बालवैज्ञानिकांनी विज्ञान प्रदर्शनातून दिला 'पर्यावरण रक्षणा'चा संदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2018 01:58 PM2018-02-03T13:58:10+5:302018-02-03T14:05:21+5:30
कल्याणच्या बालक मंदिर प्राथमिक शाळेच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी विविध प्रयोग सादर केले असून त्याद्वारे 'पर्यावरण रक्षणाचा' महत्त्वपूर्ण संदेश दिला आहे.
कल्याण - आतापर्यंत आपण मोठमोठ्याला विद्यार्थ्यांनी सादर केलेले अनेक वैज्ञानिक प्रयोग पाहिले असतील. मात्र कल्याणच्या बालक मंदिर प्राथमिक शाळेच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी विविध प्रयोग सादर केले असून त्याद्वारे 'पर्यावरण रक्षणाचा' महत्त्वपूर्ण संदेश दिला आहे. कल्याण पश्चिमेतील बालक मंदिर प्राथमिक शाळेत हे विज्ञान प्रदर्शन भरले असून शनिवारी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले.
या विज्ञान प्रदर्शनात एक दोन नव्हे तर तब्बल 150 हून अधिक वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग या बाल वैज्ञानिकांनी सादर केले आहेत. त्यामध्ये सौरऊर्जा, बायोगॅस, पवन ऊर्जा, जलशुद्धीकरण, पदार्थांचे गुणधर्म, इलेक्ट्रिक, भिंगाचा उपयोग, ध्वनी, कृत्रिम आणि कंपोस्ट खत, ग्रहांची माहिती, हवा, हावडा ब्रिज, जलचक्र, घरे, वाहतुकीची साधने, संदेश वहनाची साधने, इंधनाचे प्रकार आणि त्यापासून होणारे प्रदूषण, खेळातून विज्ञान आदी विविध विषयांवर आधारित उत्तमोत्तम प्रयोगांचा समावेश आहे. शनिवार आणि रविवार असे दोन दिवस हे प्रदर्शन सर्वाना पाहण्यासाठी खुले असणार आहे. पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेले हे महाराष्ट्रातील बहुधा पहिलेच विज्ञान प्रदर्शन आहे.
विद्यार्थ्यांमध्ये लहानपणापासूनच चिकित्सक वृत्ती निर्माण व्हावी आणि त्यातून देशाला नवे वैज्ञानिक मिळावे या उद्देशातून बालक मंदिर शाळेतर्फे या आगळ्या वेगळ्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी झालेल्या उद्घाटन सोहळ्याला कल्याण डोंबिवली महापालिका शिक्षण विभागाचे प्रशासन अधिकारी जे. जे. तडवी, ज्येष्ठ प्राध्यापक डॉ. प्रकाश माळी, शालेय शिक्षण समितीचे प्रसाद मराठे, माजी आमदार प्रभाकर संत सर, शाळेच्या मुख्याध्यापिका कल्पना पवार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. हे विज्ञान प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक वर्ग, पालक प्रतिनिधी यांनी विशेष मेहनत घेतली आहे.