महापारेषणने बोलावलेली बैठक ठरली निष्फळ, मनोरे उभारणार, शेतकऱ्यांचा तीव्र विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 12:16 AM2021-02-17T00:16:33+5:302021-02-17T00:16:56+5:30
Palghar : वाडा, वसई व पालघर या तालुक्यातील गावे यामध्ये बाधित होणार आहेत. त्यासाठी ३० मीटर जागा संपादित करण्यात आली आहे.
वाडा : तालुक्यातील डाकिवली परिसरातून उच्च दाबाची विद्युतवाहिनी जात असून या वाहिनीचे मनोरे उभारण्याचे काम महापारेषणने हाती घेतले आहे. मात्र या वाहिनीमुळे अनेक शेतकरी देशोधडीला लागणार असून त्याचे नुकसान होणार आहे. त्यामुळे वाहिनीस तीव्र विरोध दर्शवला असून जागा न देण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी केल्याने मंगळवारी डाकिवली ग्रामपंचायत कार्यालयात महापारेषणने बोलावलेली बैठक निष्फळ ठरली.
२२० के.व्ही. तारापूर-बोरीवली आणि बोईसर घोडबंदर लीलो कुडूस अशी उच्च दाबाची विद्युत वाहिनी जात आहे. वाडा, वसई व पालघर या तालुक्यातील गावे यामध्ये बाधित होणार आहेत. त्यासाठी ३० मीटर जागा संपादित करण्यात आली आहे. मात्र हे करताना शेतकऱ्यांना विश्वासात न घेता किंवा पूर्वकल्पना न देता या वाहिनीचे मनोरे उभारण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यातच सन २०१६ साली बनवलेल्या नकाशाप्रमाणे हे काम न करता महापारेषणने मनमानी कारभार करत आपल्या मर्जीप्रमाणे काम सुरू केले आहे. यात डाकिवली गावातील अनेक शेतकरी बाधित झाले असून येथील बहुतांशी शेतकरी अल्पभूधारक असल्याने त्यांच्या लागवडी क्षेत्रातून जात असल्याने बाधित शेतकऱ्यांचे लागवडी क्षेत्र संपुष्टात येणार आहे. या मार्गाने वाहिनी गेल्यास बहुतांशी शेतकरी यामधून वगळले जाणार असल्याचे शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले. मात्र महापारेषणला हे मान्य नसल्याने शेतकऱ्यांनी आमच्या जागेतून वाहिनी नेऊ नका, अशा स्षप्ट शब्दांत नकार दर्शविला.
वाहिनी वनजमिनीतून न्या
ज्या जमिनीतून ही वाहिनी जात आहे, ती जमीन मातीमोल होणार असल्याने शेतकरी प्रचंड संतापले आहेत. महापारेषणने गावात असलेल्या दगडखाणी व लागवडी क्षेत्र वगळून यामधून वाहिनी न नेता लोहोपे गावापासून पुढे वनविभागाच्या जागेतून ही वाहिनी न्यावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.