मेट्रो कारशेडच्या बेडूकउड्या ; दहिसरची कारशेड जाणार भाईंदरला, तर कोनची कशेळीला
By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2021 07:41 AM2021-12-31T07:41:20+5:302021-12-31T07:41:57+5:30
Metro : ठाणे जिल्ह्यातील विविध शहरांतील कारशेड उभारण्याबाबतही एमएमआरडीएला वारंवार बेडूक उड्या माराव्या लागल्या आहेत.
- नारायण जाधव
ठाणे : महामुंबई क्षेत्रात विविध शहरात १२ मेट्रो मार्ग आकार घेत असून या मेट्रो मार्गांसाठी आवश्यक असलेल्या कारशेड उभारण्याबाबत एमएमआरडीला वांरवार कोलांटी मारावी लागत आहे. पर्यावरणाच्या मुद्यावरून आरे कॉलनीतील कारशेड कांजूरमार्ग येथे मिठागरांच्या जमिनीवर हलविण्याच्या निर्णयावर केंद्र आणि राज्य शासनात वाद पेटलेला एकीकडे पेटलेला असताना दुसरीकडे ठाणे जिल्ह्यातील विविध शहरांतील कारशेड उभारण्याबाबतही एमएमआरडीएला वारंवार बेडूक उड्या माराव्या लागल्या आहेत.
ठाण्यातील कावेसर, कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती, भिंवडीतील कोन-गोवे येथील कारशेड उभारण्याचा निर्णय बदलल्यानंतर मुंबईतील दहिसर येथील प्रस्तावित कारशेड आता ठाणे जिल्ह्यातील भाईंदरच्या राई-मुर्धे गावात आणि कोन येथील कारशेड कशेळी गावांत उभारण्याचा निर्णय घेतल्याचे उघडकीस आले आहे.
एमएमआरडीएच्या गेल्या महिन्यात झालेल्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. मेट्रो कारशेडची जागा वारंवार बदलण्या मागे किंवा आधी कोणती शेड उभारावी, याबाबत पहिल्या टप्प्यातील मेट्रो मार्गाचे अंतरासाठी कोणते ठिकाण हे सोयीचे ठरेल, याचे कारण देण्यात आले आहे. ठाण्यातील कोपरी आणि मोघरपाडा येथेही सुरुवातीपासूनच विरोध आहे. यामुळे उद्या हे निर्णयही बदलावे लागण्याची भीती आहे.
बैठकीत झालेल्या निर्णयानुसार...
- मेट्रो मार्ग क्रमांक २ अ, २ ब, ४, ७ साठी दहिसरला २३.४५ हे. जागा आरक्षित.
- १७.४७ हेक्टर विमानतळ प्राधिकरणाच्या मालकीची. त्याच्या बदल्यात गोराईतील ४० एकर जागेची अदलाबदल करण्याचा करारही झाला.
- मेट्रो ९ व ७ असाठी भाईंदरच्या राई-मुर्धे गावात ३२ हेक्टर आरक्षित जागेवर आता दहिसर येथील कारशेड रद्द करून ते उभारण्याचा निर्णय.
- ठाणे-भिवंडी कल्याण मेट्रोची कारशेड कोन एमआयडीसी नजीकच्या गोवे येथील १६ जागांवरील कारशेड आता कशेळी येथे बांधण्यास मंजुरी.
- कल्याणच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जागेवरील कारशेडसह कास्टिंग यार्डला विरोध होत आहे.
- ठाण्यातील कोपरी आणि मोघरपाडा येथेही सुरुवातीपासूनच विरोध आहे. यामुळे उद्या हे निर्णयही बदलावे लागण्याची भीती आहे.
- कल्याणच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जागेवरील कारशेडसह कास्टिंग यार्डला विरोध होत आहे.
संचालक मंडळाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह
- कोट्यवधी रुपये मोजून या सर्व मेट्रो मार्गांचा सविस्तर प्रकल्प अहवाल जागतिक स्तरावरील संस्थांकडून तयार केला आहे.
- पर्यावरण अहवालावर कोट्यवधी रुपये मोजले आहेत. त्यांना मंजुरी देताना डझनभर अधिकाऱ्यांनी निर्णय घेतले.
- अचानक कारशेडची जागा बदलल्याने मेट्रोच्या विकासात अडथळे निर्माण होत आहेत. सविस्तर प्रकल्प अहलवालातच कोणता मार्ग, किती अंतराचा टप्पा आधी पूर्ण होईल, हे नमूद असताना मेट्रो मार्ग आणि कारशेडला अधिकाऱ्यांनी कशी मंजुरी दिली? जागा बदलामागे बिल्डर हित आहे, हे लक्षात आले नाही का? असे अनेक प्रश्न या पार्श्वभूमीवर निर्माण झाले आहेत.