डायघर पोलिसांच्या सतर्कतेमुळे दिव्यांग मुलाची आईवडिलांशी भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2020 10:38 PM2020-01-22T22:38:24+5:302020-01-22T22:42:03+5:30
उल्हासनगरातील पंजाब कॉलनीतून दोन दिवसांपूर्वी बेपत्ता झालेला दिव्यांग सुरज तेले हा १२ वर्षीय मुलगा डायघर भागात मिळाला. डायघर पोलिसांनी सतर्कता दाखवून त्याची माहिती ठाण्यातील सर्व पोलीस ठाण्यांना दिल्यानंतर त्याची त्याच्या आई वडिलांशी भेट घडवून आणण्यात त्यांना यश आले.
जितेंद्र कालेकर
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : डायघर परिसरात भरकटलेल्या सुरज मोहन तेले (रा. पंजाब कॉलनी, उल्हासनगर) या बारावर्षीय दिव्यांग मुलाला डायघर पोलिसांनी सतर्कता दाखवून सोमवारी त्याच्या आईवडिलांच्या ताब्यात सुपूर्द केले. अचानक बेपत्ता झालेला हा मुलगा पोलिसांच्या सतर्कतेमुळे दोन दिवसांनी पुन्हा सुखरूप मिळाल्यामुळे पालकांनी पोलिसांचे आभार मानले आहेत.
शीळ-डायघर पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात सहायक पोलीस निरीक्षक एस.आर. सकपाळ, पोलीस हवालदार एस.वाय. पवार, ए.पी. सपकाळे, बी.एम. मांगले, पोलीस कॉन्स्टेबल एस.जी. चौधरी आणि महिला कॉन्स्टेबल एस.आर. तांडेल आदींचे पथक २० जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास पेट्रोलिंग करीत होते. त्याचदरम्यान त्यांना सुरज हा दिव्यांग मुलगा आढळून आला. त्याला बोलताही येत नव्हते. त्यामुळे त्याला त्याचे नाव आणि पत्ता सांगता येत नव्हता. त्याला डायघर पोलीस ठाण्यात आणल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव यांनीही चौकशी करण्याचा प्रयत्न केला. तो कुठूनतरी बेपत्ता झाला असल्यामुळे जाधव यांनी याची गांभीर्याने दखल घेऊन ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील सर्व पोलीस ठाण्यांमध्ये पोलीस नियंत्रण कक्षामार्फत संपर्क साधून त्याची माहिती दिली. उल्हासनगर येथील मध्यवर्ती पोलीस ठाण्यात त्याच्या अपहरणाची तक्रार तेले कुटुंबीयांनी दिल्याचे आढळले. तत्काळ त्याचे वर्णन आणि माहिती मध्यवर्ती पोलीस ठाण्याला देण्यात आली. तेव्हा उल्हासनगरच्या पंजाब कॉलनीतील आपल्या घरातून १८ जानेवारी रोजी खेळण्यासाठी तो घराबाहेर पडला होता. त्यानंतर रस्ता चुकल्यामुळे तो पायीच शीळ-डायघर परिसरात भरकटला. बोलता येत नसल्यामुळे त्याला नाव आणि स्वत:चा पत्ताही सांगता येत नव्हता. शिवाय, तो आपल्या कुटुंबीयांची माहितीही देऊ शकत नव्हता. दरम्यान, बराच शोध घेऊनही तो कुठेही न आढळल्यामुळे त्याच्या अपहरणाची तक्रार मध्यवर्ती पोलीस ठाण्यात त्याच्या पालकांनी दाखल केली होती. उल्हासनगरातून बेपत्ता झालेला हा तोच मुलगा असल्याची खात्री झाल्यानंतर सुरजला २० जानेवारी रोजी डायघर पोलिसांनी त्याची आई सुगंधा तेले यांच्या ताब्यात दिले. आपला मुलगा अनपेक्षितपणे सुखरूपरीत्या मिळाल्यामुळे तेले कुटुंंबीयांनी पोलिसांना धन्यवाद दिले आहेत.