबांची भेट, पोलिसांनी घेतला पुढाकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2018 04:58 AM2018-11-16T04:58:03+5:302018-11-16T04:58:38+5:30
कळवा पोलिसांचा पुढाकार : दुभाषीची घेतली मदत
ठाणे : सोशल मीडियाच्या मदतीने कळवा पोलिसांनी चुलबूल यादव या सत्तरवर्षीय आजोबाला त्यांच्या नातवाची भेट घडवून दिली. या कामात मदत करणाऱ्या बाबुराम यादव यांचा पोलिसांनी विशेष सत्कारही केला. चुलबूल यादव हे कळव्याच्या सह्याद्री सोसायटीजवळ ११ नोव्हेंबर रोजी पोलिसांना आढळले. त्यांना केवळ नाव सांगता येत होते. पण, पूर्ण पत्ता काहीच सांगता येत नव्हता.
कळवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांनी त्यांना पोलीस ठाण्यात आणून त्यांची राहण्याची आणि जेवणाची सोय केली. चुलबूल हे दहिसर येथे मुलाकडे वास्तव्याला असून मूळचे ते बिहारचे आहेत. ते भोजपुरी भाषा बोलत होते. हिंदी किंवा मराठी त्यांना येत नव्हते. पत्ता सांगताना ते अडखळत असल्याने त्यांच्या राहण्याचे ठिकाण किंवा मुलांचा पत्ताही त्यांना नीट सांगता येत नव्हता. बागडे यांनी बाबुराम यादव या भोजपुरी बोलणाºयाची दुभाषी म्हणून मदत घेतली. त्यानेच चुलबूल यांच्याकडून माहिती काढून ती त्यांच्या फोटोसह सोशल मीडियावर टाकली. त्याआधारे त्यांच्या दहिसर येथील उज्ज्वल यादव (२४) या नातवाने कळवा पोलीस ठाण्यात धाव घेतली. १४ नोव्हेंबर रोजी नातू आणि आजोबांची पोलिसांनी बाबुरामच्या मदतीने भेट घडवून आणली. दहिसर येथून ते कळव्यात कसे भरकटले, हेही त्यांना सांगता येत नव्हते. आजोबा तीन दिवसांनी सुखरूप मिळाल्याने नातवाला आनंदाश्रू आवरता आले नाहीत. एरव्ही, हद्दीवरून एखादा गुन्हा दाखल करताना १० वेळा विचार करणाºया पोलिसांसमोर कळवा पोलिसांनी एक आदर्श ठेवला आहे.
महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या बाबुराम यादव यांचाही कळवा पोलिसांच्या वतीने बागडे यांनी छोटेखानी सत्कार केला.