ओमी टीमला शह देत दोन्ही काँग्रेसची बैठक
By admin | Published: January 23, 2017 05:27 AM2017-01-23T05:27:44+5:302017-01-23T05:28:02+5:30
ओमी कलानी यांची टीम राष्ट्रवादी काँग्रेसमधून फुटून बाहेर निघाल्यावर निर्माण होणाऱ्या परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी काँग्रेस
उल्हासनगर : ओमी कलानी यांची टीम राष्ट्रवादी काँग्रेसमधून फुटून बाहेर निघाल्यावर निर्माण होणाऱ्या परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी गुप्त बैठक घेत चर्चा केली. स्वबळाचा इशारा दिल्यानंतर अवघ्या एका दिवसांत कोलांटउडी मारत राष्ट्रवादीने या चर्चेत भाग घेतल्याने ओमी यांच्या पक्षत्यागाच्या पार्श्वभूमीवर पक्षात खलबते सुरू झाल्याचे दिसून आले. कॉग्रेसचे शहर अध्यक्ष डॉ. जयराम लुल्ला यांनी या चर्चेला दुजोरा दिला, तर कॉग्रेसशी आघाडीला विरोध असल्याचा पुनरूच्चार राष्ट्रवादीच्या शहर अध्यक्षा ज्योती कालानी यांनी केला. त्यामुळे पक्षातील मतभेद चव्हाट्यावर आले असून शह-काटशहाचे राजकारण सुरू झाल्याचे स्पष्ट झाले.
दुसरीकडे कलानी कुटुंबाचे कट्टर विरोधक भरत गंगोत्री यांना प्रोत्साहन देत, त्यांचे वर्चस्व वाढवत, पक्ष पर्यायी व्यवस्था उभारत असल्याची चर्चा या घडामोडींवरून सुरू झाली. कलानी कुटुंब आणि ओमी टीमला शह देण्यासाठीच राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी आघाडीचे काटकारस्थान खेळल्याची प्रतिक्रिया ओमी टीमच्या सदस्यांनी व्यक्त केली.
कलानी महल येथील पक्षाच्या कार्यालयात राष्ट्रवादीचे नेते गणेश नाईक यांनी शनिवारी आघाडी तुटल्याचे जाहीर केले. कॉग्रेसकडूनच प्रस्ताव आला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले होत. त्यानंतर ज्योती कलानी यांनी कॉग्रेसशी आघाडीला विरोध केला होता. त्याला एक दिवस उलटत नाही, तोच कॉग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष सुभाष कानडे, शहर अध्यक्ष डॉ. जयराम लुल्ला, माजी महापौर हरिदास मखिजा, अमरलाल छ्राब्रीया यांच्यासोबत राष्ट्रवादीचे प्रमोद हिंदुराव यांनी प्रवीण हॉटेल येथे गुपचूप बैठक घेतली.
ओमी कलानी यांच्यामुळे आघाडी करता येत नाही. ज्योती यांचाही त्याला विरोध आहे. पण ओमी भाजपात गेल्यावर आयत्यावेळी राष्ट्रवादीची अवस्था केविलवाणी होईल. त्यामुळे आतापासूनच पक्षाने पर्याय शोधण्यास सुरूवात केली आहे, हे रविवारच्या गुप्त बैठकीतून दिसून आले. गणेश नाईक यांच्या आदेशानुसारच हिंदुराव येथे आल्याची माहिती लुल्ला यांनी दिली. त्यांच्यामार्फतच आघाडीचा प्रस्ताव पाठविला जाईल. प्रस्ताव मान्य झाला, की आघाडीची पुढील बोलणी सुरू होतील, असे ते म्हणाले. हिंदुराव यांनी स्थानिक नेत्यांना विश्वासात घेतले नसल्याचा आरोप ज्योती यांनी केला. आम्ही आमचा विरोध आधीच स्पष्ट केलेला असतानाही ही बैठक झाल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. याबाबत प्रमोद हिंदुराव यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. (प्रतिनिधी)