अँजिओप्लास्टी झाल्याने हलके काम मागणाऱ्या कामगाराला मेमो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2021 04:44 AM2021-03-09T04:44:03+5:302021-03-09T04:44:03+5:30
कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात कामाला असलेल्या रमेश सोलंकी यांची अँजिओप्लास्टी करण्यात आल्याने त्यांना हलक्या स्वरूपाची कामे ...
कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात कामाला असलेल्या रमेश सोलंकी यांची अँजिओप्लास्टी करण्यात आल्याने त्यांना हलक्या स्वरूपाची कामे करण्यास द्यावीत, अशी शिफारस डॉक्टरांनी केली. या शिफारशीनुसार सोलंकी यांनी प्रशासनाकडे हलक्या स्वरूपाच्या कामाची मागणी केली असता त्यांना प्रशासनाकडून मेमो देण्यात आला. यामुळे प्रशासनातील अधिकारी कामगारांच्या आरोग्याबाबत किती बेफिकीर व निष्ठुर आहेत हेच उघड झाले आहे.
सोलंकी यांना हृदयाचा त्रास सुरू झाल्यावर त्यांनी उपचारासाठी रुग्णालयात धाव घेतली. त्यांना डॉक्टराने अँजिओप्लास्टी करण्यास सांगितले. त्यानंतर डॉक्टरांनी त्यांना दगदगीची, दमछाक करणारी कामे न करता हलक्या स्वरूपाची कामे करावीत, असा लेखी वैद्यकीय सल्ला दिला. सोलंकी यांनी महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे अर्ज करून त्यांना असलेल्या आजाराबाबत कागदपत्रे सादर केली. रुक्मिणीबाई रुग्णालयातील अपघात विभागात सकाळच्या सत्रात हलक्या स्वरूपाचे काम द्यावे, अशी विनंती केली. मात्र, आरोग्य विभागाने त्यांच्या अर्जाचा सहानुभूतिपूर्वक विचार न करता त्यांना मेमो बजावला. या मेमोने सोलंकी व्यथित झाले आहेत. आपल्यावर वैद्यकीय सल्ला डावलून अवजड, दगदगीच्या कामाची सक्ती केली तर आपल्या प्रकृतीचे काय होणार, अशी चिंता त्यांना सतावत आहे.
याबाबत वैद्यकीय अधिकारी पुरुषोत्तम टिके म्हणाले, रुग्णालयाच्या अपघात विभागात केवळ चार कर्मचारी आहेत. एखाद्या कर्मचाऱ्याला सकाळच्या सत्रातीलच ड्युटी दिल्यास अन्य कर्मचाऱ्यांवर ते अन्यायकारक होईल. तब्येतीची काळजी घेऊन डॉक्टरांच्या फिटनेस प्रमाणपत्रानंतर कामगाराने कामावर हजर झाले पाहिजे. एकदा कामावर हजर झाल्यावर रुग्णालयातील रुटीन कामे करावीच लागतील. अर्थात सोलंकी यांच्या प्रकृतीची अडचण लक्षात घेऊन हेतूत: त्यांनाच जड काम देणार नाही.
फोटो-कल्याण-रमेश सोलंकी
-----------------------
वाचली.