मीरा भाईंदर पालिकेतील अधिकाऱ्यांची मुख्य सचिवांमार्फत चौकशी

By admin | Published: April 5, 2017 03:36 PM2017-04-05T15:36:16+5:302017-04-05T15:36:16+5:30

मीरा-भार्इंदर महापालिका हद्दीतील दोन उद्यानाच्या उद्घाटनावेळी भाजपाचे आ. नरेंद्र मेहता यांच्याखेरीज इतर कोणत्याही लोकप्रतिनिधींना कार्यक्रमाचे आमंत्रण देण्यात

Meira Bhaindar Municipal Chief Secretaries | मीरा भाईंदर पालिकेतील अधिकाऱ्यांची मुख्य सचिवांमार्फत चौकशी

मीरा भाईंदर पालिकेतील अधिकाऱ्यांची मुख्य सचिवांमार्फत चौकशी

Next
>राजू काळे/ऑनलाइन लोकमत
भार्इंदर, दि. 05 - मीरा-भार्इंदर महापालिका हद्दीतील दोन उद्यानाच्या उद्घाटनावेळी भाजपाचे आ. नरेंद्र मेहता यांच्याखेरीज इतर कोणत्याही लोकप्रतिनिधींना कार्यक्रमाचे आमंत्रण देण्यात आले नाही. तसेच गेल्या जागतिक महिला दिनावेळी पालिकेच्या निमंत्रण पत्रिकेवर भाजपाच्या कमळाचे चिन्ह वापरल्याने या गैरप्रकाराकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष करणा-या त्या-त्या विभागातील अधिका-यांविरोधात सेनेचे आ. प्रताप सरनाईक यांनी विधानसभेत सादर केलेल्या हक्कभंगावर विधानसभाध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी राज्याचे मुख्य सचिव सुमित मलिक यांच्यामार्फत चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. 
पालिकेत युतीची सत्ता अस्तित्वात असून त्यात भाजपाचे संख्याबळ जास्त आहे. त्याचा फायदा भाजपाकडून घेतला जात असल्याचा आरोप सर्वच स्तरातून होत असताना सत्तेतील मित्रपक्षाला देखील त्याचा प्रत्यय पावलोपावली येत आहे. असेच प्रकार काही दिवसांपूर्वी घडले. त्यातील एक म्हणजे पालिकेने मीरारोडच्या रामदेव पार्कमधील आरक्षण क्र. २३५ वर संगीतावर आधारीत कै. रामभाऊ म्हाळगी हे अत्याधुनिक उद्यान विकसित केले आहे. त्यापासून काही अंतरावरील आरक्षण क्र. २१६ वर कै. अरविंद पेंडसे हे पंचतत्वावर आधारीत दुसरे उद्यान विकसित केले आहे. हि दोन्ही उद्याने पालिका प्रभाग क्र. ३१ तर विधानसभा मतदार संघ १४६ मध्ये अंतर्भूत होतात. येथील मतदार संघाचे विद्यमान आमदार म्हणून प्रताप सरनाईक तर प्रभागाचे विद्यमान नगरसेवक म्हणून आ. नरेंद्र मेहता हे आहेत. सरनाईक यांनी या उद्यानांच्या विकासाकरिता आमदार निधीतून १० लाखांचा निधी पालिकेला उपलब्ध करुन दिला. त्यानुसार पालिकेने गेल्या मार्च महिन्यात त्या उद्यानांचे काम पूर्ण केल्यानंतर ५ मार्चला त्या दोन्ही उद्यानांचे उद्घाटन थेट भाजपाचे आ. नरेंद्र मेहता यांच्या हस्ते उरकण्यात आले. पालिकेच्या संबंधित अधिका-यांनी त्याचे निमंत्रण सरनाईक यांना दिले नाही. यामुळे संतप्त झालेल्या सरनाईक यांनी त्या अधिका-यांवर विधानसभेत हक्कभंग आणण्याचा इशारा दिला. तसेच महापौर गीता जैन यांनाही त्याचा थांगपत्ता नसल्याने त्याही संतप्त झाल्या.  त्यांनी आयुक्त डॉ. नरेश गीते यांना पत्र पाठवुन अधिका-यांच्या मुजोरीवर नाराजी व्यक्त केली. मात्र याबाबत आपल्यालाच कल्पना नसल्याचा दावा त्या अधिका-यांकडून करण्यात आला आहे. यानंतर पालिकेच्या महिला व बालकल्याण समितीमार्फत ८ मार्चला महिलांच्या कार्यक्रमाचे आयोजन भार्इंदर पश्चिमेकडील नेताजी सुभाषचंद्र बोस मैदानात करण्यात आले होते. त्यावेळी पालिकेने सर्व नगरसेविकांसह नगरसेवकांना निमंत्रित करण्यासाठी पत्रिका छापल्या होत्या. त्यातील काही पत्रिकांवर चक्क भाजपाच्या कमळाचे चिन्ह छापण्यात येऊन त्यावर भेटवस्तु देण्यात येणार असल्याचे नमुद करण्यात आले होते. तसेच भेटवस्तुंचा उल्लेख असलेल्या पत्रिकांचे वाटप केवळ भाजपा नगरसेविका व पदाधिका-यांना करण्यात आले. यामुळे सत्तेतील मित्रपक्ष असलेल्या सेनेतील महिला नगरसेविकांच्या भावना दुखावल्या. त्याची तक्रार त्यांनी शहर संपर्क प्रमुख व स्थानिक आमदार म्हणुन सरनाईक यांच्याकडे केली. तसेच त्याचा निषेध व्यक्त करुन संबंधित अधिका-यांना जाबही विचारण्यात आला. पालिकेतील अधिका-यांनी प्रशासकीय कारभार भाजपाच्या भोवतीच केंद्रीकृत करुन त्याखेरीज इतर पक्षाला दुय्यम स्थान दिले जात असल्याने सरनाईक यांनी चालु अधिवेशनात संबंधित अधिका-यांवर हक्कभंग दाखल केला. त्यावर विधानसभाध्यक्षांनी त्याची चौकशी मुख्य सचिवांमार्फत करण्याचे निर्देश दिले. हि चौकशी अंतिम टप्प्यात असुन त्यात अधिकारी दोषी असल्याचे सिद्ध झाल्यास त्यांच्यावर हक्कभंगाची कारवाई होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. 

Web Title: Meira Bhaindar Municipal Chief Secretaries

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.