एमएमआरडीए क्षेत्रात महानगरांची होणार कोंडी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2019 05:35 AM2019-09-15T05:35:32+5:302019-09-15T05:35:39+5:30

युती सरकारने रायगड आणि ठाणे जिल्ह्यातील खासगी एकात्मिक नगरवसाहतींच्या पाच प्रकल्पांना हिरवा कंदील दाखवून अनेक बिल्डरांचं चांगभलं केलं आहे.

Metro area will be closed in MMRDA area | एमएमआरडीए क्षेत्रात महानगरांची होणार कोंडी

एमएमआरडीए क्षेत्रात महानगरांची होणार कोंडी

googlenewsNext

- नारायण जाधव
ठाणे : विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याआधीच राज्यातील युती सरकारने रायगड आणि ठाणे जिल्ह्यातील खासगी एकात्मिक नगरवसाहतींच्या पाच प्रकल्पांना हिरवा कंदील दाखवून अनेक बिल्डरांचं चांगभलं केलं आहे.
मात्र, आधीच पाणीटंचाई आणि वाहतूककोंडीसह अन्य नागरी समस्यांनी त्रस्त असलेल्या या परिसरातील महानगरांची कोेंडी होऊन तेथील रहिवाशांसह जुन्या गावठाणांतील स्थानिकांची डोकेदुखी आणखी वाढणार आहे.
कल्याण-डोंबिवली आणि भिवंडी शहरांच्या उंबरठ्यावर आता लोढा बिल्डरच्या या नव्या दोन टाउनशिप येत आहेत. तर, मुंबई-पुणे महामार्गावर पोलीस हाउसिंगच्या नावाखाली रायगड जिल्ह्याच्या खालापूर तालुक्यातील वयाळ येथे नवी एकात्मिक नगरवसाहत उभी करण्यात येणार आहे. जुलै महिन्यात कल्याण-शीळ रस्त्यावर प्रीमिअर कंपनीच्या जागेवर अन्य एका विकासकास आणि मे महिन्यात अलिबागच्या धोकावडे येथे सोबो रिअल इस्टेट प्रा.लि. यांच्या एकात्मिक नगरवसाहतीला परवानगी दिली. विधानसभा निवडणुकीच्या काही दिवस अगोदर खासगी बिल्डरांच्या एकात्मिक नगरवसाहतींना दिलेल्या परवानगीमागे सरकारचा इलेक्शन बोनान्झा असल्याचे सांगण्यात येत आहे.
या ठिकाणी उभ्या राहणार नव्या वसाहती
१. पहिली टाउनशिप कल्याण तालुक्यातील शीळ-कल्याण रस्त्यावर घारीवली, काटई, कोळे, माणगाव, हेदुटणे येथील ८७.३२१६ हेक्टर अर्थात २१८ एकरांवर वसविण्यात येणार आहे. यातील ७८.२३६ हेक्टर क्षेत्र एमएमआरडीएच्या कार्यक्षेत्रातील असून ९.४७ हेक्टर क्षेत्र कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील असल्याचे नगरविकास विभागाने ५ सप्टेंबर रोजी दिलेल्या परवानगीत म्हटले आहे.
२. भिवंडीतील टाउनशिप ही माणकोली, सुरई, सारंग, अंजूर येथे वसविण्यात येणार असून ती १५४.३२ एकरांवर राहणार आहे. यापैकी ११२.४९ एकरांवरील लोढा बिल्डर्सच्या टाउनशिपला (यापूर्वी अजितनाथ हायटेक बिल्डर्स प्रा.लि.) परवानगी देण्यात आली असून आता नव्याने त्यात ४१.९५ एकर क्षेत्राचा समावेश करण्यास नगरविकास विभागाने ४ सप्टेंबर रोजी परवानगी दिली
आहे.
३. पोलीस हाउसिंगच्या नावाखाली मुंबई-पुणे महामार्गावर एमएसआरडीसी नियोजन प्राधिकरण असलेल्या खालापूर तालुक्यातील वयाळ गावाच्या हद्दीत ४२.७८७ हेक्टर अर्थात १०६.९६ एकरांवर एकात्मिक नगरवसाहतीला परवानगी मिळाली आहे. विशेष म्हणजे खास बाब म्हणून शासनाने यापूर्वीच या वसाहतीला वाढीव चटईक्षेत्र दिलेले आहे.
४. नगरविकास विभागाने यापूर्वीही १२ जुलै २०१९ रोजी कल्याण-शीळफाटा मार्गावर सुमारे १३३ एकरांवर घारीवली, उसरघर, सागाव येथील जमिनीवर टाउनशिप उभारण्यास अन्य एका बिल्डरला परवानगी दिली आहे.
५. अलिबागच्या धोकावडे येथील मनोरंजन, पर्यटन व कोस्टल वेट लॅण्डवर सोबो रिअर इस्टेट प्रा.लि. यांच्या ४०.४८८४ हेक्टर
अर्थात १०१.२२१ एकरांवरील एकात्मिक नगरवसाहतीला २७ मे २०१९ रोजी परवानगी देण्यात आली आहे. (पूर्वार्ध)
>या अटींवर दिली परवानगी
यासंदर्भात परवानगी देताना शासनाने अनेक अटी घातल्या आहेत. यात बिल्डरने सीआरझेडसह केंद्र सरकारच्या पर्यावरण खात्याची परवानगी स्वत:च घ्यायची आहे. ठाणे, रायगड जिल्हाधिकाऱ्यांकडून जागेची मोजणी करायची आहे. परिसरातील इतर भूखंडधारकांना त्रास होणार नाही, याची काळजी घ्यायची आहे. त्याच्यासाठी ९ ते १८ मीटर रुंदीचा रस्ता तयार करायचा आहे. प्रत्येक इमारतीला रेन वॉटर हार्वेस्टिंग, सौरऊर्जा प्रकल्प, सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प, त्याचा पुनर्वापर करणे यासह वसाहतीत राहायला येणाºया रहिवासी, वाणिज्यिक संकुलांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय स्वखर्चाने करायची असून त्यासाठी जलसंपदा विभागासोबत पत्रव्यवहार करायचा आहे.

Web Title: Metro area will be closed in MMRDA area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.