कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी ३३ प्रभागात आता डॉक्टरांची साखळी, महापालिकेची आरोग्य यंत्रणा झाली सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2020 03:26 PM2020-03-28T15:26:23+5:302020-03-28T15:27:41+5:30
कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून आरोग्य यंत्रणा मजबुत करण्याचा प्रयत्न सुरु आहे. त्यानुसार आता महापालिकेच्या ३३ प्रभागांमध्ये आता खाजगी डॉक्टर आणि महापालिकेचा एका डॉक्टर अशी टीम तयार करण्यात आली आहे. ही टीम आता या ३३ प्रभागांमध्ये नजर ठेवून असणार आहे.
ठाणे : कोरोना व्हायरसचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी ठाणे महापालिकेच्या माध्यमातून विविध उपाय योजना केल्या जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आता महापालिकेच्या तब्बल ३३ प्रभागांमध्ये महापालिकेचा एक डॉक्टर आणि त्याच्या मदतीला एक खाजगी डॉक्टर अशी टीम तयार करण्यात आली असून शनिवार पासून सहाय्यक आयुक्तांनी निश्चित केलेल्या जागेवर या टीमकडून प्रभागातील नागरीकांना आरोग्य तपासणी त्यांच्या घराजवळ उपलब्ध व्हावी या उद्देशाने काम सुरु केले आहे.
शुक्रवारी सांयकाळी महापालिका आयुक्त विजय सिंघल आणि इंडियन मेडीकल असोसिएशनचे पदाधिकारी डॉ. दिनकर देसाई आणि इतर काही महत्वाच्या डॉक्टरांबरोबर ही या संदर्भात एक बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत अशा पध्दतीने टीम तयार करण्यात आल्या आहेत. सध्या महापालिका हद्दीत कोरोनाचे पाच रुग्ण आढळून आले आहेत. तर १८०० नागरीकांची तपासणी करण्यात आली आहे. परंतु कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी ही टीम तयार करण्यात आल्याची माहिती पालिकेने दिली आहे. त्यानुसार महापालिकेच्या प्रत्येक प्रभागात एक अशी ३३ प्रभागात या टीम कार्यरत करण्यात येत आहेत. प्रभागाच्या ठिकाणीच त्या भागातील नागरीकांना उपचार, माहिती, जनजागृती करणे आदी महत्वाची कामे या माध्यमातून केली जाणार आहेत. तसेच कोणाला जर सर्दी, खोकला असा काही त्रास होत असेल तर त्यावर उपाय योजना करणे वेळ प्रसंगी पुढील उपाचारासाठी कस्तुरबा रुग्णालयात पाठविणे अशा पध्दतीने या टीमचे काम असणार आहे. त्यानुसार शनिवार पासून या टीम सज्ज झाल्या आहेत. प्रत्येक प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्तांवर जागा निवडीचा जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यानुसार बालवाडी, महापालिका शाळा, किंवा समाजमंदिरातही ही सेवा सुरु केली जाणार आहे.
या टीममध्ये महापालिकेच्या आरोग्य विभागाचा एक तज्ञ डॉक्टर आणि इंडियन मेडीकल असोसिएशनच्या टीम मधील एक डॉक्टर असणार आहे. तसेच औषधांची उपलब्धता देखील करुन दिली जाणार आहे. शिवाय खाजगी डॉक्टर ज्या ज्या भागात सध्या प्रॅक्टीस करीत आहेत, त्यांना या ठिकाणी पाठविल्यास योग्य ठरणार असल्याने तशी निवडही केली जात आहे. एकूणच कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी पालिकेने आता आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे.