भाजपवरील कब्जाकरिता मेहतांचे प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 04:26 AM2021-06-28T04:26:53+5:302021-06-28T04:26:53+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मीरा रोड : मीरा भाईंदर भाजपच्या जिल्हाध्यक्षपदी रवी व्यास यांची प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नियुक्ती केल्याने ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मीरा रोड : मीरा भाईंदर भाजपच्या जिल्हाध्यक्षपदी रवी व्यास यांची प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नियुक्ती केल्याने त्यांच्या विरोधात माजी आमदार नरेंद्र मेहता व त्यांच्या समर्थकांनी मोर्चेबांधणी सुरू केली. व्यास यांच्या नियुक्तीचा फेरविचार करण्याकरिता मेहता समर्थकांनी दिलेल्या दोन दिवसांच्या मुदतीचा इशारा प्रदेश नेतृत्वाने केराच्या टोपलीत टाकला.
गेल्यावर्षी भाजपाचे मेहता यांनी भाजपच्या सर्व पदांचा राजीनामा देऊन राजकारणापासून दूर होत असल्याचे स्वतः व्हिडिओद्वारे जाहीर केले होते. मेहतांविरोधात बलात्काराची तक्रार, तसेच त्यांची व्हिडिओ क्लिप व्हायरल झाल्याच्या पार्श्वभूमीवर मेहता यांनी ही भूमिका घेतल्याचे मानले जात होते. प्रत्यक्षात मेहता महापालिकेत, तसेच भाजपच्या राजकीय घडामोडीत सक्रिय राहिले.
भाजपच्या जिल्हाध्यक्षपदी हेमंत म्हात्रे यांची पुन्हा नियुक्ती झाल्यानंतरसुद्धा मेहता व समर्थकांनी विरोधात भूमिका घेतली. आता नगरसेवक रवी व्यास यांच्या हाती जिल्हाध्यक्षपदाची धुरा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली असताना थेट पक्षनेतृत्वाला आव्हान दिले. व्यास यांची नियुक्ती कोणालाच विश्वासात न घेता केल्याचा आरोप करत मेहता व समर्थकांनी मोर्चेबांधणी सुरू केली. व्यास यांच्या नियुक्तीचा दोन दिवसांत फेरविचार करावा; अन्यथा पुढची दिशा ठरवू, अशी धमकीच मेहता समर्थकांनी पक्ष नेतृत्वास दिली.
...........
अल्टिमेटमला घातली नाही भीक
प्रदेश नेतृत्वाने मेहता समर्थकांच्या दबावाला भीक न घालण्याचा निर्णय घेतल्याचे दिसत आहे. नेतृत्वाने व्यास यांचे जिल्हाध्यक्षपद कायम ठेवल्याने मेहता समर्थकांचे इशारे पोकळ ठरले आहेत. महापौर ज्योत्स्ना हसनाळे यांच्या महापालिका दालनात मेहता व व्यास यांची भेट झाली. मेहता यांनी भाजप नगरसेवक व पदाधिकाऱ्यांची अलीकडेच बैठक घेतली. रविवारी भाजपच्या सृष्टी मंडळाची बैठक बोलावण्यात आली. मेहतांचा भाजप संघटना स्वतःच्या बाजूने करण्याचा हा प्रयत्न मानला जात आहे. मीरा भाईंदरमध्ये मेहता जे सांगतील व ठरवतील तोच भाजप, असे चित्र निर्माण केले जात असल्याचे राजकीय जाणकारांचे म्हणणे आहे.
..........
वाचली