कुटुंब नियोजनाची पुरुषांना भीती; गतवर्षी केवळ एकच शस्त्रक्रिया; महिलांच्या मात्र ४०३८
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 10:59 PM2021-02-26T22:59:51+5:302021-02-26T23:00:18+5:30
ठाणे जिल्ह्यातील परिस्थिती : पुरुषांमध्ये शस्त्रक्रियेबाबत जनजागृतीची गरज
सुरेश लोखंडे
ठाणे : कुटुंब नियोजनाच्या दृष्टीने स्त्री, पुरुषांना नसबंदी शस्त्रक्रिया करण्याचे धोरण आहे. मात्र, ही शस्त्रक्रिया केवळ महिलांनीच करावी, असा अलिखित नियम समाजात रूढ झालेला आहे. यास आळा घालण्याची गरज काही सामाजिक संस्थांकडून व्यक्त केली जात आहे. गेल्या वर्षी म्हणजे २०१९-२० मध्ये केवळ एका पुरुषाची नसबंदी शस्त्रक्रिया झालेली आढळून आली. तर याच कालावधीत जिल्ह्यात तब्बल चार हजार ३८ महिलांच्या शस्त्रक्रिया झाल्याचे निदर्शनास आले आहे.
लोकसंख्या आवाक्यात आणण्यासाठी कुटुंब नियोजनाच्या दृष्टीने नसबंदी शस्त्रक्रिया करण्याचे धोरण आहे. यास अनुसरून आरोग्य विभागाकडून या शस्त्रक्रियेसाठी स्त्री, पुरुषांमध्ये जनजागृती केली जात आहे. यास अनुसरून महिला मोठ्या संख्येने पुढे येऊन या शस्त्रक्रिया करून घेत आहेत.
गेल्या वर्षी तब्बल चार हजार ३८ महिलांनी ही शस्त्रक्रिया करून घेतली. या तुलनेत पुरुषांमध्ये केवळ एकानेच शहापूर तालुक्यात नसबंदी केल्याचे आढळले आहे. ‘हम दो, हमारे दो!’ असे म्हणत असताना त्यासाठी फक्त महिलांनी पुढे यावे, असा जणू समाजाने अलिखित नियम करून घेतला आहे. या शस्त्रक्रियेसाठी पुरुषांनी केवळ स्वाक्षरी देऊन पत्नीच्या शस्त्रक्रियेस हिरवा कंदील देण्यात धन्यता मानली आहे. ‘छोटे कुटुंब, सुखी कुटुंब’ ठेवण्यासाठी महिलांनी शस्त्रक्रिया करण्याची जणू मक्तेदारी घेतलेली दिसून येत आहे.