अभिनय कट्ट्यावर उलगडणार शाळांच्या आठवणी; दरमहिन्याला एक शाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2020 11:55 PM2020-01-11T23:55:02+5:302020-01-11T23:55:21+5:30
माझी शाळा उपक्रमास आजपासून सुरुवात
प्रज्ञा म्हात्रे
ठाणे : शाळा हा प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय असतो. शाळा सोडल्यानंतरही प्रत्येक विद्यार्थ्याचे या शाळेशी अतूट नाते असते. शाळेने केलेले संस्कार कोणताही विद्यार्थी कधी विसरू शकत नाही. गुरुस्थानी मानल्या जाणाऱ्या ठाण्यातील प्रत्येक शाळांचा प्रवास आता अभियन कट्ट्यावर उलगडला जाणार आहे. माझी शाळा या उपक्रमांतर्गत शाळेतील प्रत्येक हृद्य आठवणींना उजाळा मिळणार आहे. यात दरमहिन्याला ठाण्यातील एक शाळा येऊन आपला प्रवास मांडणार आहे.
अभिनय कट्ट्यावर वाचक कट्टा, संगीत कट्टा यानंतर आता आगळावेगळा कट्टा सुरू होत आहे. आपला पहिला गुरू आईवडील आणि आपली शाळा. शाळेने आपल्यावर केलेले संस्कार आपण कधीच विसरू शकत नाही. अभिनय कट्ट्याचे प्रमुख किरण नाकती यांच्या संकल्पनेतून अभिनय कट्ट्यावर महिन्यातून एका रविवारी ‘माझी शाळा’ नावाचा कट्टा होणार आहे. त्यात शाळेतील विद्यार्थ्यांचे विविध कलाविष्कार, आजवरच्या शाळेच्या यशस्वी प्रवासाचा वृत्तान्त, शिक्षकांचे योगदान, विविध क्षेत्रांत कार्यरत असणाºया माजी विद्यार्थ्यांची उल्लेखनीय कामगिरी असे अनेक विषय अनुभवून आपण आपल्या शाळेच्या प्रवासावर दृष्टिक्षेप टाकणार आहोत.
१२ जानेवारी रोजी सायं. ५ वा. माझी शाळामध्ये डॉ. बेडेकर विद्यामंदिर, ठाणे या शाळेचा सन्मान अभिनय कट्ट्यातर्फे केला जाणार आहे.
शाळेशी परत एकदा विद्यार्थ्यांनी जोडले जावे आणि आतापर्यंत शाळेने केलेला प्रवास आणि सध्या शाळेत सुरू असलेल्या अॅक्टिव्हिटी माजी विद्यार्थ्यांबरोबर सर्वच ठाणेकरांना समजाव्या, हाच यामागे हेतू आहे. सुरुवातीला १५ मिनिटे शाळेचा वृत्तान्त सादर केला जाईल. शाळेत सांस्कृतिक कार्यक्रम होत असतात. अशा कार्यक्रमांचे कट्ट्यावर सादरीकरण होईल, असे नाकती यांनी सांगितले.
ठाण्यात पहिल्यांदाच अशा प्रकारचा उपक्रम होत असून यात केवळ मराठी नव्हे तर इंग्रजी, हिंदी माध्यमांच्या शाळांचेही स्वागत आहे. सुरुवातीला महिन्यातून एकदाच हा कट्टा होईल. पण, प्रतिसाद वाढला तर महिन्यातून दोन कट्टे हे या उपक्रमासाठी असतील. - किरण नाकती