मेहता-जैन पुन्हा जुंपली!, प्रतिभा पाटील यांच्या पक्षप्रवेशाचा वाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2018 07:07 AM2018-01-30T07:07:34+5:302018-01-30T07:07:49+5:30

मीरा-भार्इंदरच्या माजी महापौर गीता जैन यांनी भाजपा आमदार नरेंद्र मेहता यांचा विरोध डावलून शिवसेनेत गेलेल्या माजी भाजपा नगरसेविकेला प्रदेशाध्यक्षांच्या हस्ते पुन्हा भाजपात प्रवेश दिल्याने जैन यांचे शक्तीप्रदर्शन आणि पाटील यांच्या प्रवेशाची चर्चा रंगली.

 Mehta-Jain rebuked !, Pratibha Patil's dispute | मेहता-जैन पुन्हा जुंपली!, प्रतिभा पाटील यांच्या पक्षप्रवेशाचा वाद

मेहता-जैन पुन्हा जुंपली!, प्रतिभा पाटील यांच्या पक्षप्रवेशाचा वाद

Next

मीरा रोड : मीरा-भार्इंदरच्या माजी महापौर गीता जैन यांनी भाजपा आमदार नरेंद्र मेहता यांचा विरोध डावलून शिवसेनेत गेलेल्या माजी भाजपा नगरसेविकेला प्रदेशाध्यक्षांच्या हस्ते पुन्हा भाजपात प्रवेश दिल्याने जैन यांचे शक्तीप्रदर्शन आणि पाटील यांच्या प्रवेशाची चर्चा रंगली. त्याचवेळी स्थानिकांना विश्वासात न घेता पक्षप्रवेश होणार असतील, तर वेळ पडल्यास पक्ष सोडण्याच्या आशयाचे वक्तव्य आ. मेहतांनी केल्याच्या चर्चेने खळबळ उडाली. पाटील यांना पक्षात घेणार नाही, असे आ. मेहतांनी ठणकावले असून वक्तव्याचा सोयीने चुकीचा अर्थ काढल्याचे स्पष्ट केले. जैन यांनी मात्र पक्षापेक्षा कोणी मोठे नाही, असे प्रत्युत्तर देत पक्ष सोडण्याची भाषा हा पक्षाला धमकावण्याचा प्रकार असल्याची टिप्पणी केली आहे.
मीरा-भार्इंदर भाजपामध्ये आमदार नरेंद्र मेहता यांचे वर्चस्व सर्वश्रुत आहे. नुकत्याच झालेल्या पालिका निवडणुकीत भाजपाचे ६१ नगरसेवक निवडून आल्याने त्यांचे महत्त्व वाढले असून महापौरपदी त्यांची भावजय डिम्पल यांना संधी देण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सातत्याने शहरात येत असल्याने मेहतांचे वजन पक्षासह पालिका, पोलीस, महसूल आदी प्रशासना दरबारीदेखील वाढले आहे. मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय अशी मेहतांची नवी ओळख निर्माण झाली आहे.
पक्षाच्या जिल्हा कार्यालयापासून बैठका, मेळावे, विविध कार्यक्रम आदी सर्व मेहतांच्या सेव्हन स्क्वेअर शाळेतच होतात. पक्षात कोणाला घ्यायचे व कोणाला नाही याचा अंतिम निर्णयही तेच घेतात. मीरा-भार्इंदरमध्ये भाजपा म्हणजे मेहता असे चित्र आहे.
परंतु मेहता व माजी महापौर गीता जैन यांच्यातील मतभेदही चर्चेचा विषय आहे. जैन या महापौर असतानाच्या काळापासूनच हे मतभेद सर्वश्रुत होते. आ. मेहतांच्या मीरा-भार्इंदर मतदारसंघातूनच जैन यांनी आगामी विधानसभा निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केल्याने मेहता-जैन संघर्ष उफाळून आला आहे.
जैन यांनी गेल्या मंगळवारी भार्इंदरच्या देवचंदनगरमध्ये स्वत:च्या जनसंपर्क कार्यालयाचे भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या हस्ते उद्घाटन करुन जोरदार शक्तीप्रदर्शन केले. राज्यमंत्री राम शिंदे, प्रदेश उपाध्यक्ष चैनसुख संचेती, खासदार कपील पाटील, आमदार प्रशांत बंब आदी यावेळी उपस्थित होते. महत्त्वाचे म्हणजे स्वत: आ. नरेंद्र मेहता हे महापौर डिम्पल मेहता, उपमहापौर चंद्रकांत वैती, स्थायी समिती सभापती ध्रुवकिशोर पाटील, जिल्हाध्यक्ष हेमंत म्हात्रे आदींसोबत आले होते.
त्यावेळी शिवसेनेत गेलेल्या भाजपाच्या माजी नगरसेविका प्रतिभा तांगडे-पाटील व काँग्रेसच्या माजी महिला उपाध्यक्षा रुपा पिंटो यांना दानवेंच्या हस्ते भाजपात प्रवेश देण्यात आला. शिवसेनेत गेलेल्या भाजपाच्या माजी नगरसेविका सुमन कोठारीही कार्यक्रमाला उपस्थित होत्या. पण त्यांचा भाजपा प्रवेश झाला नाही.
वास्तविक पाटील यांनी मेहतांकडून अन्याय झाल्याची कैफियत मांडत पालिका निवडणुकीत शिवसेनेत प्रवेश करुन निवडणूक लढवली होती, तर जेसलपार्क भागात मेहतांनी काँग्रेसच्या शानू गोहिल यांना भाजपात घेतल्याने तिकीट कापले जाणार म्हणून भाजपाच्या नगरसेविका सुमन कोठारी यांनी शिवसेनेत प्रवेश करुन निवडणूक लढवली होती. पण दोघींचाही निवडणुकीत पराभव झाला होता. जैन यांच्या माध्यमातून भाजपात त्यांनी पुन्हा प्रवेशाच्या हालचाली सुरु केल्याने मेहतांनी त्यास विरोध केला. उद्घाटन कार्यक्रमात दानवे यांच्या उपस्थितीत पाटील यांना पुन्हा भाजपात प्रवेश देण्यास व्यासपीठावरच आ. मेहतांनी विरोध केला. परंतु दानवे यांनी विरोधाला न जुमानता पाटील यांना प्रवेश दिला.
दानवे यांनी भाषणात, ही निवडणुकीची सभा वाटत असल्याचे सांगत जैन यांना शुभेच्छा दिल्या. सर्वात शेवटी आ. मेहतांचे नाव घेतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे मीरा-भार्इंदरमध्ये तसेच देशात भाजपाची ताकद वाढल्याचे सूचक उद्गार त्यांनी काढले होते.
जैन उभे करत असलेले आव्हान आणि प्रतिभा पाटील यांना विरोध डावलून दिलेला भाजपा प्रवेश यामुळे आ. मेहता संतापले आहेत. तिरंगा यात्रेच्या पूर्वतयारीनिमित्त त्यांच्या शाळेत आयोजित पदाधिकारी, नगरसेवक आदींच्या बैठकीतही त्याचे पडसाद उमटले. महापौर डिम्पल मेहता, उपमहापौर चंद्रकांत वैती, गटनेते हसमुख गेहलोत, जिल्हाध्यक्ष हेमंत म्हात्रे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
जैन यांच्या कार्यक्रमात जिल्हाध्यक्ष, मंडळ अध्यक्ष यांना डावलले गेल्याचा टीकेचा सूर बैठकीत उमटला. आ. मेहतांनीही जिल्हाध्यक्ष व स्थानिकांना विश्वासात न घेता प्रतिभा पाटील यांना पक्षात प्रवेश दिला जात असेल, तर वेळ पडल्यास पक्ष सोडणार असल्याच्या आशयाचे वक्तव्य केले. तेथे उपस्थित भाजपाच्या पदाधिकाºयांनी नाव न छापण्याच्या अटीवर या वक्तव्यास दुजोरा दिला.

प्रदेशाध्यक्षांपेक्षा कोणी मोठा नाही : जैन

प्रतिभा पाटील यांना भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे-पाटील यांनी पक्षात प्रवेश दिला आहे. त्यांच्यापेक्षा पक्ष संघटनेत कोणी स्वत:ला मोठे समजत असेल, तर माहीत नाही असे प्रत्युत्तर माजी महापौर गीता जैन यांनी दिले आहे. पाटील यांच्या प्रवेशावरुन कोणी पक्ष सोडण्याची भाषा करणे म्हणजे पक्षाला धमकावण्याचा प्रकार असल्याची टीप्पणी देखील जैन यांनी केली आहे.

पाटील यांना पक्ष स्वीकारणार नाही : मेहता
मेहतांनी मात्र पक्ष सोडण्याच्या वक्त व्याबद्दल स्पष्ट केले, की ते वक्तव्य तसे नाही. भाषणाचे एक वाक्य काढले, की त्याचा अर्थ चुकीचा जातो. त्यासाठी पूर्ण पॅरेग्राफच वाचावा लागतो. परंतु मी ठणकावून सांगतो, की प्रतिभा पाटील यांना पक्षात घेणार नाही. गीता जैन यांनी त्यांना घाईघाईत प्रवेश दिला. प्रतिभा पाटील यांना पक्ष स्वीकारणार नाही. पक्षात प्रवेश देताना जिल्हाध्यक्ष, स्थानिक कार्यकर्त्यांना विश्वासात घ्यावे लागते. पक्षात येणाºयाची पार्श्वभूमी, तो पक्षाला फायदेशीर राहील की नाही, याचा विचार करुनच प्रवेश दिला जातो. काँग्रेसच्या पिंटो यांना प्रवेश देण्याचा निर्णय जिल्हाध्यक्ष व आम्ही दोघांनी स्थानिकांना विश्वासात घेऊन केला आहे. पण पाटील यांना पक्षात घेणार नाही, असेदेखील मेहतांनी स्पष्ट सांगितले.

Web Title:  Mehta-Jain rebuked !, Pratibha Patil's dispute

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.