सेनेच्या गटबाजीमुळे सभा रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2017 02:15 AM2017-08-02T02:15:27+5:302017-08-02T02:15:27+5:30
शिवसेनेतील दोन गटांच्या वादात अंबरनाथ पालिकेची ३ आॅगस्ट रोजी होणारी सर्वसाधारण सभा अचानक रद्द करण्यात आली.
अंबरनाथ : शिवसेनेतील दोन गटांच्या वादात अंबरनाथ पालिकेची ३ आॅगस्ट रोजी होणारी सर्वसाधारण सभा अचानक रद्द करण्यात आली. या सभेची कार्यक्रमपत्रिका सर्व नगरसेवकांना वितरित झाली होती. मात्र, शिवसेनेच्या एका गटातील नगरसेवकाचे दोन विषय कार्यक्रमपत्रिकेत समाविष्ट न झाल्याने जिल्ह्यातील शिवसेना नेत्यांपर्यंत वाद गेले आणि सभा रद्द करण्यास भाग पाडले.
अंबरनाथ नगर परिषदेचा अर्थसंकल्प मे महिन्यात मंजूर झाल्याने आगामी सर्वसाधारण सभेत प्रभागातील विकासकामे मंजूर होतील, अशी सर्व नगरसेवकांची अपेक्षा होती. नगरसेवकांनी आपापल्या प्रभागातील प्रत्येकी ३० लाखांच्या कामाचे विषय मंजुरीसाठी पाठवले होते. मात्र, आता ही सर्वसाधारण सभा रद्द झाल्याने नगरसेवक हवालदिल झाले आहेत. लवकरच सर्वसाधारण सभा बोलवण्याचे आश्वासन नगराध्यक्षांनी दिले आहे.
प्रभागातील कामांबरोबर नाट्यगृहाचा विषयदेखील मंजुरीसाठी कार्यक्रमपत्रिकेत समाविष्ट केला आहे. मात्र, ज्या जागेवर नाट्यगृह उभारण्यात येणार आहे, त्या जागेभोवती असलेल्या आरक्षणाचा विकास करण्याचा विषय गेल्या सर्वसाधारण सभेत स्थगित ठेवण्यात आला होता. मात्र, हा स्थगित विषय या सभेत घेऊन तो मंजूर करण्याची सेनेच्या जिल्ह्यातील नेत्यांची इच्छा होती. मात्र, ३ तारखेच्या सर्वसाधारण सभेत तो विषय दाखवण्यात न आल्याने नेत्यांसह एका गटाचे काही नगरसेवक अस्वस्थ झाले होते. सोबत स्वामीनगर येथील धोकादायक पुलाच्या कामाचा विषयही या सर्वसाधारण सभेत येणे अपेक्षित होते. मात्र, तो विषयही या सभेत आला नाही.