‘महा-हब’चे घोंगडे भिजत पडले ; नव उद्योजकांसाठीच्या प्रकल्पाला फक्त मान्यताच, अद्याप कार्यवाही नाही
By सुरेश लोखंडे | Published: September 17, 2024 07:12 AM2024-09-17T07:12:00+5:302024-09-17T07:12:22+5:30
५०० काेटी खर्चाचा हा प्रकल्प कल्याण तालुक्यातील मौजे अंतरली, खोणी येथे उभारण्यात येणार होता.
सुरेश लाेखंडे
ठाणे : राज्यात नावीन्यपूर्ण नवउद्योजकतेला चालना देण्यासाठी ‘महा-हब, इनक्युबेटर आणि इनोव्हेशन सेंटर’ ठाणे जिल्ह्यात स्थापन करण्याचा गतवर्षी राज्य शासनाने घेतलेला निर्णय आजही धूळ खात पडून आहे. ५०० काेटी खर्चाचा हा प्रकल्प कल्याण तालुक्यातील मौजे अंतरली, खोणी येथे उभारण्यात येणार होता.
राज्यभरातील नवउद्याेजकांच्या हितासाठी हा महा-हब प्रकल्प उपयुक्त ठरणारा असून, त्यासाठी ठाणे, नवी मुंबई या महानगरांच्या सीमेवर कल्याण तालुक्यात हे ‘महा-हब, इनक्युबेटर आणि इनोव्हेशन सेंटर’ स्थापन करण्यास शासनाने मान्यता दिली. २५ हेक्टरवर उभारण्यात येणारे हे सेंटर नव उद्याेजकांना लागणारी आर्थिक मदत, मार्गदर्शन आणि प्रशिक्षणासाठी महत्त्वाची भूमिका पार पाडणार होते. कंपनी कायद्यानुसार ‘ना नफा, ना तोटा’ या तत्त्वावर चालणारी कंपनी स्थापन करण्यासाठी शासनाने सहमती दिली होती.
अधिकारी, कर्मचाऱ्यांची भरती कधी ?
कंपनीवर विविध क्षेत्रांतील नऊ संचालक नियुक्त करणार होते. या संचालकांमध्ये उद्योग, खासगी इक्विटी फंड या क्षेत्रातील कंपन्यांचे चार संचालक असणार होते. या संचालकांचे प्रत्येकी १० कोटींचे याेगदान निश्चित केले होते.
आयआयटी-बी, एनएलयू-मुंबई, आयआयएम-मुंबई या तीन प्रीमियम शैक्षणिक संस्थांचे वरिष्ठ पातळीवरील अधिष्ठाता एकूण तीन संचालक, प्रधान सचिव, आदींसह या कंपनीसाठी तज्ज्ञांची कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी, मुख्य इनोव्हेशन अधिकारी, व्यवस्थापक, कर्मचाऱ्यांची कंत्राटी भरती करण्यात येणार होती. मात्र, या महा-हबचे सध्या भिजत घाेंगडे आहे.
९९ वर्षांच्या कराराचे काय झाले ?
खोणी येथील २५ हेक्टर अतिक्रमणमुक्त गायरान जमीन ९९ वर्षांच्या कराराने हस्तांतरित करण्याची कार्यवाही झालेली नाही. कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी प्रस्तावित २५ हेक्टर जागेतील पहिल्या टप्प्यात सहा लाख चौ. फुटांचे बांधकाम करण्याचे नियोजन होते.
माहिती तंत्रज्ञान विभाग हा नोडल विभाग म्हणून काम पाहणार, तर उद्योग विभाग व महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ हे आवश्यक ते साहाय्य करणार असे ठरले होते.
महा-हब प्रकल्पाच्या नवीन संचालक नियुक्तीसाठी त्यांचा शोध सुरू आहे. प्रकल्पासाठी लागणाऱ्या जमिनीचे सर्वेक्षणही सुरू आहे. बरीचशी अन्य कामेही मार्गी लागली आहेत.
- रोहन घुगे, सीईओ, जि. प.ठाणे