‘तेजस्विनी’तून पुरूषांची स्वारी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2021 04:39 AM2021-09-13T04:39:33+5:302021-09-13T04:39:33+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क डोंबिवली : एकीकडे राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली असताना दुसरीकडे स्थानिक केडीएमटी उपक्रमाला मात्र ...

Men's invasion from 'Tejaswini'! | ‘तेजस्विनी’तून पुरूषांची स्वारी !

‘तेजस्विनी’तून पुरूषांची स्वारी !

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

डोंबिवली : एकीकडे राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली असताना दुसरीकडे स्थानिक केडीएमटी उपक्रमाला मात्र त्याचे कोणतेही गांभीर्य नसल्याचे दिसते आहे. महिलांसाठी विशेष धावणाऱ्या तेजस्विनी बसमधून आता पुरूषांनादेखील प्रवास करण्याची मुभा दिली गेली आहे. डोंबिवली पुर्वेकडील स्व. इंदिरा गांधी चौकात तेजस्विनी बसमधून अनेक पुरूष मंडळी प्रवास करताना दिसून आले. महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने राज्य सरकारने महिलांसाठी तेजस्विनी बस हा उपक्रम सुरू केला होता. परंतु त्या बसमधील सध्याचे चित्र पाहता भविष्यात एखादी अनुचित घटना घडली, तर याला जबाबदार कोण? असा सवाल महिलांकडून केला जात आहे.

राज्य सरकारकडून केडीएमटी उपक्रमासाठी चार तेजस्विनी बस मंजूर झाल्या आहेत. त्यासाठी येणारा भांडवली खर्च म्हणून सरकारकडून उपक्रमाला एक कोटी २० लाख रुपये मंजूर झाले आहेत. त्यातून या बस खरेदी करण्यात आल्या आहेत. विशेष बाब म्हणजे या लेडीज स्पेशल बसमध्ये वाहक म्हणून १२ महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. या बससेवेचे लोकार्पण मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाईन झाले. ज्या ठिकाणी प्रवास करणाऱ्या महिलांची संख्या जास्त आहे, त्याठिकाणी या बस चालविल्या जात आहेत. कल्याण-रिंगरूट (बिर्ला कॉलेज मार्गे), कल्याण-मोहना कॉलनी, डोंबिवली-लोढा हेवन, डोंबिवली-निवासी विभाग या महत्त्वाच्या मार्गांचा यात समावेश आहे. दरम्यान महिलांसाठी सुरू केलेल्या बसचा वापर पुरूष प्रवासी देखील करू लागल्याने राज्य सरकारच्या ‘महिला सुरक्षित’तेच्या मूळ उद्देशालाच हरताळ फासला जात असल्याचे दिसत आहे.

-----------------------------------------------

अनुचित प्रकार घडण्याची शक्यता

राज्य सरकारने महिला सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून या बस चालू केल्या आहेत. त्याप्रमाणेच त्या चालविल्या गेल्या पाहिजेत. जेव्हा लेडीज स्पेशल ट्रेन धावते, तेव्हा त्याठिकाणी पुरूषांना प्रवास करण्यास मनाई असते. परंतु महिला प्रवासी उपलब्ध होत नाहीत, या कारणाखाली तेजस्विनी बसमधून पुरूषांनाही प्रवास करण्यास मुभा देणे हे कितपत योग्य आहे. या बस केवळ महिलांसाठीच असणे गरजेचे आहे. अन्यथा भविष्यात अनुचित प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. केडीएमसी प्रशासनाने याची गंभीर दखल घेणे आवश्यक आहे - भाग्यश्री वाघमारे, महिला प्रवासी

------------------------------------------------

महिलांनाच प्राधान्य असणार

सकाळी सात ते अकरा आणि संध्याकाळी पाच ते रात्री नऊ या कालावधीत महिलांनाच बसमधून प्रवास करता येणार आहे. सध्या कोरोना काळात महिला प्रवासी पुरेशा प्रमाणात उपलब्ध होत नसल्याने नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महिलांना ठरवून दिलेल्या कालावधी व्यतिरिक्त जर बस रिकामी फिरत असेल तर पुरूषांना गरजेनुसार प्रवास करण्यास मुभा देण्यात आली आहे. कोविड काळात हे चित्र नवी मुंबई, ठाणे शहरात सुध्दा दिसत आहे. परंतु जर महिला प्रवासी आल्यास तिला सीटवर बसण्यास प्राधान्य दिले जाणार आहे.

- संदीप भोसले आगार व्यवस्थापक , केडीएमटी उपक्रम

(फोटो आहे)

Web Title: Men's invasion from 'Tejaswini'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.