सभेसाठी सांगा कोणता नेता हवा?
By admin | Published: April 27, 2017 11:53 PM2017-04-27T23:53:27+5:302017-04-27T23:53:27+5:30
उच्च न्यायालयाने भिवंडी महापालिकेची निवडणूक घेण्यास सांगितल्याने राजकीय वातावरण तापू लागले आहे. मागील तीन दिवसांत
अनगाव : उच्च न्यायालयाने भिवंडी महापालिकेची निवडणूक घेण्यास सांगितल्याने राजकीय वातावरण तापू लागले आहे. मागील तीन दिवसांत शिवसेनेकडून १०० जणांनी अर्ज नेले, अशी माहिती देण्यात आली. अर्ज घेण्यासाठी पक्ष कार्यालयात गर्दी वाढत असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. उमेदवार अंतिम झाल्यावर एक बैठक घेण्यात येईल. त्यात तुमच्या प्रभागात सभेसाठी कोणता नेता हवा, हे विचारले जाणार आहे. कोणत्या नेत्याचा प्रभाव मतदारांवर पडेल, याचीही विचारणा केली जाणार आहे.
पुढील दोन दिवसांत इच्छुकांच्या मुलाखतींना प्रारंभ होणार आहे. त्यासाठी ठाण्यातून काही पदाधिकारी येणार आहेत. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेवरून ते भिवंडीत येणार आहेत.
निवडणुकीतील रणनीती ठरवण्यासाठी आमदार रूपेश म्हात्रे आणि शहर जिल्हाप्रमुख सुभाष माने यांच्यात गुरुवारी रात्री बैठक झाली. या वेळी पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. पूर्वी ज्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली, ते शिवसेनेच्या संपर्कात असल्याचा दावा करण्यात आला. लवकरच पक्षाचे इनकमिंग सुरू होईल, असेही सूत्रांनी सांगितले. (वार्ताहर)