परिवहनचा अर्थसंकल्प विलीन करा; सभापतींची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 29, 2020 12:12 AM2020-02-29T00:12:57+5:302020-02-29T00:13:07+5:30
स्थायी समितीला शिलकी अर्थसंकल्प सादर
कल्याण : आर्थिक सक्षमतेसाठी शिक्षण मंडळाप्रमाणे परिवहनचा अर्थसंकल्पही केडीएमसीच्या अर्थसंकल्पात विलीन करण्यासाठी स्थायी समिती, महापालिकेचे पदाधिकारी आणि आयुक्तांनी सकारात्मक भूमिका घ्यावी, असे मत केडीएमटीचे सभापती मनोज चौधरी यांनी शुक्रवारी मांडले. तसेच सार्वजनिक स्पर्धेत परिवहनचे अस्तित्व टिकविण्यासाठी महापालिकेकडून आर्थिक पाठबळ मिळावे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
परिवहनचा २०२०-२०२१ या आर्थिक वर्षाचा ९८ कोटी ७४ लाख रुपये जमा व ९६ कोटी ६४ लाख रुपये खर्च, असा दोन कोटी १० लाख रुपयांचा शिलकी अर्थसंकल्प सभापती चौधरी यांनी स्थायी समितीचे सभापती विकास म्हात्रे यांना सादर केला. यावेळी चौधरी यांनी मनोगतात परिवहन उपक्रमाच्या वास्तवतेवर प्रकाश टाकला.
ते म्हणाले, ‘आजमितीला २१ वर्षे होऊनही हा उपक्रम स्थावर होण्यासाठी संघर्ष करत आहे. उपक्रम कधीही फायद्याकडे झुकला नाही. पालकसंस्था म्हणून केडीएमसीच्या आर्थिक मदतीने हा गाडा ‘ना नफा-ना तोटा’ या तत्त्वावर चालविताना एकप्रकारे कसोटी लागत आहे. सध्या ६० ते ७० बस धावत आहेत. उपक्रमातील ५६९ कर्मचारी व कंत्राटी वाहक, चालक कर्मचारी यांच्या वतीने दररोज ४५ ते ५० हजार प्रवाशांसाठी ३३ मार्गांवरून सेवा दिली जात आहे. या वर्षात १३८ बस मार्गावर चालविण्याचे नियोजन आहे. परंतु, उत्पन्न आणि खर्च, यातील वाढती तफावत पाहता बस क्षमतेने चालविणे उपक्रमाला अडचणीचे ठरत आहे. या बाबींचा विचार करून राज्य सरकारने जीसीसी तत्त्वावर बस चालविण्याचे आदेश केडीएमसीला दिले आहेत. त्याचा पदाधिकारी आणि आयुक्तांनी सकारात्मक विचार करावा.’
‘महसुली आणि भांडवली खर्चासाठी एकूण ४६ कोटी ३९ लाख रुपये अनुदानाची मागणी करण्यात आली असून, महापालिका या अनुदानात कोणत्याही प्रकारे कपात करणार नाही, या विश्वासाने उपक्रमाने आर्थिक ताळेबंद मांडला आहे. तरतुदी केवळ कागदावरच राहणार नाहीत, याचाही महापालिकेने जरूर विचार करावा,’ असेही चौधरी म्हणाले.
दरम्यान, परिवहन उपक्रमाला भरघोस निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे आश्वासन स्थायी सभापती म्हात्रे यांनी दिले. अर्थसंकल्प सादरीकरणाच्या वेळी उपक्रमाचे व्यवस्थापक मारुती खोडके, महापालिका सचिव संजय जाधव आदी उपस्थित होते.
निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात
परिवहन टर्मिनल विकास, खंबाळपाडा आगारात परिवहन भवनाची उभारणी, कार्यशाळेचे आधुनिकीकरण, अॅटोमॅटिक वॉशिंग मशीन, स्मार्ट सिटीअंतर्गत प्रवासी निवाऱ्यांवर पीआयएस सिस्टीम, प्रवाशांच्या मागणीनुसार स्टेनलेस स्टीलचे निवारे उभारण्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू असून त्याचे काम अंतिम टप्प्यात असल्याची माहिती चौधरी यांनी दिली.