दहा कोटींच्या खंडणीसाठी व्यापाऱ्याचे अपहरण
By Admin | Published: July 30, 2016 03:34 AM2016-07-30T03:34:09+5:302016-07-30T03:34:09+5:30
ठाण्यातील व्यापाऱ्याचे अपहरण करून सव्वातीन लाखांची रोकड लुटणाऱ्या चौकडीला गुन्हे अन्वेषण विभागाच्या वागळे इस्टेट युनिट-५ने अटक केली आहे. पैसे लुटल्यानंतरही त्याला घरात
ठाणे : ठाण्यातील व्यापाऱ्याचे अपहरण करून सव्वातीन लाखांची रोकड लुटणाऱ्या चौकडीला गुन्हे अन्वेषण विभागाच्या वागळे इस्टेट युनिट-५ने अटक केली आहे. पैसे लुटल्यानंतरही त्याला घरात कोंडून त्याच्याकडे १० कोटींच्या खंडणीची त्यांनी मागणी केली होती.
हेमंत उर्फ मुसा गवळी (३४), नितेश पाटील (२४), वेताळ पाटील (२३), सतीश उर्फ सत्या पहुडकर (२२) अशी चौघा अपहरणकर्त्यांची नावे आहेत. त्यांना ३ आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे
आदेश ठाणे न्यायालयाने दिले. त्यांच्या दोन साथीदारांचा शोध सुरू आहे.
एका नामांकित कंपनीत वितरक म्हणून नोकरीला असलेले मयूर राणे (२२) हे वाघबीळ भागातील पूजा रेसिडेन्सी सोसायटीत राहतात. महिनाभरापूर्वी त्यांची मुसासोबत कामानिमित्त ओळख झाली. यातूनच हेमंतने मयूरची माहिती मिळवून अपहरणाचा कट रचला. २३ जुलैला भिवंडी-मानकोली भागातून कारमधून त्याने अपहरण केले.
त्या वेळी सतीशने बंदुकीचा धाक दाखवून सव्वातीन लाखांचा ऐवज लुटला. तसेच ठार मारण्याची धमकी देऊन १० कोटींची खंडणी मागितली. पैसे देत नाही तोपर्यंत त्यांना भिवंडीतील खानिवली येथील एका घरात कोंडून ठेवले. परंतु, पैसे घरी आहेत, अशी बतावणी त्यांनी केली. त्यामुळे अपहरणकर्त्यांनी त्यांना त्यांच्या घरी नेले.
त्याच वेळी मयूर यांनी प्रसंगावधान राखून घरात प्रवेश करून दाराची कडी आतून लावून घेतली. त्यानंतर, लगेचच पोलिसांशी संपर्क साधला. याची कुणकुण अपहरणकर्त्यांना लागताच त्यांनी तेथून पळ काढला. या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे. (प्रतिनिधी)