मेट्रो चारचे काम डिसेंबर २०२३ पर्यंत पूर्ण करणार, एकनाथ शिंदेंकडून पाहणी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2022 09:21 AM2022-04-01T09:21:51+5:302022-04-01T09:22:31+5:30
वडाळा ते कासारवडवली या मेट्रो प्रकल्पाची ठाण्यातील मार्गाची पाहणी शिंदे यांनी केली
ठाणे : वडाळा ते कासारवडवली या मेट्रो मार्ग ४च्या प्रकल्पाचे काम ठरवून दिलेल्या वेळेत म्हणजेच डिसेंबर २०२३ पर्यंत पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याची माहिती नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी दौऱ्यादरम्यान दिली.
वडाळा ते कासारवडवली या मेट्रो प्रकल्पाची ठाण्यातील मार्गाची पाहणी शिंदे यांनी केली. त्यानुसार मॉडेला चेकनाका येथून काम किती टक्के पूर्ण झाले आहे, याचा आढावा घेऊन उर्वरित कामे ठरलेल्या वेळेत पूर्ण करण्याचे आदेश दिले. जिल्ह्यात मेट्रोचे जाळे तयार करण्याचे काम सुरू असून, यामुळे ठाणे, भिवंडी, कल्याण, अंबरनाथ आणि बदलापूर ही शहरे एकमेकांना जोडली जाणार आहेत. येत्या काही महिन्यांवर पावसाळा आला आहे, त्याचा त्रास नागरिकांना होऊ नये, त्या दृष्टीकोनातून खड्डे बुजविले जावेत, तसेच रस्त्याची कामे गुणवत्तापूर्ण झाली नाहीत तर ठेकेदाराबरोबरच संबंधित अधिकाऱ्यांवरही कारवाई करणार, असे ते म्हणाले.
‘कामात दिरंगाई केली तर कारवाई करणार’
मुंबई आणि एमएमआर रिझनमध्ये मेट्रोची कामे सुरू असून, ती कामे वेळेत पूर्ण करून घेण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. काही ठिकाणी मेट्रोचे काम संथ गतीने सुरू असल्याबाबत त्यांना छेडले असता ही कामेदेखील आता वेगाने सुरू होणार आहेत. ठेकेदाराकडून दिरंगाई झाली असेल तर त्याच्यावरही कारवाई केली जाईल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.