तीन नगरसेवकांचे सदस्यत्व रद्द
By admin | Published: November 4, 2015 03:14 AM2015-11-04T03:14:24+5:302015-11-04T03:14:24+5:30
बेकायदा बांधकाम केल्याप्रकरणी ठाणे महानगर पालिकेच्या तीन नगरसेवकांचे सदस्यत्व रद्द करण्याची कारवाई महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी केली आहे.
ठाणे : बेकायदा बांधकाम केल्याप्रकरणी ठाणे महानगर पालिकेच्या तीन नगरसेवकांचे सदस्यत्व रद्द करण्याची कारवाई महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी केली आहे. यामध्ये मनसेचे नगरसेवक शैलेश पाटील, शिवसेनेचे राम एगडे आणि राष्ट्रवादीचे मनोहर साळवी यांचा समावेश आहे.
सोमवारी या संदर्भात पालिका आयुक्तांपुढे सुनावणी झाली होती. त्यानंतर मंगळवारी सांयकाळी त्यांनी ही कारवाई केली. शैलेश पाटील यांनी दिवा येथे बेकायदा बांधकामे उभारण्यात पुढाकार घेतला होता. तसेच, या भागातील बेकायदा बांधकामांना अभय देण्यातही त्यांचा मोठा वाटा होता. राम एगडे यांनी पत्नीच्या नावे बेकायदा बांधकामाची खरेदी केली होती. तर, मनोहर साळवी यांनी कळव्यात बेकायदा बांधकामांना संरक्षण दिले होते; तसेच, ती पाडण्याकरीता आलेल्या अधिकाऱ्यांना दमदाटीदेखील केली होती. या संदर्भात तक्र ारी झाल्यानंतर त्यांचे पद रद्द करण्यासाठी अनेकवेळा पालिकेच्या महासभेमध्ये विषय मांडले होते. मात्र, प्रत्येक वेळी हा प्रस्ताव प्रलंबित ठेवण्यात आला होता. त्यामुळे आयुक्तांनी हे प्रकरण कोकण आयुक्तांकडे वर्ग केले होते. मात्र, कोकण आयुक्तांनी ते पुन्हा ठाणे महानगर पालिका आयुक्तांकडे वर्ग केले. त्यानुसार, आयुक्तांनी मंगळवारी या तीन नगरसेवकांवर महाराष्ट्र महापालिका अधिनियम १० (१) ड या कलमाच्या तरतुदीनुसार कारवाई केली. याबाबतची अंतिम सुनावणी २ नोव्हेंबर रोजी त्यांच्या दालनात पार पडली. तीमध्ये शैलेश पाटील यांनी स्वत:च्या जमीनीवर अनधिकृत बांधकाम केले या कारणास्तव, राम एगडे यांनी पत्नीच्या नावे अनधिकृत घर घेतल्याच्या कारणावरून तर मनोहर साळवी यांनी अनधिकृत बांधकाम निष्काषित करण्याच्या कारवाईमध्ये अडथळा आणणे आणि सहाय्यक आयुक्तास मारहाण करणे या कारणास्तव त्यांना अनर्ह केल्याचे आयुक्तांनी घोषित केले. तशा स्वरूपाचा आदेश महापालिकेच्या निवडणूक विभागाकडे पाठविला आहे.
दरम्यान, अशा प्रकारच्या तक्र ारी पाच ते सहा नगरसेवकांच्या विरोधातही केल्या आहेत. त्यामुळे त्यांच्यावरही सदस्यत्व रद्दतेची कारवाई अटळ असल्याची चर्चा पालिका वर्तुळात सुरु होती. (प्रतिनिधी)