एमआयडीसीने वाल्मिकी उद्यानाची विक्री केल्याच्या निषेधार्थ मेहतर समाजाचा मोर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2021 04:36 PM2021-09-29T16:36:19+5:302021-09-29T16:36:50+5:30
Thane : रामनगर- रामवाडी, रोड नंबर 28 परिसरात वाल्मिकी समाजाची मोठी संख्या आहे. या समाजाला आपले कार्यक्रम करता यावे, या उद्देशाने येथील नगरसेवक डॉ. जितेंद्र वाघ यांनी प्लॉट क्रमांक 414 येथे एक शेड बांधून दिली होती.
ठाणे (प्रतिनिधी)- ठाणे महानगर पालिकेने पडीक असलेला भूखंड विकसीत करुन वाल्मिकी उद्यानाची निर्मिती केल्यानंतर हा भूखंड परस्पर खासगी इसमास विकला असल्याच्या निषेधार्थ रामवाडी-रामनगर परिसरातील वाल्मिकी समाज बांधवांनी एमआयडीसीवर मोर्चा नेला. विशेष म्हणजे, पोलिसांनी मोर्चास परवानगी नाकारल्यानंतरही येथील तरुणांनी दुचाकीवरुन हा मोर्चा नेला.
रामनगर- रामवाडी, रोड नंबर 28 परिसरात वाल्मिकी समाजाची मोठी संख्या आहे. या समाजाला आपले कार्यक्रम करता यावे, या उद्देशाने येथील नगरसेवक डॉ. जितेंद्र वाघ यांनी प्लॉट क्रमांक 414 येथे एक शेड बांधून दिली होती. तसेच, एक मंच, उद्यानही उभारण्यात आले होते. या जागेत प्रवेश करण्यासाठी एक प्रवेशद्वार उभारण्यात आला होता. या प्रवेशद्वारावरही ठाणे महानगर पालिका, वाल्मिकी उद्यान असा नामोल्लेख करण्यात आला होता. त्या ठिकाणी वाल्मिकी समाजाचे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत.
याच ठिकाणी ठाणे महानगर पालिकेची एक पाण्याची टाकीदेखील आहे. या पाण्याच्या टाकीद्वारे परिसरातील लोकांना पाण्याचा पुरवठाही करण्यात येत आहे. असे असताना आता अचानक या प्लॉटची मालकी खासगी इसमाकडे वर्ग करण्यात आली आहे. त्या निषेधार्थ रिपाइं एकतावादीचे ठाणे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ चव्हाण, वाल्मिकी नेते दशरथ आठवाल, दावडा सेठ यांच्या नेतृत्वाखाली शेकडो वाल्मिकी समाजबांधवांनी वाल्मिकी उद्यानापासूनच मोर्चाला सुरुवात केली. या ठिकाणी एमआयडीसीच्या विरोधात मोर्चेकर्यांनी घोषणाबाजी केली. हा मोर्चा पायी निघणार होता. मात्र, पोलिसांनी मोर्चाला परवानगी नाकारल्यामुळे मोर्चेकर्यांनी दुचाकीवरुन एमआयडीसीचे कार्यालय
गाठून एमआयडीसी प्लॉट क्रमांक 414 हा भूखंड वाल्मिकी समाजाच्या उपक्रमांसाठी राखीव ठेवण्यात यावा; प्लॉट क्रमांक 414 अर्थात वाल्मिकी उद्यानाचा खरेदी-विक्रीचा व्यवहार रद्द करण्यात यावा; प्लॉट क्रमांक 414 वरील खासगी इसमाचे अतिक्रमण दूर करुन वाल्मिकी समाजाच्या उपक्रमांना त्याचा वापर करण्यास परवानगी देण्यात यावी, या मागणीचे निवेदन दिले. यावेळी राजाभाऊ चव्हाण आणि दशरथ आठवाल यांनी, वाल्मिकी समाजाच्या कार्यक्रमांवर बंदी आणण्यासारखाच आहे.
ठाणे : एमआयडीसीने वाल्मिकी उद्यानाची विक्री केल्याच्या निषेधार्थ मेहतर समाजाचा मोर्चा https://t.co/CbvSFUjpi9pic.twitter.com/kFH6SdeBYU
— Lokmat (@MiLOKMAT) September 29, 2021
एकीकडे अनेक वर्षापासून ठाणे महानगर पालिकेने या भूखंडाची काळजी घेऊन त्या ठिकाणी विविध उपक्रम सुरु केले असतानाच आता अचानक का भूखंड खासगी इसमाच्या ताब्यात देणे अत्यंत चुकीचे आहे. वाल्मिकी महाराजांच्या नावावर असलेल्या या उद्यानाची विक्री करुन वाल्मिकी समाजाच्या भावना दुखावण्याचा प्रकार केला आहे. या संदर्भात मागील आठवड्यात पत्रव्यवहार केलेला असतानाही भूखंड विक्रीचा व्यवहार करुन भूखंड विकत घेणार्या इसमाने आता हे उद्यान ताब्यात घेऊन वाल्मिकी समाजाला सदर उद्यानामध्ये प्रवेश करण्यापासून रोखले जात आहे. त्यामुळे हा खरेदी-विक्रीचा व्यवहार रद्द करुन उद्यान पुन्हा वाल्मिकी समाजाच्या ताब्यात देण्यात यावा, अन्यथा, या मोर्चापेक्षा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा दिला.
या आंदोलनात बीरपाल भाल, रामवीर पारछा, विनोद सजानिया, नरेश बोहित, राजपाल मरोठिया, सोनी चौहान, श्याम पारछा, राजेश खत्री, राजकुमार सिंह, दशरथ आठवाल, अशोक पवार, राजू सैदा आदी सहभागी झाले होते.