मेंडोन्सा यांचा शिवसेनाप्रवेश नक्की

By admin | Published: May 29, 2017 06:20 AM2017-05-29T06:20:27+5:302017-05-29T06:20:27+5:30

मीरा-भार्इंदरमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि माजी आमदार गिल्बर्ट मेंडोन्सा यांनी शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे

Mendonso's Shivsena admission exactly | मेंडोन्सा यांचा शिवसेनाप्रवेश नक्की

मेंडोन्सा यांचा शिवसेनाप्रवेश नक्की

Next

धीरज परब/लोकमत न्यूज नेटवर्क
मीरा रोड : मीरा-भार्इंदरमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि माजी आमदार गिल्बर्ट मेंडोन्सा यांनी शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केल्याने त्यांच्या शिवसेनाप्रवेशाच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. मेंडोन्सा यांनी राष्ट्रवादीच्या निरीक्षकांनाही शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे सांगितले असून त्यांनी तसा अहवाल प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना सादर केला आहे. त्यामुळे मीरा-भार्इंदरची राष्ट्रवादीची सूत्रे माजी मंत्री गणेश नाईक यांच्याकडे सोपवण्यात आली आहेत.
मीरा-भार्इंदरवर स्वत:ची छाप उमटवणारे मेंडोन्सा हे एका जमीन खरेदी प्रकरणात अडचणीत आले. स्वत: मेंडोन्सा यांची या व्यवहारात फसवणूक झाल्याचे सांगितले जात असले, तरी त्यांना नऊ महिने तुरुंगात राहावे लागले. या पडत्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकाही मोठ्या नेत्याने मेंडोन्सांची भेट घेतली नाही वा सहकार्य केले नाही. उलट, पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार राजन विचारे, आमदार प्रताप सरनाईक यांनी मेंडोन्सांबद्दल जवळीक दाखवली.
मेंडोन्सा यांना पालिका निवडणुकीपर्यंत बाहेर येऊ न देण्याची रणनीती विरोधकांनी आखल्याची चर्चा शहरात असल्याने राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांसह अनेक नगरसेवक, पदाधिकारी यांनी आपले अस्तित्व राखण्यासाठी भाजपा व शिवसेनेत पळ काढला. दरम्यान, मेंडोन्सा यांना जामीन मंजूर झाल्यावर शहरात त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. स्वत: खासदार विचारे, आमदार सरनाईक, स्थायी समिती सभापती प्रभाकर म्हात्रे, उपमहापौर प्रवीण पाटील यांच्यासह सेनेचे नगरसेवक आवर्जून मेंडोन्सा यांना भेटून त्यांचे स्वागत केले.
मेंडोन्सा हे शिवसेनेत जाणार अशी चर्चा सुरू होती. त्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेसकडून आढावा घेण्यासाठी दिनकर तावडे यांना निरीक्षक म्हणून पाठवले होते. तावडे यांनी जिल्हाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह नुकतीच मेंडोन्सा यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यावेळी मेंडोन्सा यांनी अडचणीच्या काळात पक्षाने सहकार्य तर सोडा, साधी विचारपूसही केली नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. त्यामुळे मी शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे स्पष्ट सांगून टाकल्याचे ते म्हणाले. त्यामुळे मेन्डोन्सा यांच्याबाबतचा तसा अहवाल तावडे यांनी प्रदेशाध्यक्षांना पाठवला.
मीरा-भार्इंदरमध्ये मेंडोन्सा यांची ताकद पाहता राष्ट्रवादी काँग्रेसने उरलेसुरले पदाधिकारी व कार्यकर्ते यांना रोखण्यासाठी पावले उचलली आहेत. जिल्हाध्यक्ष पाटील यांच्याकडे पक्षाची धुरा सोपवण्यात आली असतानाच माजी मंत्री गणेश नाईक यांच्याकडे मीरा-भार्इंदरची जबाबदारी देत ही गळती रोखण्याचे प्रयत्न पक्षाने सुरू केल आहेत.

नरेंद्र मेहतांना देणार शह
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सध्या परदेशात आहेत. तेथून परतल्यावर त्यांच्या उपस्थितीत जंगी कार्यक्रमात मेंडोन्सांच्या प्रवेशाचा आराखडा तयार केला जात आहे. त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुमारे १३ नगरसेवकांसह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच अन्य पक्षांतील मंडळीसुद्धा शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता आहे. भाजपा आमदार नरेंद्र मेहता यांना शह देण्यासह त्यांना लगाम घालण्यासाठी शिवसेना आणखी आक्रमक होणार आहे.

Web Title: Mendonso's Shivsena admission exactly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.