ठाण्यात १.४० लाख नळजोडण्यांना मीटर; १३१ कोटींचा खर्च
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2019 12:08 AM2019-06-04T00:08:10+5:302019-06-04T00:08:18+5:30
पाणीगळती आणि पाणीचोरी रोखण्यासाठी तसेच पाण्याच्या बिलांची योग्य प्रकारे वसुली व्हावी, या उद्देशाने प्रथम हायटेक स्वरूपाचे परदेशी तंत्रज्ञानाचे मीटर बसवण्याचे पालिकेने निश्चित केले होते
ठाणे : आधी हायटेक, नंतर स्मार्ट आणि त्यानंतर पुन्हा सेमी ऑटोमेटिक मीटर अशा पद्धतीने मागील १२ वर्षे पालिकेने नळजोडण्यांना मीटर बसवण्यासाठी विविध निविदा काढल्या होत्या. परंतु, अखेर स्मार्ट सिटीच्या माध्यमातून आता हे मीटर बसवण्यास सुरुवात झाली आहे. त्यानुसार, तब्बल एक लाख ४० हजार जोडण्यांवर ते बसवले जाणार असून आतापर्यंत पाच हजारांहून अधिक मीटर बसवले गेले आहेत. यासाठी १३१ कोटींचा खर्च केला जाणार आहे. स्मार्ट मीटरमुळे आता ठाणेकरांना खऱ्या अर्थाने पाण्याचे महत्त्व समजणार आहे. या उपाययोजनेमुळे पाणीगळती आणि चोरीस अंकुश बसणार असल्याचा दावा पालिकेने केला आहे.
पाणीगळती आणि पाणीचोरी रोखण्यासाठी तसेच पाण्याच्या बिलांची योग्य प्रकारे वसुली व्हावी, या उद्देशाने प्रथम हायटेक स्वरूपाचे परदेशी तंत्रज्ञानाचे मीटर बसवण्याचे पालिकेने निश्चित केले होते. यासाठी ३५ कोटींचा निधी खर्च केला जाणार होता. परंतु, तत्कालीन आयुक्त आर.ए. राजीव या योजनेविषयी साशंक होते. नंतर, आलेले आयुक्त असीम गुप्ता यांनी ही योजनाच गुंडाळली होती. दरम्यान, पुन्हा एआरएमचे सेमी आॅटोमेटिक मीटर बसवण्याचा निर्णय ठाणे महापालिकेने घेतला होता. त्यानुसार, या कामासाठीच्या निविदा मागील वर्षी मागवून पीपीपी तत्त्वावर हा निर्णय राबवण्याचे ठरले होते. परंतु, या योजनेच्या निविदेला वारंवार मुदतवाढ देऊनही प्रतिसाद मिळालेला नाही. अखेर, या कामासाठी आता स्मार्ट सिटीतून १३१ कोटींचा खर्च केला जाणार आहे. त्यानुसार, मागील काही दोन ते महिन्यांपासून शहरातील विविध भागांत अशा प्रकारे स्मार्ट मीटर बसवण्याच्या कामाला निविदा मागवून सुरुवात झाली आहे. त्यानुसार, आतापर्यंत पाच हजारांहून अधिक मीटर बसवले आहेत. या कामासाठी स्मार्ट सिटीअंतर्गत ९३ कोटींचा खर्च केला जात असून पुढील निगा आणि देखभालीसाठीचा पाच वर्षांचा खर्च हा पालिका करणार आहे. यासाठी खाजगी एजन्सीची नेमणूक केली आहे. मीटर लावल्यानंतर लिटरप्रमाणे कर आकारणी केली जाईल. त्यामुळे पाण्याचे बील महागण्याची शक्यता आहे. परंतू पाणी जपून वापरल्यास नागरिकांचा फायदाच होणार आहे.
असे आहेत स्मार्ट मीटर
या स्मार्ट वॉटर मीटरमध्ये कोणत्याही प्रकारची छेडछाड करता येणार नाही. डिजिटल स्वरूपाचे हे मीटर असून ते अनब्रेकेबल आहेत. शिवाय, याचे रीडिंगसुद्धा घरोघरी न जाता एकच व्यक्ती एखाद्या भागात उभी राहिल्यास ब्ल्यूटूथच्या साहाय्याने त्याच्या हातात असलेल्या रीडिंग मशीनमध्ये त्या भागातील सुमारे १०० मीटरचे रीडिंग एकाच वेळेस घेऊ शकणार आहे.
ग्राहकांना होणार फायदा
या मीटरमुळे ग्राहक जेवढे पाणी वापरणार आहेत, तेवढेच बिल त्यांना भरावे लागणार आहे. पूर्वी ठाणे महापालिकेच्या माध्यमातून झोपडपट्टी भागासाठी १३० रुपये याप्रमाणे बिल आकारले जात होते. त्यानुसार, कुटुंबातील पाच व्यक्तींनुसार ४५० लीटर पाणी हे दरवर्षी वापरले जाते, असा अंदाज आहे. त्यानुसार, महिन्याचे बिल त्या कुटुंबासाठी मीटरप्रमाणे १०० ते ११० पर्यंत येऊ शकणार आहे. परंतु, जास्त पाणी वापरल्यास जास्तीचे बिल येणार आहे.
या दरानुसार येणार बिल
पूर्वी इमारतींसाठी महिना १८० रुपये आणि बैठ्या चाळींसाठी १३० च्या आसपास पाणीआकार घेतला जात होता. परंतु, आता स्मार्ट मीटरचा दर हा पालिकेने निश्चित केला आहे. शून्य ते १५ हजार लीटरपर्यंत ७.५० रुपये, १५ हजार ते २० हजारपर्यंत १० रुपये, २० हजार ते २४ हजार पर्यंत १५ रुपये आणि २४ हजारांच्या पुढे २० रुपये असा दर हजार लीटरमागे आकारला जाणार आहे.