ओवळा-माजिवडा विधानसभा मतदारसंघात मेहता-सरनाईक वादाचे युतीवर सावट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2019 11:35 PM2019-03-12T23:35:12+5:302019-03-12T23:35:27+5:30
काँग्रेसला दिसतात विधानसभेची गणिते
- अजित मांडके
ठाणे लोकसभा मतदारसंघात असलेल्या ओवळा - माजिवडा विधानसभा मतदारसंघातील युतीच्या नगरसेवकांची संख्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांपेक्षा तिप्पट आहे. मात्र याच मतदारसंघात मागील काही महिन्यांपासून भाजपा विरुध्द शिवसेना असा सामना रंगत आहे. भाजपाचे आमदार नरेंद्र मेहता आणि शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्यात रस्त्याच्या कामावरुन वाक्युध्द रंगले होते. त्यामुळे युतीचे मनोमीलन कसे होते यावर पुढील गणिते अवलंबून राहतील.
सर्वांची मोट बांधण्याचे कौशल्य शिवसेनेचे सरनाईक यांनाच दाखवावे लागेल. काँग्रेस हा फॅक्टर या मतदारसंघात प्रभावी आहे. त्यांच्याकडे असलेली सुमारे ७० हजारांच्या आसपासची मते निर्णायक भूमिका बजावतात. मुझफ्फर हुसेन यांना आगामी विधानसभा निवडणूक येथून लढवायची असल्याने त्यांना जो मदतीकरिता हात पुढे करील त्याच्या पारड्यात ही निर्णायक मते जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
ठाणे लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे राजन विचारे यांची पुन्हा उमेदवारी पक्की आहे. मागील निवडणुकीत विचारे यांना मोदी लाटेमुळे ५ लाख ९५ हजार ३६४ मते मिळाली होती तर राष्टÑवादीचे संजीव नाईक यांना ३ लाख १४ हजार ६५ मते मिळाली होती. मीरा भाईंदरमध्ये नाईक यांना विचारेंच्या तुलनेत कमी मते पडली होती. परंतु त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत युती न झाल्याने शिवसेना विरुध्द भाजपा असा सामना ओवळा माजिवडा विधानसभा मतदारसंघात पाहायला मिळाला होता. त्यावेळेस भाजपाच्या संजय पांडे यांनी फारसा प्रचार न करताही शिवसेनेच्या प्रताप सरनाईक यांच्या तोंडचे पाणी पळवले होते. जवळपास १८व्या फेरीपर्यंत पांडे यांनी मतांची आघाडी घेतली होती. परंतु त्यानंतर या मतदारसंघातील ठाण्यातील परिसराच्या मतपेट्यांनी सरनाईक यांना तारले. सरनाईक यांना ६८ हजार ५७१ मते मिळाली होती तर पांडे यांना ५७ हजार ६६५ मते मिळाली होती. लोकसभेप्रमाणेच विधानसभेतही राष्टÑवादीच्या मतांमध्ये घट झाल्याचे दिसून आले. राष्टÑवादीचे हणमंत जगदाळे यांना २० हजार ६८६ मते मिळाली होती तर मनसेचे उमेदवार सुधाकर चव्हाण यांना २० हजार ५६८ मते मिळाली होती. परंतु त्यानंतर झालेल्या ठाणे महापालिकेच्या आणि मीरा भाईंदर महापालिकेच्या निवडणुकीत राष्टÑवादीला फटका बसला. मीरा भाईंदरमध्ये राष्टÑवादीला भोपळा फोडता आला नाही. सरनाईक यांच्या ठाण्यातील प्रभागात राष्टÑवादीचे चार नगरसेवक निवडून आले तर कॉंग्रेसचा एक नगरसेवक निवडून आला. त्यामुळे या पट्ट्यात शिवसेनेकरिता ही धोक्याची घंटा मानली जात असली तरी मतांचा फरक हा केवळ एक ते दीड हजारांचा आहे. मीरा-भाईंदरमध्ये भाजपाने एकहाती सत्ता घेत ६१ नगरसेवक निवडून आणले. शिवसेनेचे २२ नगरसेवक निवडून आले.
महापालिका निवडणुकीपूर्वी याठिकाणी शिवसेना सत्तेवर येईल, अशी आशा वाटत असतांनाच शिवसेनेतील अंतर्गत गटबाजीमुळे अनेक ठिकाणी अपक्ष उमेदवार उभे केल्याचा फटका शिवसेनेच्या उमेदवारांना बसला. त्यामुळे भाजपाला लाभ झाला. मात्र अगोदर महापालिकेत असलेली शिवसेना नगरसेवकांचे नऊ हे संख्याबळ २२ वर गेल्याने शिवसेनेने त्यातच समाधान मानले.
विधानसभा निवडणुकीत सरनाईक यांच्या विरोधात लढलेले संजय पांडे हे ठाणे महापालिका निवडणुकीच्या वेळेस शिवसेनेत आल्याने ही शिवसेनेसाठी जमेची बाजू मानली पाहिजे. परंतु ते किती फायदेशीर आहेत, याबाबत मात्र कार्यकर्तेच शंका उपस्थित करीत आहेत. मागील विधानसभा निवडणुकीत मीरा-भाईंदरमधून सरनाईक यांना मते मिळाली असली तरी ठाण्यातीलच मतदारांनी त्यांना तारले होते, हे सुध्दा तितकेच महत्वाचे आहे. त्यामुळे ठाण्यातील लोकमान्य नगर, वर्तक नगर, चिराग नगर, सुभाष नगर, घोडबंदर, गांधी नगर, नळपाडा, माजिवडा गांव, शिवाई नगर हा पट्टा विचारेंसाठी सुध्दा निर्णायक ठरण्याची शक्यता आहे.
अर्थात मीरा-भाईंदर मात्र विचारेंना डोकेदुखी ठरणार आहे. युती झाली असली तरी येथे शिवसेना आणि भाजपामध्ये खटके उडत आहेत. मागील काही महिन्यांपूर्वी विकासकासाठी एका रस्त्याच्या कामावरुन सरनाईक आणि नरेंद्र मेहता असा वाद चांगलाच रंगला होता. भाजपाने केलेल्या काही भूमिपुजन, लोकार्पणांच्या कार्यक्रमाला शिवसेनेच्या नेत्यांनी मांडलेली दांडी हा विषय चांगलाच गाजला होता.
युती होणार म्हणून खा. विचारे यांनी उत्तन येथे भूमिपुजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाच्या वेळेस बॅनरवर नरेंद्र मेहता यांचा फोटो झळकला होता. परंतु त्यांनी या कार्यक्रमाला दांडी मारली होती. आता आमच्यात कोणत्याही प्रकारचे मतभेद नसल्याचा दावा सरनाईक करीत असले तरी अंतर्गत गटबाजी आजही येथे प्रकर्षाने दिसत आहे.
दुफळी मिटवावी लागणार
विचारे यांना मीरा भार्इंदरमध्ये शिवसेना आणि भाजपा नगरसेवकांमध्ये माजलेली दुफळी मिटवण्याचे काम करावे लागणार आहे. यासाठी सरनाईक यांना पुढाकार घेऊन यामध्ये सुवर्णमध्य काढावा लागणार आहे.
दृष्टिक्षेपातील राजकारण
२०१४ नंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत ओवळा-माजिवडा विधानसभा मतदारसंघावर शिवसेनेने आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. आता युती झाली असली तरी मीरा भार्इंदरचे आमदार मेहता आणि सरनाईक यांना जुळवून घ्यावे लागणार आहे.
मुझफ्फर हुसेनांची भूमिका ठरणार निर्णायक :राष्टÑवादीचे येथील आमदार गिर्ल्बट मेंडोसा हे सध्या शिवसेनेसोबत असल्याने त्याचा फायदा शिवसेनेलाच होईल अशी शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे राष्टÑवादीला या ठिकाणी मुझफ्फर हुसेन यांच्या सोबत मिळतेजुळते घ्यावे लागणार आहे. कॉंग्रेसचे मीरा भाईंदरमध्ये १२ नगरसेवक असून ठाण्यात एक नगरसेवक आहे. परंतु हुसेन यांना आगामी विधानसभा निवडणूक लढवायची असल्याने आणि त्यांच्यासाठी १४५ विधानसभा मतदारसंघ राष्टÑवादीला सोडावा लागणार आहे. हा मतदारसंघ सोडला तरच हुसेन यांचा राष्टÑवादीला फायदा होईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
राजकीय घडामोडी
विधानसभा निवडणुकीत भाजपाचे संजय पांडे यांनी सरनाईक यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. परंतु त्यांनीच आता शिवसेनेत प्रवेश केल्याने ही शिवसेनेसाठी जमेची बाजू आहे.
आ. प्रताप सरनाईक आणि नरेंद्र मेहता यांच्यात रस्त्याच्या कामावरुन चांगलीच जुंपली होती. आता मात्र आमच्यात असा काही वादच झाला नसल्याचा दावा उभयतांनी केला आहे.
मधल्या काळात मीरा भाईंदरमधील शिवसेनेच्या नगरसेविका अनिता पाटील यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. परंतु आता युती झाल्याने त्याचा काही फारसा फरक पडणार नसल्याचे दिसत आहे.