सेना संपवण्याच्या वक्तव्याकरिता मेहतांनी मागितली माफी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2019 11:08 PM2019-11-06T23:08:21+5:302019-11-06T23:09:10+5:30
मेहता यांच्या या वक्तव्यामुळे शिवसैनिक संतप्त झाले असून सरनाईक यांनी त्यांना शांत करण्याकरिता मेहता
मीरा रोड : शिवसेना सर्वात विश्वासघातकी पक्ष असून मीरा-भार्इंदरमधून शिवसेना मुळासकट उखडून टाकण्याच्या आपल्या वक्तव्याबद्दल भाजपचे माजी आ. नरेंद्र मेहता यांनी शिवसेना आ. प्रताप सरनाईक यांना संदेश पाठवून माफी मागितली. भावनेच्या भरात व मानसिक तणावामुळे आपण बोलून गेल्याचे मेहतांनी फोन करून सांगितले, अशी माहिती सरनाईक यांनी दिली.
मेहता यांच्या या वक्तव्यामुळे शिवसैनिक संतप्त झाले असून सरनाईक यांनी त्यांना शांत करण्याकरिता मेहता यांच्या माफीची माहिती दिली. शिवसेना संपवण्याची भाषा करणारे स्वत:च संपले, असे सरनाईक शिवसैनिकांना म्हणाले. बाळासाहेब ठाकरे कलादालनास विरोध, मेहतांनी शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे व शिवसैनिकांवरील संस्कारांबाबत केलेले वक्तव्य आदी कारणांमुळे मेहतांबद्दल असलेला रोष विधानसभा निवडणुकीत मतदानयंत्रांतून प्रकट झाला. शिवसैनिकांनी मेहतांना धोबीपछाड दिल्यामुळे खवळलेल्या मेहता यांनी शिवसेना संपवण्याचे जाहीर वक्तव्य केले होते.
मेहतांच्या वक्तव्याचे सोशल मीडियावरही प्रतिसाद उमटले असून खासदार राजन विचारे यांनीदेखील मेहतांचा समाचार घेतला. शिवसेना संपवण्याची भाषा करण्याची मेहतांची पात्रता नाही, असे ते म्हणाले. लोकांनी तुमची पात्रता दाखवून दिली आहे. स्वत:च्या कर्माचे खापर दुसऱ्यांवर फोडण्यापेक्षा आत्मचिंतन करा, असा सल्ला विचारे यांनी दिला.