शिंदे सेनेच्या गोपाळ लांडगे यांनी बोलाविली बैठक, उल्हासनगरात ओमी टीम सोबतच्या बैठकीला भाजपचा विरोध
By सदानंद नाईक | Published: April 24, 2024 06:40 PM2024-04-24T18:40:49+5:302024-04-24T18:41:06+5:30
ओमी टीमचा खा. श्रीकांत शिंदे यांना पाठींबा आहे, एनडीएला नाही. त्यामुळे संयुक्त बैठकीला भाजपने विरोध केला असावा. असे मत ओमी टीमचे मनोज लासी यांनी व्यक्त केले.
उल्हासनगर : शिंदेंसेनेने ओमी टीमसह महायुती पक्ष पदाधिकाऱ्यांची जवाहर हॉटेल मध्ये बोलाविलेल्या एकत्रित बैठकीला भाजपने विरोध केल्याने, ओमी टीम पदाधिकार्यांची वेगळी बैठक लांडगे यांना घ्यावी लागली. ओमी टीमचा खा. श्रीकांत शिंदे यांना पाठींबा आहे, एनडीएला नाही. त्यामुळे संयुक्त बैठकीला भाजपने विरोध केला असावा. असे मत ओमी टीमचे मनोज लासी यांनी व्यक्त केले.
लोकसभेचे एनडीएचे संभाव्य उमेदवार श्रीकांत शिंदे यांना ओमी टीमचे प्रमुख ओमी कलानी यांनी पाठिंबा घोषित केला. निवडणुक निमित्त शिंदेंसेनेचे नेते गोपाळ लांडगे यांनी बुधवारी दुपारी जवाहर हॉटेल मध्ये एनडीएचे घटक पक्षासह ओमी टीमच्या पदाधिकाऱ्यांना बैठकीला बोलाविले. भाजपचे आमदार कुमार आयलानी, शहरजिल्हाध्यक्ष प्रदीप रामचंदानी यांच्यासह अन्य पदाधिकार्यांनी ओमी टोमच्या पदाधिकार्या सोबत एकत्र बैठकीला बसण्यास विरोध केला. ओमी टीमचा शिंदेंसेनेचे श्रीकांत शिंदे यांना पाठिंबा आहे. एनडीए महायुतीचा घटक पक्ष नाही. असा आक्षेप नोंदविला. अखेर गोपाळ लांडगे यांना ओमी टीम सोबत वेगळी बैठक घ्यावी लागली. ओमी टीमच्या पदाधिकाऱ्याच्या बैठकीनंतर शिंदेंसेना, भाजप, अजित पवार गट, रिपाई आठवले गट, पीआरपी गट आदी पक्षाच्या पदाधिकार्यांची बैठक झाली. या प्रकाराने भाजप विरुद्ध ओमी टीम सामना रंगण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
बैठकीला शिंदेंसेनेचे गोपाळ लांडगे, महानगरप्रमुख राजेंद्र चौधरी, नाना बागुल, अरुण अशान, रिपाइंचे शहरजिल्हाध्यक्ष भगवान भालेराव, भाजपचे आमदार कुमार आयलानी, शहरजिल्हाध्यक्ष प्रदीप रामचंदानी यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
प्रतिक्रिया
१) राजेंद्र चौधरी (महानगरप्रमुख शिंदेंसेना)
ओमी टीम एमडीए महायुतीचा घटक पक्ष नसल्याचा आक्षेप भाजप पदाधिकार्यांनी घेतल्याने, त्यांची वेगळी बैठक पक्षाचे नेते गोपाळ लांडगे यांनी घेतली. ओमी टीम व महायुती यांच्यात वाद नाही.
२) आमदार कुमार आयलानी
भाजप, शिंदेंसेना, अजित पवार गट व रिपाइं आठवले, कवाडे गट एनडीएचा घटक पक्ष आहे. ओमी टीम यांनी फक्त संभाव्य उमेदवाराला पाठिंबा दिला. ते एनडीए मध्ये नसल्याने, एकत्रित बैठकीला विरोध केला.
३) मनोज लासी (ओमी टीम सदस्य)
ओमी टीमचा खा. श्रीकांत शिंदे यांना पाठिंबा असून एनडीए महायुतीचा घटक पक्ष नाही. घटक पक्ष नसल्याने भाजपने एकत्रित बैठकीला विरोध केला।असावा. भिवंडीत ओमी टीमचा महाआघाडीचे उमेदवार बाळ्या मामा यांना पाठिंबा आहे.