बदलापूर प्रकरण: शाळा, पोलिसांकडून पीडितेच्या पालकांचा ‘मानसिक छळ’ अन् जबाबदारी झटकण्यासाठी नको नको ते आरोप!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2024 05:47 AM2024-08-25T05:47:02+5:302024-08-25T05:47:18+5:30
शाळा व्यवस्थापन आणि स्थानिक पोलिसांच्या बेजबाबदारपणाबाबत चौकशी समितीने तीव्र नाराजी व्यक्त केली असल्याचे समजते.
लोकमत न्यूज नेटवर्क, बदलापूर : शाळेत लैंगिक अत्याचाराला बळी पडलेल्या दोन अल्पवयीन विद्यार्थिनींच्या पालकांनी पोलिसांत तक्रार दाखल करू नये, याकरिता शाळा प्रशासन आणि स्थानिक पोलिसांनी त्यांच्या कुटुंबाचा मानसिक छळ केल्याचा ठपका शासनाने या प्रकरणाच्या तपासासाठी नेमलेल्या दोन सदस्य समितीने ठेवला असल्याचे समजते.
पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी अत्याचाराची माहिती सर्वप्रथम शाळा प्रशासनाला दिली होती. मात्र शाळेच्या मुख्याध्यापिकेने हा प्रकार शाळेत घडलाच नाही, कुठेतरी बाहेर घडला आहे, असा दावा केला. मुलीच्या गुप्तांगाला झालेली जखम सायकल चालवल्यामुळेही होऊ शकते, असे म्हणत मुख्याध्यापिकेने ही घटना दडपली कशी जाईल हे पाहिले, या मागील कारणाचा शोध चौकशीअंती लागेल, असे सांगण्यात येते.
शाळा व्यवस्थापन दखल घेत नसल्याने अत्याचारग्र्सत मुलीच्या कुटुंबीयांनी बदलापूर पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक शुभदा शितोळे यांची तातडीने भेट घेतली. शितोळे यांनीही मुख्याध्यापिकेचीच री ओढली आणि तीच थिएरी पालकांना ऐकवली. सायकल चालवल्यामुळे किंवा घरात, घराजवळही असा गैरप्रकार होऊ शकतो, असे म्हणत शितोळे यांनी शाळा व्यवस्थापनाचीच पाठराखण केली. शाळा व्यवस्थापन आणि स्थानिक पोलिसांच्या बेजबाबदारपणाबाबत चौकशी समितीने तीव्र नाराजी व्यक्त केली असल्याचे समजते.
प्रकरण दडपण्याचा शाळा, पोलिसांचा प्रयत्न
- शाळेच्या मुख्याध्यापिकेने जबाबदारी झटकण्याकरिता पीडित मुलीच्या पालकांवरच नको नको ते आरोप केले.
- शाळा व्यवस्थापनाने खासगी रुग्णालयाचा वैद्यकीय अहवाल अमान्य केला आणि सायकल चालवल्यामुळे जखम झाली असेल, असा दावा केला.
- पोलिसांनीही सायकलमुळे जखम होऊ शकते, असे म्हणत दुर्लक्ष केले. मात्र, मनसे पदाधिकारी आणि सामाजिक संस्था पदाधिकाऱ्यांच्या आग्रही मागणीमुळे पोलिसांना गुन्हा दाखल करावा लागला, याकडे समितीने लक्ष वेधले आहे.