मेंडोन्सांच्या प्रवेशाने सरनाईकांना धक्का?

By admin | Published: June 20, 2017 06:32 AM2017-06-20T06:32:41+5:302017-06-20T06:32:41+5:30

गेल्या आमदारकीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या नेत्यांनी न दिलेली साथ आणि पडत्या काळातही न दिलेल्या पाठबळामुळे नाराज झालेले गिल्बर्ट मेंडोन्सा यांचा

Mendonas push the sarneike? | मेंडोन्सांच्या प्रवेशाने सरनाईकांना धक्का?

मेंडोन्सांच्या प्रवेशाने सरनाईकांना धक्का?

Next

राजू काळे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
भार्इंदर : गेल्या आमदारकीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या नेत्यांनी न दिलेली साथ आणि पडत्या काळातही न दिलेल्या पाठबळामुळे नाराज झालेले गिल्बर्ट मेंडोन्सा यांचा बहुप्रतीक्षित शिवसेना प्रवेश मंगळवारी दुपारी मातोश्रीवर होणार आहे. यामुळे पालिका निवडणुकीच्या काळात मीरा-भार्इंदरच्या राजकारणात मोठी घुसळण होण्याची चिन्हे आहेत. मेंडोन्सा यांच्या सेना प्रवेशामुळे गेल्या पालिका निवडणुकीत शिवसेनेला सहावरुन १४ वर आणणारे आमदार प्रताप सरनाईक यांच्या वर्चस्वाला धक्का लागण्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
खासदार राजन विचारे यांना लोकसभा निवडणुकीवेळी मदत झाल्याने त्यांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मदतीने मेंडोन्सा यांच्या शिवसेना प्रवेशाचा मार्ग प्रशस्त केल्याचे मानले जाते. त्यामुळे मीरा-भार्इंदरमध्ये पक्षाची ताकद वाढणार असली, तरी त्यामुळे थेट मातोश्रीच्या संपर्कात असलेले प्रताप सरनाईक यांच्या राजकीय महत्त्वाकांक्षेचे पंख कापण्याचा प्रयत्न होईल, असा अंदाज बांधला जातो. त्यावर सरनाईक यांनी ‘नशिबाची बात’ एवढीच मोघम प्रतिक्रिया व्यक्त केली. मेंडोन्सा यांच्या प्रवेशामुळे सरनाईकांना आमदारकीच्या राजकारणाची मीरा-भार्इंदरमधील घडीही नव्याने बसवावी लागण्याची चिन्हे आहेत.
२०१२ पूर्वी पालिका निवडणुकीत शिवसेनेला अल्प यश मिळत होते. निवडून येणारे सदस्य त्यावेळच्या गिल्बर्ट मेंडोन्सा यांच्या सत्ताकेंद्रात गुरफटून जात होते. त्यामुळे सेनेचा पाढा सहापर्यंतच मर्यादित राहिला. याला सेनेतील अंतर्गत कुरघोड्या व गटबाजीही कारणीभूत होती. अखेर मातोश्रीने शहरातील सेनेच्या नेतृत्वाची धुरा २००९ मध्ये आमदारकी मिळविलेले प्रताप सरनाईक यांच्या हाती सोपविली आणि शिवसेनेच्या वाढीला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. पण गटबाजीचे भूत काही केल्या सेनेच्या गडातून हटले नाही. ते कायम असतानाच सरनाईक यांनी २०१२ च्या निवडणुकीत सेनेच्या १४ जागा निवडून आणल्या. त्यातही मनसेच्या एकमेव नगसेवकाला शिवसेनेच्या गडात आणण्यात यश मिळविले.

लागला शिवसेनेचा लळा
एका जमीन घोटाळ्यात मेंडोन्सा यांना अटक झाल्याने त्यांची साधी विचारपूसही राष्ट्रवादीतील नेत्यांनी केली नाही. याउलट गेल्या खासदारकीच्या निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार राजन विचारे यांना मेंडोन्सा यांनी सहकार्य केल्याने त्याची परतफेड करण्यासाठी विचारे यांसह पालकमंत्री एकनाथ शिंदे, आमदार प्रताप सरनाईक पुढे सरसावले.कोणताही संबंध नसताना सेनेच्या नेत्यांनी पडत्या काळात केलेले सहकार्य मेंडोन्सा यांना भावल्याने त्यांना सेनेचा लळा लागला. ते कारागृहात असतानाच ‘लोकमत’ने त्यांच्या शिवसेना प्रवेशाचे वृत्त प्रसिद्ध केले. कारागृहातुन सुटका झाल्यानंतर त्याला दुजोरा मिळाला. सुटकेनंतरच्या महिन्यानंतरही त्यांच्या शिवसेनेतील प्रवेशाचा मार्ग सुकर होत नसल्याने शहरात तर्कवितर्कांना ऊत आला. सरनाईक यांच्या विरोधामुळे हा प्रवेश होत नसल्याची चर्चा रंगली. अखेर मंगळवारी दुपारी १२ वाजता मातोश्रीवर त्यांचा प्रवेश होईल, हे ठरल्याने ते सहपरिवार शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. मेंडोन्सा यांच्या सेना प्रवेशामुळे सरनाईकांच्या वर्चस्वाला तडा जाण्याची चर्चा स्थानिक राजकारणात रंगू लागली. सरनाईक यांनी मात्र त्यावर ‘नशिबाची बात’ असल्याचे सांगितले.

अटीशर्तींशिवाय प्रवेश : मेंडोन्साच्या प्रवेशापूर्वी शिवसेनेच्या नेत्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली. कोणत्याही अटी-शर्ती नसल्याच्या मुद्द्यावर मेंडोन्सा यांच्या प्रवेशावर शिक्कामोर्तब करण्यात आले. यामुळे प्रतीक्षेनंतर का होईना, शिवसेनेच्या गडाचा दरवाजा मेंडोन्सा परिवारासाठी खुला झाल्याने त्यांच्या समर्थकांनी आनंद व्यक्त केला आहे.

मेंडोन्सांकित राजकारणाला मेहतांचे ग्रहण
शिवसेना यशाच्या पायऱ्या चढत असताना फोडाफोडीच्या राजकारणातून पालिकेची सत्ता मिळविणारे राष्ट्रवादीचे माजी आमदार मेडोन्सा यांनी २०१५ मध्ये काँग्रेस व शिवसेनेच्या सहकार्याने सत्तांतराची धडपड चालविली होती. तेव्हा भाजपाचे आमदार नरेंद्र मेहता यांनी राष्ट्रवादीलाच धक्का देत तिला अल्पमतात आणले. त्यामुळे मेंडोन्सा यांच्याच सहकार्याने एकेकाळी महापौरपदावर विराजमान झालेले मेहता मेंडोन्सा यांनाच डोईजड झाल्याची चर्चा सुरु झाली. मेंडोन्सा यांच्यापासून सेनेला तोडून आपल्यासोबत सत्तेत सहभागी करून घेण्यात मेहता यांना यश आल्याने राष्ट्रवादी बाजुला फेकली गेली आणि २५ वर्षांच्या मेंडोन्सांकित राजकारणाचा अस्त होऊ लागला.

Web Title: Mendonas push the sarneike?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.