‘केडरबेस’ भाजपाला ‘मासबेस’चे वळण

By admin | Published: January 14, 2017 06:19 AM2017-01-14T06:19:21+5:302017-01-14T06:19:21+5:30

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत घडलेला भाजपा सध्या केडरबेस पार्टीकडून मासबेस पार्टीकडे वाटचाल करीत असताना

The 'mesabes' turn of BJP to 'Cedarbase' | ‘केडरबेस’ भाजपाला ‘मासबेस’चे वळण

‘केडरबेस’ भाजपाला ‘मासबेस’चे वळण

Next

ठाणे : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत घडलेला भाजपा सध्या केडरबेस पार्टीकडून मासबेस पार्टीकडे वाटचाल करीत असताना आयारामगयारामांच्या वावरामुळे बदनामीला सामोरे जावे लागण्याची भीती जुनेजाणते कार्यकर्ते व्यक्त करीत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत गुरुवारी झालेल्या पक्षप्रवेशाच्या वेळी मासबेस पक्षात असता, त्या गोंधळाची चुणूक पाहायला मिळाली. अशा गोंधळात वादग्रस्त प्रतिमेच्या लोकांना पक्षात प्रवेश दिल्याचा ठपका ठेवून फडणवीस यांच्यासारख्या स्वच्छ प्रतिमेच्या मुख्यमंत्र्यांना डोकेदुखी होऊ शकते, असे उपस्थित जुन्या कार्यकर्त्यांचे मत होते.
केडरबेस भाजपात प्रवेश देताना व्यक्तीची पूर्वपीठिका तपासली जात होती. व्यासपीठावर मर्यादित लोकांना प्रवेश दिला जात होता. मात्र, वेगवेगळ्या महापालिका काबीज करण्याची घाई लागलेल्या भाजपात काँग्रेस व मुख्यत्वे राष्ट्रवादी काँग्रेसमधून अनेक मंडळी प्रवेश घेत आहेत. गुरुवारी पक्ष कार्यकारिणीच्या वेळी शेकडोंच्या संख्येने लोकांना भाजपात प्रवेश दिले गेले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रत्येकाच्या गळ्यात पक्षाची पताका घालून प्रवेश दिला. यावेळी प्रचंड गोंधळ सुरूहोता. सूत्रसंचालक भराभर नावे वाचत होते व प्रवेश घेणारे लागलीच व्यासपीठ सोडत नसल्याने व्यासपीठावर गर्दी उसळली होती. हे दृश्य पाहून भाजपाचे काही जुने कार्यकर्ते नाराज झाले. या गर्दीत प्रवेश घेणारा एखादा गुंड, मवाली किंवा पाकीटमार निघाला, तर उद्या तीच दृश्ये वाहिन्यांवर दाखवली जातील आणि मुख्यमंत्र्यांची बदनामी होईल. आम्ही मासबेस होत आहोत व निवडणुका जिंकत आहोत, हे उत्तम आहे. मात्र, मासबेस पक्षात असलेला गोंधळ, अनागोंदी, गटबाजी, हाणामारी व गुंडापुंडांचा सुळसुळाट हा आमच्याकडे वाढण्याची भीती वाटते, असे हा कार्यकर्ता म्हणाला.
पुणे, नाशिक व अन्य काही ठिकाणी थेट गुंडांना पक्षप्रवेश दिल्याने भाजपाचे नेते अडचणीत आले असतानाही कार्यकारिणीच्या वेळी पक्ष प्रवेशात गोंधळ पाहायला मिळाला. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे हे या प्रकाराचे निलाजरे समर्थन करीत असून यापूर्वी कुणी गुन्हेगार असेल, तर आम्हाला माहीत नाही.
आता भाजपात दाखल झाल्यावर त्याने गुन्हे केले, तर आम्ही त्याची दखल घेऊ, असा लटका बचाव ते करीत आहेत. राजकारणाच्या गुन्हेगारीकरणाविरोधात भाजपा नेते गोपीनाथ मुंडे यांनी एल्गार केला होता. आता त्याच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये केवळ त्यांच्याकडे १५ वर्षे गृहखाते असल्याने सामील झालेले गुंडपुंड भाजपात येत आहेत, हा काळाने उगवलेला सूड असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. (प्रतिनिधी)

Web Title: The 'mesabes' turn of BJP to 'Cedarbase'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.