भाईंदरच्या राई-मुर्धा येथील मेट्रो कारशेड उत्तनला जाणार, ४ ते ५ हजार कोटींनी खर्च वाढणार - आ. सरनाईक
By धीरज परब | Published: December 21, 2022 05:01 PM2022-12-21T17:01:31+5:302022-12-21T17:03:18+5:30
मेट्रो कारशेडही उत्तन येथील सरकारी जागेवर उभारले जाणार असल्याने मेट्रोचा लाभ उत्तन वासियांना सुद्धा होणार आहे. मात्र कारशेड पुढे नेल्याने ४ ते ५ हजार कोटींचा खर्च वाढणार आहे.
मीरारोड - भाईंदरच्या राई-मुर्धा गावा दरम्यान होणारी मेट्रो कारशेडही उत्तन येथील सरकारी जागेवर उभारले जाणार असल्याने मेट्रोचा लाभ उत्तन वासियांना सुद्धा होणार आहे. मात्र कारशेड पुढे नेल्याने ४ ते ५ हजार कोटींचा खर्च वाढणार आहे. तर मुर्धा-मोरवा येथील रस्ता ३० मीटर इतकाच रुंद केला जाणार असल्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे झाला असल्याची माहिती आमदार प्रताप सरनाईक यांनी दिली आहे.
भाईंदरच्या राई - मुर्धा दरम्यान विकास आराखड्यातील ३० मीटर रुंद रस्ता करण्यास बाधित लोकांनी विरोध चालवला होता. रस्त्याचे कामसुद्धा बंद पाडण्यात आल्याने रस्त्याची दुरावस्था झाली. नंतर राई - मुर्धा दरम्यान प्रस्तावित मेट्रो कारशेडला स्थानिकांच्या एका संघटनेमार्फत विरोध चालवला आहे. प्रस्तावित कारशेड आरक्षण विरोधात लोकांनी हरकती घेतल्या आहेत.
आ. सरनाईक यांना संघटने मार्फत शिष्टमंडळ भेटल्यानंतर त्यांनीसुद्धा कारशेड हलवण्याची मागणी चालवली होती. नागपूर येथील सध्या सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनात त्यांनी मेट्रो कारशेडचा मुद्दा उपस्थित केला होता. गोंधळsमुळे त्यावर चर्चा न झाल्याने आ. सरनाईकानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन कारशेड उत्तन येथे हलवण्याची मागणी केली असता ती त्यांनी मान्य केली आहे. स्थानिकांचा विरोध असल्याने मेट्रो कारशेडचे आरक्षण रद्द केले जाणार आहे. आता उत्तन येथे कारशेड करण्याबाबत एमएमआरडीए नवीन प्रस्ताव तयार करेल व नगरविकास विभागाकडे पाठवेल. मुख्यमंत्र्यांनी तसे आदेश दिले आहेत' अशी माहिती आ. सरनाईक यांनी दिली.
भाईंदरच्या नेताजी सुभाषचंद्र बोस मैदानापर्यंत येणारी मेट्रो आता उत्तनपर्यंत जाईल. परिसरातील ग्रामस्थांना मेट्रोचा फायदा होईल शिवाय पर्यटन वाढेल. मेट्रो पुढे नेण्यासाठी व उत्तन येथे कारशेड करण्यासाठी सरकारवर अतिरिक्त ४ ते ५ हजार कोटींचा खर्च होणार आहे. उत्तन येथे शासकीय जमिनीवर डोंगर तोडून मेट्रो कारशेड बनेल. मेट्रो उत्तनपर्यंत जाणार असल्याने मुख्य रस्ता ३० मीटर इतका रुंद करावा लागणार आहे.
मेट्रो कारशेड बाबत भुमीपुत्रांच्या वेळोवेळी बैठका घेऊन त्यांना पूर्ण पाठिंबा दर्शवला होता. कारशेड विरोधात सातत्याने शासना कडे मागणी चालवली होती. मुख्यमंत्र्यांनीही स्थानिक भुमीपुत्रांच्या बाजूनेच निर्णय द्यावा यासाठी केलेल्या प्रयत्नांना यश आल्याचे आ. सरनाईक म्हणाले.