तुळशी विवाहाच्या माध्यमातून नेत्रदानाचा दिला संदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2019 12:51 AM2019-11-11T00:51:14+5:302019-11-11T00:51:46+5:30
ठाण्यातील जांभळीनाका येथे बाळगोपाळ मित्र मंडळ, नारळवाला चाळ यांच्या वतीने नेत्रदानाचा संदेश देत तुळशीविवाह आयोजित करण्यात आला होता.
ठाणे : ठाण्यातील जांभळीनाका येथे बाळगोपाळ मित्र मंडळ, नारळवाला चाळ यांच्या वतीने नेत्रदानाचा संदेश देत तुळशीविवाह आयोजित करण्यात आला होता. यामध्ये दृष्टिहीन मुलांनी सहभाग घेतला होता. या तुळशीविवाहाच्या माध्यमातून एकाच दिवसात सुमारे १२६ नेत्रदानाचे अर्ज भरण्यात आले.
ज्याच्याजवळ ज्या गरजेच्या गोष्टीची उणीव असते, त्या व्यक्तीला वस्तूचे महत्त्व विशेषत्वाने कळते, असा एक सिद्धान्त आहे. या सिद्धान्तावरूनच म्हटले जाते, की एका सेकंदाचे महत्त्व किती आहे, हे सेकंदाच्या फरकाने स्पर्धा हरलेल्या व्यक्तीला विचारा. तसेच दृष्टीचे महत्त्व किती आहे, याची जाणीव तुम्ही एखाद्या प्रज्ञाचक्षू बांधवाच्या दृष्टीने दुनिया समजून घ्यायचा प्रयत्न कराल तेव्हाच जास्त प्रकर्षाने होईल. यासाठी नेत्रदान केले तर आपण एखाद्याला दृष्टी देऊन शक्ती देण्यासाठी नेत्रदान करा, असा संदेश देण्यासाठी अवयवदान चळवळीचे प्रणेते विलास ढमाले यांच्या बाळगोपाळ मित्र मंडळाच्या वतीने तुळशीविवाह आयोजित करण्यात आला होता. यावेळी आ. संजय केळकर, जिव्हाळा महिला मंडळाच्या अध्यक्ष मंजिरी ढमाले, राहुल नवघणे, शाखाप्रमुख सचिन चव्हाण, शशिकांत गुरव, दीपक मानकामे, अमित टण्णू, अनिल हुसफर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. यंदा या तुळशीविवाहाचे ७९ वे वर्ष असल्याने नेत्रदानाचा संदेश देण्यात आला.
नेत्रदानाचा संकल्प सोडण्याअगोदर या विषयाची गरज आणि आपल्याला त्यात देता येऊ शकणारे योगदान या मुद्यांविषयी समाजाच्या तळागाळात संदेश पोहोचला, तरीही मोठ्या प्रमाणावर अंधत्व निवारणासाठी चालना मिळू शकते, तसेच मृत्यूनंतर नेत्रदान करणे सरकारने बंधनकारक केले, तर देशात कोणीच दृष्टिहीन राहणार नाहीत, असे ढमाले यांनी सांगितले.